Skip to content

Autobiography of a Tree in Marathi | झाडाचे आत्मवृत्त ( मनोगत )

Zadache Atmavrutta / Atmakatha

Autobiography of a Tree in Marathi Language

वडाच्या झाडाचे आत्मवृत्त : महत्व

नमस्कार, मी बोलतोय – वडाचे झाड. तुम्हाला आश्चर्य वाटले ना? पण मी बोलू शकतो, हसू शकतो, रडू शकतो कारण आम्हाला पण भावना असतात फक्त काहीच जगदीशचंद्र बोस असतात जे आमच्या भावना जाणू शकतात. तुमच्या सायन्सच्या पुस्तकात लिहिले आहे ना, की झाडे ही पण सजीव प्रवर्गात मोडतात.तुमच्या सारखेच आम्ही पण जन्मतो, वाढतो, आपल्यासारखे दुसरे जीव म्हणजे बाळे जन्माला घालतो आणि कार्य संपले की जीवन संपवितो. मग आम्ही का नाही बोलणार? फक्त ऐकायला कान आणि मन हवे जे हल्ली फक्त मोबाइलला वाहून दिले आहे.

थांबा, कुणीतरी पांथस्थ आला आहे थकलाय बिचारा. त्याला वारा घालतो हं. बघा कसे त्याला शांत वाटले. काय म्हणतोय? “खरोखर परोपकाराय फळांती वृक्ष:” असे म्हणतोय खरेच आम्ही परोपकारासाठीच जन्म घेतो. आम्ही उन्हात भाजले जातो पण तुम्हाला आमचे हात लांब करून सावली देतो अगदी तुमची आई तुम्हाला पोटाशी धरते तसे. भूक लागली तर फळे देतो. माझ्या अंगाखांद्यावर कितीतरी पक्षी घार, घुबड, खारुताई बागडत असतात. चिमण्या तर किती प्रकारच्या, मोजताच येणार नाही. नुसता गोड किलबिलाट ऐकू येत असतो. माझ्या विस्तीर्ण क्षेत्रांत इतके जीव आसरा घेतात याच मला खूप अप्रूप वाटते. तुमचे संत कसे लोकाना मदत करताना सात्विक समाधानाने आनंदित होतात तसे. आम्ही का करतो? काय फायद्यासाठी करतो हे तुमच्या भाषेत सांगता नाही येणार कारण फक्त फायद्यासाठी दुनियादारी करण्याचे काम तुमचे मानवाचे. आम्हाला फक्त देणे माहित असते. माझ्या सावलीसाठी येणाऱ्या गाई, बैल, कुत्री आणि घोडा हे सर्व प्राणी तुम्हा मानवाबद्दल हेच बोलत असतात. मला माझे मत विचारतात कारण मी अनेक वर्षे म्हणजे शेकडो वर्षाचा बुजुर्ग आहे ना. पण मी इतके पावसाळे पाहिल्यामुळे आता परिपक्व झालो आहे आणि मी त्यांना हसून म्हणतो “आपण परमेश्वराने ज्यासाठी पृथ्वीवर पाठवले आहे ते करायचे.”

किती वर्ष झाली असतील मला ह्या जागेवर ठाम उभा आहे. मी छोटासा होतो तेंव्हा अशाच परोपकारी माणसाने मला आधार दिला. रोज पाणी, खाणे दिले. तो खूप चांगला होता. तो माझ्याशी बोलायाचा पण. मग मी पाने हलवून त्याला प्रतिसाद द्यायचो. बघता बघता मी खूपच मोठा झालो. तो कधीच देवाघरी गेला. मी पाने गाळून रडलो. पण मला जगणे भाग होते. मी मग धरती मातेला साद घातली आणि माझे हात आणि पारंब्या दूर पसरवून माझे अन्न मिळवले. खूप वर्षे गेली, माझ्या डोळ्यासमोर लढाया झाल्या, मिरवणुकी गेल्या, पंगती उठल्या, वटपौर्णिमेला सुवासिनींनी माझी पूजा केली. माझ्या भोवती फेऱ्या मारल्या. माझ्या सावलीत पांथस्थ येत होते, ढोलीत घुबडे, खारुताई अनेक पक्षी यांचा सुखाने संसार चालला होता.

