Yoga Information in Marathi
योग माहिती निबंध :
योग किंवा ‘मिंग्लिश’ भाषेत (मराठी +इंग्लीश) ज्याला योगा म्हणतात ते काय आहे? आणि का, व कोणी, केव्हा, कसे करावे ह्या बद्दल सध्या प्रचंड साहित्याची निर्मिती झालेली आहे. बाबा रामदेव आणि पंतप्रधान मोदींमुळे ह्याला राजाश्रय प्राप्त झाला आहे. आणि एके काळी एक अत्यंत अवघड वाटणारा शरीर प्रकृती उत्तम ठेवणारा गणिता सारखा अभ्यासक्रम ताता होमसायन्स किंवा चित्रकला शिवण यासारखा सोप्पा विषय वाटायला लागला आहे.
योग म्हणजे काय ?
युज, युक्त ह्या धातुपासून योग शब्दाचा उगम झाला आहे. योग म्हणजे जोडणे. आपले शरीर आणि मन ह्यांना जोडण्याची प्रक्रिया म्हणजे योग. शरीर आणि मन जोडण्याची गरज का भासू लागली? पशु पक्षी कुठे योग करतात? कारण माणसाला विकसित मेंदू बरोबर बुद्धी (इंटेलिजन्स) हे आणखी एक ज्ञानेंद्रिय दिलेले आहे.
देवाने जरी सर्वांना समान बुद्धी दिली तरी त्याचा वापर प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने करू लागला. सुबुद्धी आणि कुबुद्धीचा संग्राम सुरु झाला. त्यामुळे लोकांच्या मनात एक, पोटात एक, ओठात तिसरे आणि कृति मध्ये चवथे असे कप्पे निर्माण झाले. आणि मानव समाजात आपली प्रतिमा, इगो, स्टेटस ह्यांना जपण्याकरिता उथळ वरवरचे वागू लागला. जसा जसा तो त्याच्या निर्मल मनापासून दूर जाऊ लागला तसे तसे त्याचे शरीर उलट प्रतिक्रिया देऊ लागले. आणि त्याचे पडसाद त्याच्या स्वास्थ्यावर पडू लागले.
प्रथम ह्यावर लोकांनी औषधांचा मारा करून तात्पुरती डागडुजी केली. आणि त्याचा परिणाम उलट भयंकरच झाला. आज जगात जीवनमान किंवा जगण्याचे वय जितके वाढले त्याच्या 100 पट रोगांचे प्रमाण वाढले. जे रोग वयाच्या साठी नंतर व्हायचे ते आता 30-35 शीतच सिंदबादच्या म्हातार्यासारखे मानगुटीवर बसायला लागले. आणि एकमेकांना भेटल्यावर प्रत्येक जण रोग आणि उपाय ह्यावरच चर्चा करू लागले.
पु.ल. म्हणतात “माणूस आजारावर चर्चा करू लागला म्हणजे तो म्हातारा झाला” त्यांच्यासारख्या चिरतरुण माणसाकडून शिकावे जीवनाचे तत्त्वज्ञान ! पण त्यांनाही अल्झायमर्स ने ग्रासले आणि महाराष्ट्राचे हे लाडके व्यक्तिमत्व अकाली आपल्यातून गेले. कितीतरी गुणी कलावंत, नेते राजे ह्यांच्यावर अकाली काळाने घाला घातला. कारण एकच -त्यांनी त्याबरोबर योगालाही आपल्या जीवनात स्थान दिले असते तर आज समाजाला त्यांच्या किती तरी उपयोग झाला असता.