Sonia Gandhi Information in Marathi
सोनिया गांधी मराठी माहिती
- इटलीतील छोट्याश्या गावातून केम्ब्रिज मध्ये आणि त्यानंतर एकदम अनोळखी अशा विश्वात एका बलाढ्य पक्षाची अध्यक्ष होऊन सहजपणे वावरणारी महिला म्हणजे सोनिया गांधी उर्फ एद्विग अन्तोनिओ अल्बिन मायनो ! तिने कधी मनात विचार देखील केला नसेल की तिचे आयुष्य इतके चढ उताराचे असेल.
- आई ,वडील आणि दोन बहिणींबरोबर आनंदात बालपण घालवीत होती. कॉलेज मध्ये अचानक तिला स्वप्नीचा राजकुमार मिळाला आणि पाहत पाहता ती भारताची सम्राज्ञी झाली. जिला राजकारणात अजिबात रस नव्हता, एक शांत, सुखवस्तू जीवन,नवरा आणि मुलांबरोबर घालवायचे होते, तिला अचानक भारताची आणि बलाढ्य भारतीय कॉंग्रेस ची धुरा सांभाळावी लागली.
- कॉंग्रेस पक्ष म्हणजे भारतातील सर्वात जुना आणि देशव्यापी पक्ष असल्याने देशाच्या काना कोपऱ्यात तिला आपले स्थान बनवावे लागले तेही परदेशी असून. ‘जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण‘ ह्याची प्रचीति त्यांच्या जीवनाकडे बघितल्यावर येते.
बालपण आणि लग्न :
- सोनियाजींचा जन्म इटलीतील छोट्याश्या गावी व्हीसिन्झा येथे स्तीफानो आणि पावलो मायनो ह्यांच्या पोटी ९ डिसेंबर १९४६ मध्ये झाला. त्यांनी त्यांचे बालपण ओर्बासानो येथे घालविले.
- त्यांचे कुटुंब कट्टर रोमन कॅथोलिक ख्रिश्चन होते. त्यांचे वडील बांधकाम व्यवसाय करीत. त्यांनी दुसऱ्या महायुद्धात लढाईही केली होती. ते मुसोलिनीचे समर्थक होते.
- सोनियाजींचे प्राथमिक शिक्षण कॅथोलिक शाळेत झाले. शाळेत असताना त्या मेहनती शांत स्वभावाची अभ्यासू विद्यार्थिनी म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यानंतर त्या इंग्लीश शिकण्यास बेल एज्युकेशनल ट्रस्ट, केम्ब्रिज येथे गेल्या. परदेशात मुले आपल्या शिक्षणाचा भार आई वडीलांवर पडू देत नाही. त्याप्रमाणे त्या अर्धा वेळ कॅन्टीन मध्ये वेट्रेस म्हणून काम करीत होत्या. त्याच वेळी राजीव गांधी केम्ब्रिजला इंजिनियरिंग शिकायला आले होते.
- तेथेच त्यांचे प्रेम जमले आणि त्यांनी इंदिरा गांधी ह्यांच्या संमतीने १९६८ मध्ये हिंदू पद्धतीने विवाह केला. आणि त्यांना राहुल आणि प्रियांका ही दोन अपत्ये झाली.
आव्हान आणि कर्तव्य :
- कट्टर रोमन संस्कृतितून एका खानदानी, राजेशाही आणि प्रचंड लोकप्रिय घराण्याची सून होणे सोनियाना तितकेसे सोपे नव्हते. सासूबाई इंदिरा गांधीसारख्या वट वृक्षाच्या छायेत स्वत:ची ओळख निर्माण करणे देखील अवघड होते.
- पण भारतात आल्याबरोबर त्यांनी इथल्या पुरुष प्रधान संस्कृतीचा अभ्यास करून कसे वागले तर आपण आदर्श सून होऊ शकतो हे दाखवून दिले. त्या सासूच्या लाडक्या झाल्या. बाहेर इंदिराजी रणमैदान गाजवित असताना त्या इतका मोठा कारभार कुशलतेने हाताळीत होत्या. त्यांच्या तोडून कधीही शब्द बाहेर पडत नसे. राजीव गांधी पायलट म्हणून काम करीत होते आणि त्या घर सांभाळत होत्या.
- राजकारण्यांची घरात एव्हडी उठबस असून राजीव आणि सोनिया राजकारणापासून अलिप्त होते. अचानक १९८४ मध्ये इंदिराजींवर त्यांच्याच अंगरक्षकांकडून हल्ला झाला आणि त्यांचा अंत झाला. सगळा देश शोकसागरात बुडाला आणि नेतृत्वहीन झाला होता.
- अशावेळी कॉंग्रेसच्या आग्रहा खातर राजीव गांधीनी पंतप्रधान पदाची धरा आपल्या खांद्यावर घेतली आणि इच्छा नसताना सोनिया त्यांची अर्धांगीनी म्हणून राजकारणात सक्रिय झाल्या. त्यांच्याबरोबर देशाच्या कानाकोपऱ्यात साडी नेसून डोक्यावर पदर हिंडू लागल्या.
- जेथे जशी संस्कृती आहे तसा वेश करून खानदानाची मर्यादा सांभाळून सावलीसारख्या राजीव गांधीबरोबर होत्या. राजीव गांधीची आधुनिक विचारसरणी आणि तंत्रज्ञान युक्त भारताचे स्वप्न कांही लोकांना रुचणारे नव्हते. त्यांच्या पण जीवाला धोका निर्माण झाला. तेंव्हा काही ठिकाणी त्या स्वत: जाऊन हिंदी भाषेत भाषण देऊ लागल्या.