पाहता पाहता आजूबाजूचा परिसर बदलला. मोकळे रान जाऊन तेथे राहायला बिल्डिंग आल्या. मला माझ्या उंचीचा गर्व होता पण त्या माझ्यापेक्षा टोलेजंग होत्या. माणसांची वर्दळ वाढली. विकासाच्या नावाखाली मोठे मोठे रस्ते करताना माझ्या भाईबंदांची कत्तल झाली. एक एक करताना सगळे गेले. खूप रडू येत होते पण सांगणार कोणाला? माझा विस्तार खूपच मोठा आहे म्हणून मी वाचलो, आणि हो त्यांच्या सौभाग्यवतीनी सांगितले असणार की पूजेला एक तरी झाड असू द्या.

अशा रीतीने मी वाचलो. नंतर एक भला माणूस आला. त्याने लोकांना माझे महत्व सांगितले. तो म्हणाला “वड ५०० गॅलन वाफ सोडतो. वडामुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन पसरतो”. म्हणूनच पूर्वी घरी असलेल्या बायकांना वडाच्या प्रदक्षिणा घालायला सांगायचे. तुम्ही जर झाडे जगवली नाही तर एक दिवस ऑक्सिजनविना आणि अन्न पाण्याविना तुमच्या वर मरायची पाळी येईल. तुमच्या क्षणिक सुखासाठी पुढच्या पिढीचा नाश करू नका. बिचारा तळमळीनं सांगत होता. तो म्हणे पर्यावरण वादी होता. बरे झाले, एक तरी शहाणा निघाला. त्याने मला आणि माझ्या भोवतालच्या सगळ्या झाडांभोवती कुंपण घातले आणि बोर्ड लावला झाडे तोडू नये म्हणून. खरंच परमेश्वरासारखा धावला. मग त्याने बऱ्याच ऑफिसात फेऱ्या मारून आमच्या भवती बाग तयार केली. फुलझाडे लावली. आता आम्ही सर्व जण खूप खुष आहोत. पक्षी गाणी गातात, मोर केका करतो, मुले माझ्या पारंब्यांचे झोपाळे करून खूप हसत हसत खेळतात. मला मुलाबाळांची भरलेल्या घरातल्या आजोबांसारखे धन्य वाटते.

आता पर्यावरणाचा -हास झाल्याने वादळ, पूर, भूकंप अशा भयानक संकटांनी पृथ्वी आणि माणसे हादरली आहेत. विचारवंतांनी यावर वृक्ष संवर्धन ची मोहीम काढली आहे. आता तरी मानव जागा होईल असे वाटते. आम्ही वड म्हणजे गीतेतील अश्वत्थ वृक्ष, म्हणजे अक्षय वृक्ष आहोत. आमचे आयुष्य दीर्घ आहे. पण तुम्ही मानवांनी जर आमची कत्तलच करायची ठरवली तर नाश तुमचाच होईल. पूर्वी माझी पूजा करायला बायका माझ्या बुंध्याशी यायच्या ,आता घरीच पूजा करतात त्यामुळे पैसे कमवायला पोरे टोरे अमानुषपणे माझ्या हातांची कत्तल करून विकतात. आणि बायका दुसऱ्या दिवशी त्या फांद्या रस्त्यावर फेकून देतात. किती अडाणीपणा ह्या शिकलेल्या लोकांचा! हि पूजा नव्हे, अवहेलना आहे. पण त्याना कोण सांगणार?

तुम्हाला माहित आहे मी औषध पण देतो. माझ्या पारंब्या केस लांब करायला उपयोगी पडतात. माझ्या मुळाचे पण खूप औषधी उपयोग आहेत. पण म्हणतात न अति परिचयात अवज्ञा. तसे आहे. आम्ही देवाला दिलेला शब्द पाळतो पण तुम्ही देवाच्या नावाने माणुसकीला काळिमा आणतात.

बाळांनो, मी म्हातारा आजोबा म्हणून तरी माझे ऐका आणि हा संहार थांबवा. बाकी मी काय सांगणार? मानव सगळ्यात हुशार प्राणी आहे त्याचा उपयोग करा. तुम्हाला माझा आशीर्वाद आहे.

Vrukshache Manogat

Marathi Nibandh Essay on Trees / Zadache Manogat Atmavrutta

7 thoughts on “Autobiography of a Tree in Marathi | झाडाचे आत्मवृत्त ( मनोगत )”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *