Sunita Williams Information in Marathi
Sunita Williams Astronaut – सुनिता विल्यम्स माहिती
- भारतातील अनेक महिलांनी पुराण काळापासून आपल्या अस्तित्वाची चुणूक दाखवली आहे. काही महिला तर अश्या आहेत ज्यांनी भारताबाहेर सुद्धा नाव कमावले आहे. ज्यांना पाहून अभिमानाने उर भरून यावा अश्या काही महिलांपैकी एक म्हणजे सुनिता विल्यम्स. भारताची रहिवाशी नसली तरी भारताशी नाळ जोडलेल्या सुनिता विल्यम्स चा सर्व भारतीयांना अभिमान आहे.
- ओहिओ मधील युकील्ड या शहरात सुनिता विल्यम्सचा जन्म झाला. तिचे वडील दीपक पांड्या भारतीय वंशाचे पण अमेरिकन नागरिकत्व असलेले न्यूरोसर्जन आहेत तर आई उर्सुलीन बोनी पांड्या ह्या स्लोव्हिन – अमेरिकन आहेत. या दाम्पत्याला तीन मुले आहेत, मोठा मुलगा जय, दुसरी मुलगी डीना अॅना आणि सर्वात धाकटी सुनिता.
- सुनीताचे शिक्षण मॅसाच्युसेट्स मधील नीडहॅम येथील नीडहॅम हायस्कूल येथे झाले. १९८३ मध्ये त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी युनायटेड स्टेट्स नेवल अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला. १९८७ साली विज्ञान या विषयात त्यांनी बॅचलर ऑफ सायन्स ची पदवी मिळवली. नंतर १९९५ साली फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मधून त्यांनी इंजिनिअरिंग मॅनेजमेंट या विषयात मास्टर ऑफ सायन्स ची पदवी मिळवली.
- मे १९८७ मध्ये, सुनिता युनायटेड स्टेट्स नेव्ही मध्ये भरती झाल्या. नेवल कोस्टल सिस्टीम कमांड येथे त्यांची सहा महिन्यासाठी नियुक्ती झाली व त्यानंतर त्यांना बेसिक डायविंग ऑफिसर म्हणून नेमण्यात आले. जुलै १९८९ मध्ये त्यांना नेवल एवीएटर म्हणून नेवल एअर ट्रेनिंग कमांड येथे पाठविण्यात आले. इथे त्यांना सी नाईट चे ट्रेनिंग देण्यात आले आणि ऑपरेशन डेझर्ट शिल्ड आणि ऑपरेशन प्रोव्हाईड कम्फर्ट साठी त्यांना पाठविण्यात आले. सप्टेंबर १९९२ मध्ये, हरिकेन अँड्र्यू रिलीफ ऑपरेशन साठी पाठविण्यात आलेल्या एच-४६ तुकडीची त्या ऑफिसर इन चार्ज होत्या. १९९३ मध्ये त्यांनी युनायटेड स्टेट्स नेवल पायलेट स्कूल मध्ये प्रशिक्षण घेतले. १९९५ साली त्या नेवल टेस्ट पायलेट स्कूल मध्ये प्रशिक्षक आणि सुरक्षा अधिकारी म्हणून नेमल्या गेल्या.
- १९९८ साली नासाच्या अंतराळवीर कार्यक्रमात निवड झाली. त्यांचे उमेदवारीचे प्रशिक्षण जॉन्सन स्पेस सेंटर येथे झाले. एक्सपेडिशन १४ क्रूमध्ये सामील होण्यासाठी सुनिता यांना ९ डिसेंबर, २००६ रोजी स्पेस शटल डिस्कव्हरी मधून एसटीएस – ११६ सह इंटरनॅशनल स्पेस स्टेशन येथे पाठविण्यात आले. सुनितांनी आवकाशात जाताना स्वतः सोबत भगवत गीता, गणपतीची छोटीसी मूर्ती आणि काही सामोसे नेले होते.
- शटल डिस्कव्हरीवर गेल्यानंतर त्यांनी आपले केस ‘लोक्स ऑफ लव’ या संस्थेला देण्याचे ठरविले. अंतराळात त्यांचे केस कापून त्यांनी ते एसटीएस – ११६ च्या क्र्यू सोबत पृथ्वीवर पाठविले. एसटीएस – ११६ च्या मिशनच्या आठव्या दिवशी त्यांनी पहिल्यांदा शटल बाहेर अंतराळात काम केले. ३१ जानेवारी, ४ फेब्रुवारी आणि ९ फेब्रुवारीला त्यांनी तीन स्पेसवॉक केले. नऊ दिवसात त्या एकूण सहा तास चाळीस मिनिटे अवकाशात राहिल्या आणि चार स्पेसवॉक मध्ये एकूण २९ तास १७ मिनिटे बाहेर राहिलेल्या त्या एकमेव महिला होत्या आणि त्यांनी एक विक्रम रचला होता. २००७ मध्ये पेगी व्हिटसन यांनी त्यांचा विक्रम मोडला.
- एप्रिल २००७ मध्ये त्या अंतराळात सर्वात पहिले मॅरेथॉन धावल्या. त्यांनी ४ तास २४ मिनिटांत बॉस्टन मॅरेथॉन पूर्ण केली. त्यांची सहयोगी कॅरन आणि बहिण डीना यावेळीस पृथ्वीवर मॅरेथॉन धावत होत्या, ज्याची माहिती मिशन कंट्रोल द्वारे सुनिता यांना मिळत होती. २००८ मध्ये त्यांनी पृथ्वीवर बॉस्टन मॅरेथॉन भाग घेतला.
- एप्रिल २००७ मध्ये नासाने त्यांना पुन्हा पृथ्वीवर आणण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एका स्त्रीने प्रदीर्घ काळ अवकाशात राहण्याचा विक्रम केला आहे. सुनिता यांनी मिशन स्पेशलीस्ट म्हणून काम केले आणि जून २००७ मध्ये एसटीएस – ११७ चे मिशन संपल्यावर पुन्हा पृथ्वीवर आल्या. तब्बल १९२ दिवस आवकाशात राहण्याचा विक्रम केल्यानंतर सुनिता घरी परतल्या.
- १५ जुलै, २०१२ रोजी, एक्स्पेडिशन ३२ / ३३ चा भाग म्हणून त्यांना पुन्हा अंतराळात पाठविण्यात आले. चार महिन्यांच्या मुक्कामासाठी त्या आयएसएस मध्ये दाखल झाल्या आणि एक्स्पेडिशन ३२ च्या क्र्यूचे सदस्य म्हणून त्यांनी कामाला सुरवात केली. आयएसएस एक्स्पेडिशन ३३ वर त्यांनी कमांडर ऑफ आयएसएस म्हणून कामगिरी सांभाळली. १५ ऑगस्ट, २०१२ ला भारताच्या ६६व्या स्वातंत्र्यदिनी त्यांनी सर्वात पहिले अवकाशात भारताचा झेंडा फडकविला होता. १७ सप्टेंबर, २०१२मध्ये त्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या कमांडर झाल्या आणि हे पद भूषवणाऱ्या त्या दुसऱ्या महिला होत्या. सप्टेंबर २०१२मध्ये त्यांनी सर्वात पहिले अंतराळात ट्रायथलॉन पूर्ण केली. वेगवेगळ्या उपकरणांच्या सहाय्याने त्यांनी १ तास ४८ मिनिटात अर्धा मैल पोहणे, १८ मैल सायकल चालविणे आणि ४ मैल धावणे एवढ्या शर्यती पूर्ण केल्या. १९ नोव्हेंबर, २०१२मध्ये त्या पृथ्वीवर परत आल्या.
- मार्च २०१६ पर्यंत त्यांनी एकूण ५० तास ४० मिनिटांचा स्पेसवॉक पूर्ण करून त्या स्पेसवॉकरच्या यादीत सातव्या क्रमांकावर आहेत. त्यांनी आतापर्यंत एकूण ३२१ दिवस, १७ तास आणि १५ मिनिटे एवढा वेळ आवकाशात घालविला आहे. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार दिला आहे. त्यांनी आता पर्यंत ३० वेगवेळ्या अंतराळयानातून २७७० यात्रा केल्या आहेत. भारताच्या आधुनिक स्त्रीयांसाठी या खूप चांगला आदर्श आहेत.