इंग्रजीमध्ये बोलणे कसे शिकता येईल
हल्लीच्या ग्लोबल जगामध्ये अमेरिका, इंग्लंड म्हणजे अंगण ओसरी झाली आहे. परदेशगमन म्हणजे सात समुद्रापार गेला असे नाही तर फक्त एका गावाहून दुसऱ्या गावाला गेला इतकेच महत्व उरले आहे. पण अडचण येते ती व्हिसाच्या वेळी कारण त्या आधी इंग्लिश भाषेची अवघड परीक्षा द्यावी लागते आणि खरी अडचण असते भाषा. आपल्याला राज्याचा अभ्यासक्रम असेल तर पाचवीपासून इंग्लिश भाषा शिकायला लागते आणि बारावी नंतर कला शाखेला गेला नसाल तर बाकी अभ्यासक्रमात भाषा विषय नसतो. जरी त्या शाखेचे माध्यम इंग्लिश असले तरी भाषा म्हणून त्याच्या ज्ञानात भर पडत नाही आणि जरी ते विद्यार्थी CBSE / ICSE चे असले तरी दोन वाक्य इंग्लिश मध्ये बोलुन लगेच हिंदीमध्ये घुसतात आणि हिंग्लिश बोलतात. (हिंदी+ इंग्लिश).
इंग्रजी शिकण्याची गरज:
- परदेशात शिक्षण किंवा नोकरीस जाण्याची वेळ आली तर त्यांना जाण्याअगोदर इंग्लीशची अवघड परीक्षा दिल्याशिवाय व्हिसा मिळत नाही.
- मग सुरु होते धावपळ आठ दिवसात फाडफाड इंग्लिश बोला, रॅपिड इंग्लिश स्पिकिंग कोर्स इत्यादीचा आधार घेतला जातो आणि थातूर मातुर बोलणे शिकून व्हिसा पदरात पाडून घेऊन तेथे हसे करून घेतात.
- हि झाली परदेशातील गोष्ट पण आपल्या देशात ह्या सर्व अडचणींवर मात करायची तर लोकमान्य टिळकांच्या भाषेत हे वाघिणीचे दुध¬ प्यायलाच हवे.
- हे खरे आहे की आपल्या भाषेचा अभिमान असावा म्हणून आपण अट्टाहासाने मराठीच बोललो तर आपण संवादात कमी पडू आणि चांगल्या संधी गमावून बसू.
- आपण शुध्द तुपातील इंग्लिश बोलतो आणि व्याकरणदृष्ट्या आपले बोलणे बरोबर असते पण संभाषणात कोणी इतकं अचूक आणि व्याकरणदृष्ट्या बरोबर बोलत नाही.
- ते फक्त सलगपणे न अडखळता इंग्लिश बोलतात आणि आपण प्रथम मराठी वाक्य मनात आणतो आणि त्याचे भाषांतर करिता अं अं करीत बोलतो आणि तिथेच मार खातो, तेंव्हा ही भाषा सलगपणे न अडखळता बोलण्यासाठी ग्यानबाच्या मेखा बघूया.
इंग्रजी बोलणे कसे सुरू करावे :
- प्रथम इंग्लिश बोलताना इंग्लिशमधून विचार करा. मराठी वाक्य बनवून इंग्लिशमध्ये भाषांतर करू नका.
- त्यासाठी इंग्लिश वर्तमानपत्र वाचण्याची सवय करा. कारण वर्तमानपत्र सर्व लोकांनी वाचण्याच्या हेतूने बोली भाषेचा जास्त उपयोग करून प्रसारित केलेले असते.
- इंग्लिश सिनेमे बघा व त्यांचे बोलणे आणि खाली येणारे सब-टायटल्स यांचे एकत्रीकरण करून जास्त वापरले जाणारे शब्द आत्मसात करा. कारण काही विशिष्ट गोष्टींना लेखी एक शब्द वापरला जातो आणि बोली भाषेत दुसरा शब्द वापरला जातो. जसे आपण म्हणतो “मी हे करणार आहे” शाळेत शिकलेले असते “I will do this.”आणि बोली भाषेत म्हणतात, “I am going to do this.
- नुसती पुस्तके वाचून इग्लिश बोलता येणार नाही. त्यासाठी न लाजता बेधडक इंग्लिश बोलीला सुरुवात करा. बघा पर्यटन स्थळी जे गाईड असतात त्यांना कोणीही इंग्लिश शिकवत नाही. पण पर्यटकांशी बोलून बोलून ते कॉमन शब्द शिकून घेतात आणि मग सहजपणे बोलतात. एखादी भाषा शिकणे म्हणजे त्यातील जास्त कॉमन शब्द आत्मसात करणे.