- दुसऱ्या देशाशी इतके समरस होणे हे अवघड असते पण सोनियांनी हे आव्हान पेलले. पण दुर्दैवाने त्यांच्या सौभाग्यावर घाला घातला. १९९१ मध्ये राजीव गांधीना आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात ठार मारले गेले. ज्याच्यावर जीवापाड प्रेम केले त्याच्या शरीराचे तुकडेसुद्धा सापडले नाही हे दु:ख किती भयानक होते.
- पण राष्ट्रापुढे स्वत:चे दु:ख दाखवता येत नाही. त्यांनी धीर धरला आणि पक्षाची बांधणी केली. त्यांना पंतप्रधान पदाची गळ घातली गेली पण त्यांच्यावर काही लोकांनी परदेशी असल्याचा शिक्का मारून भारतात अजूनही विधवांना वाईट वागणूक मिळते हे दाखवून दिले. त्यांनी पंतप्रधान पद नाकारले आणि नरसिंह राव पंतप्रधान झाले. पण हि राजवट फार काळ टिकली नाही. पक्षात दुफळी माजायला लागली. बंडखोर बाहेर पडले आणि त्यांनी दुसरा पक्ष काढला. तेंव्हा परत लोकाग्रहास्तव त्या १९९६ मध्ये कॉंग्रेस च्या अध्यक्ष झाल्या आणि परत पक्षाला प्रतिष्ठा मिळवून दिली. २००४ आणि २००९ ह्या दोन्ही वेळा काँग्रेसने लोकसभेची निवडणूक जिंकली. इतर अनेक राज्यातही काँग्रेसची सरकारे निवडून आली. १९९६ पासून २०१७ पर्यंत काँग्रेस अध्यक्षा होत्या जे त्यांच्या तब्येतीखातर पुत्र राहुल गांधींकडे सोपवले गेले.
कर्तुत्वाचे आंतरराष्ट्रीय कौतुक :
- १९९९ लोकसभा निवडणूक कॉंग्रेस हरल्यामुळे बीजेपी चे सरकार आले होते. तेंव्हा सोनियांनी विरोधी पक्षनेता म्हणून काम पहिले. त्यानंतर पुढच्या निवडणुकीत चांगले यश मिळून त्यांनी इतर प्रादेशिक पक्षांबरोबर युती करून UPA सरकार स्थापन केले आणि स्वत: पंतप्रधान न होता मनमोहन सिंह सारख्या उत्तम अर्थतज्ञाला पंतप्रधान केले. त्याही वेळी त्यांच्या विदेशीपणाचा मुद्दा चर्चिला गेला पण बऱ्याच लोकांना माहित नाही की भारतीय नागरिकत्व स्वीकारल्याबरोबर त्यांचे इटालीयन नागरिकत्व रद्द झाले कारण भारत द्वी नागरिकत्व देत नाही.
- तरी पण ह्या कुठल्याही वादात त्यांनी जास्त लक्ष दिले नाही. हिंदी भाषा शिकून अगदी मोजक्या आणि प्रभावी शब्दात भाषणे करून त्यांनी लोकांचे मन जिंकले. अगदी नंदुरबारसारख्या आदिवासी पाड्यातून कुपोषित बालकांचा प्रश्न असो की माहितीचा अधिकार आणि मनरेगा सगळीकडे बारीक लक्ष देऊन काम केले. त्यामुळे फोर्बस मॅगझिन चा “वर्ल्ड मोस्ट पॉवर फुल वूमन” हा मानाचा किताब २००७, २०१० आणि २०१३ साली मिळाला.
- Times चा २००७ आणि २००८ “१०० मोस्ट इन्फ़्लुएन्शनल” व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश झाला. मद्रास युनिवर्सिटी ने २००८ साली ऑनररी डॉक्टरेट दिली. बेळगाव सरकारचे “Order of King Leopard” हा किताब मिळाला. आणि २००६ मध्ये ब्रुसेल्स युनिवर्सिटी ने ऑनररी डॉक्टरेट दिली.
- इतके कष्ट आणि अजून सक्रिय राजकारण करताना त्यांना कॅन्सर ने गाठले. अमेरिकेत जाऊन उपचार करून पुन्हा २०१९ च्या निवडणुकीची तयारी करीत आहेत. त्यांच्या विदेशी पणावर, अलोट संपत्तीबद्दल, १० जनपथ वरील निवास स्थानाबद्दल टीका होते पण त्यांनी केलेल्या त्यागाबद्दल कोणीच बोलत नाही. कोणी त्यांनी वेट्रेस चे काम केले होते ह्याबद्दल बोलले पण परदेशात सुट्टीत सगळीच मुळे काम करतात आणि स्वावलंबन करतात हे लोक विसरले.
- पण यश, अपयश, टीका, स्तुति, मान, अपमान काहीही असले तरी त्यांचा शांत, गूढ चेहरा काहीही प्रतिक्रिया देत नाही. बोफोर्स वरून एव्हडी टीका झाली पण त्यांनी एकही टीकेला उत्तर न देऊन आपले मोठेपण ,खानदानीपण दाखवून दिला.
- एका विदेशी पुरुषाने १८८५ मध्ये काँग्रेस पक्ष स्थापन करण्यास हातभार लावला आणि दुसऱ्या विदेशी बाई ने २१व्या शतकात पक्षाला तारले.