- मी भाषा शिकविण्याचे पॅकेज पाहिलं त्यात संभाषण जास्त शिकवले जाते आणि रोजच्या व्यवहारातील दाखले दिलेले असतात. त्याचा पण उपयोग करून पाहावा. उदा. त्यांनी दुकानात किंवा सुपरमार्केट मध्ये कशी खरेदी करावी ह्याचे उदाहरण दिलेले असते. तसे बोलून बघावे.
- ह्याची ऑर्डर बुक कशी करावी ह्याचे उदाहरण दिलेले असते तशी एखादी ऑर्डर बुक करावी तेंव्हा अजिबात हिंदी बोलायचे नाही.
- एखाद्या कॉल सेंटरला फोन करावा, त्यावेळी प्रथम लागणारे साहित्य म्हणजे फोन नंबर, कॉलर आयडी, कस्टमर आयडी वगैरे माहिती जवळ ठेवा आणि फोन करा, भाषेच्या पर्यायात इंग्लिश भाषा निवडा आणि बोला. त्यांचे उच्चार, बोलण्याची पद्धत समजावून घ्या आणि तसे बोलण्याचा प्रयत्न करा.
- उदा. प्रथम नमस्कार किंवा गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग वगैरे केंव्हा म्हणतात, आपल्याला प्रश्न विचारताना कसे नम्रतापूर्ण व्यवहार करतात, हे सगळे आत्मसात करा. त्याची प्रॅक्टिस करा.
- आत्मविश्वासाने बोला, लाजू नका, चुकले तरी सॉरी म्हणून पुढे बोला आधीचे दुरूस्त करीत बसू नका.
- आता दुसऱ्याचे इंग्लिश समजावून घेणे, BBC च्या बातम्या ऐका. त्यावरून शब्दांचे उच्चार ते लोक कसे करतात हे कळते. उदा. Today चा उच्चार आपण टुडे असा करतो, ते टू दै करतात. कुठल्याही वाक्याची सुरुवात करताना ते पहिला शब्द अगदी अस्पष्ट उच्चारतात. जसे I am going. चा उच्चार am going इतकाच करतात. Wanna gonna वगैरे कसे वापरावे ते सिनेमे बघून शिका. समजले नाही तर सॉरी can’t get what you say म्हणून परत ऐकणे.
- नवीन ओळख झाल्यावर आपल्याबद्दल प्रथम सांगणे, मग दुसऱ्याला विचारायचे हा शिरस्ता पाळा. चहा पिण्याची वेळ असेल तर आधी दुसऱ्याला चहा द्या. चहा बनवून द्या. Please allow me. म्हणून आपण स्वतः बनवा.
- अमेरिकन आणि ब्रिटीश इंग्लिश वेगळे असते. त्यासाठी फ्रेंड्स सीरियल बघा आणि ब्रिटीश इंग्लिश साठी बीबीसीच्या बातम्या ऐका.
दररोज इंग्रजी वृत्तपत्रे आणि पुस्तके वाचावी (शब्दसंग्रह वाढवा):
- आपण कायम त्याच्यातच कमी पडतो आणि कॉन्व्हेंट मधल्या मुलांना ते आधीपासूनच माहिती असते म्हणून ते अडखळत नाहीत.
- शब्द भंडार वाढवायचे असेल तर वर्तमान पत्र आणि डिक्शनरी घेऊन बसायचे आणि दिवसाला दहा तरी शब्द पाठ नाहीतर वाक्यात उपयोग करून बघायचे. कारण नुसते शब्द नाही तर त्याचे वाक्यात उपयोग शिकायचं.
- डिक्शनरी मध्ये त्याचा उच्चार पण दिलेले असतात. एकाच शब्दाचे अव्यया प्रमाणे अनेक अर्थ होतात. Put on म्हणजे वजन वाढले आणि put म्हणजे ठेवणे.
- अशा रितीने छोट्या गोष्टीतून भाषा शिकली की अवघड जात नाही. उलट जसे जसे शिकू लागतो तसे त्या भाषेतील सौंदर्य कळते.
- डोळे, कान उघडे ठेवायचे आणि जे काही कानावर पडेल त्याची प्रॅक्टिस करायची.
बोलत असताना विश्वास:
- तुमची स्वत:ची स्टाईल बनवा आणि बिनधास्त बोला.
- त्यासाठी पंजाबी आणि उत्तर भारतीय लोकांकडे बघा, ते कसे बेधडक अंकिल (अंकल) असे उच्चार करतात आणि कोणीही त्यांना हसत नाही
- जरा जरी अं अं असे झाले की तुमचे पितळ उघडे पडलेच म्हणून समजा.
- शेवटी आणि महत्वाचे बोलताना थोडी गुर्मी येऊ द्या कारण ते लोक आपल्या स्वरात अतिशय गुर्मी आणून बोलतात आणि आपण दास असल्यासारखे बोलतो. बघा कसे तुम्हीपण छाप पाडाल ते.