Shivneri Information in Marathi
शिवनेरी माहिती
- मराठा साम्राज्याची साक्ष देणारा शिवनेरी किल्ला बालेकिल्ला म्हणून ओळखला आहे. अनेक ऐतिहासिक घटनांची साक्ष देणारा हा किल्ला आहे. हा किल्ला महाराष्ट्रातील पुण्यापासून १०५ किलोमीटर अंतरावर जुन्नर या गावाच्यापाठीशी आहे. केंद्र सरकारने २६ मे, १९०९ रोजी या किल्ल्याला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले. हा गिरिदुर्ग असून याची उंची ३५०० फुट आहे. ऐतिहासिक घटना
- छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याच शिवनेरी गडावर झाला. जिजाबाईंच्या वडीलांच्या हत्येनंतर, गरोदर जिजाऊ यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने शहाजीराजांनी ५०० सैनिकांच्या मदतीने त्यांना शिवनेरीगडावर नेऊन ठेवले. जिजाऊंनी शिवाई देवीला नवस केला की पुत्र झाल्यास तुझे नाव ठेवीन. आणि १९फेब्रुवारी, १६३० रोजी शिवाजी महाराजांचा जन्म झाला. १६३२ सालपर्यंत जिजाऊ शिवबासोबत गडावर राहिल्या.
- जुन्नर हे गाव इसवी सन पूर्व काळापासून ‘जीर्णनगर’ किंवा ‘जुन्नेर’ य नावाने प्रसिद्ध आहे. पूर्वी येथे शक राजा नहपानाची राजधानी होती. त्यानंतर सातवाहन राजा सातकर्णी याने शकांचा पाडाव करून जुन्नर आपल्या ताब्यात घेतला. नाणेघाट या पुरातन व्यापारी मार्गावरून त्यावेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असे म्हणून सुरक्षिततेसाठी दुर्गांची निर्मिती करण्यात आली. सातवाहनांच्या सत्तेत येथे अनेक ठिकाणी लेणी खोदल्या गेल्या.
- त्यानंतर शिवनेरीवर चालुक्य व राष्ट्रकूट राजवट आली. ११७० – १३०८ य काळात यादवांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आणि शिवनेरीला गडाचे स्वरूप दिले. इ.स. १४४३ मध्ये मलिक– उल–तुजार याने यादवांकडून हा किल्ला काबीज केला. त्यानंतर १४७० मध्ये या गडावर मलिक महंमद व त्यानंतर निजामशाही स्थापन झाली. इ.स. १५९५ मध्ये शिवनेरी किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आले.
रचना
- शिवनेरीच्या चारही बाजूंनी कठीण चढाव असल्याने तो जिंकायला अतिशय कठीण आहे आणि ज्या बाजूला नैसर्गिक संरक्षण नाही तिथे सात दरवाजे आणि भक्कम तटबंदी उभारण्यात आली आहे. किल्ल्यावर शिवाई मातेचे मंदिर व जिजाबाई आणि शिवबा यांच्या प्रतिमा आहेत. किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीप्रमाणे भासतो. सात दरवाजाच्या वाटेने जाताना पाचव्या दरवाजाच्या उजव्या बाजूला शिवाई देवीचे मंदिर आहे. मंदिरामागच्या कड्यात काही गुहा आहेत. शेवटचा दरवाजा पर करून किल्ल्यात येताच समोर दिसतो अंबरखाना. याचा उपयोग पूर्वी धान्य साठविण्यासाठी केला जाई.
- १६७३ मध्ये डॉ. जॉन फ्रायर याने किल्ल्याला भेट दिली तेव्हा त्याने उल्लेख केला होता की किल्ल्यावर हजार कुटुंबाना सात वर्ष पुरेल एवढे धनधान्य आहे. या अंबरखान्याची आता मात्र खूप पडझड झाली आहे. अंबरखान्यापासून दोन वाटा निघतात त्यातील एक कोळी चौथरा असलेल्या टेकडीवर जाते तर दुसरी शिवकुंजापाशी जाते. शिवकुंजावर छोट्या शिवबाचा हातात तलवार घेऊन जिजाऊंसोबत पुतळा आहे. त्यासमोर कमानी मशीद आहे. येथून पुढे चालत गेल्यास हमामखाना लागतो व त्यापुढे शिवाजीराजांचा जन्म झालेली दुमजली इमारत आहे. इमारतीसमोर बदामी पाण्याची टाकी आहे. इथून पुढे चालत गेल्यास कडेलोट टोक आहे जिथे पूर्वी गुन्हेगारांना कडेलोटाची शिक्षा दिली जाई.
- महादेव कोळी लोकांनी मोगलांविरुद्ध बंद करून जुन्नर व शिवनेरीचा ताबा घेतला होता तेव्हा मोगलांनी महादेव कोळ्यांवर आक्रमण करून जवळपास १५०० कोळ्यांना बंदी केले. त्यांचे अतिशय हाल करून सर्वांचा शिरच्छेद केला. या घटनेची आठवण म्हणून तिथे एक चौथरा व त्यावर घुमट बांधण्यात आला. हाच तो कोळी चौथरा. घुमटावर फारशी भाषेत लिहिलेले दोन शिलालेखही आहेत.
प्रेक्षणीय स्थळे
- शिवनेरी दुर्गात सुमारे ७८ विहार, ३ चैतन्यगृह आणि जवळपास ६० पाण्याची कुंड आहेत. तसेच जवळपास ५० पाण्याच्या टाक्या आहेत. काही बांधलेल्या आहेत तर काही कोरलेल्या आहेत. पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये म्हणून काही टाक्या तर चक्क कातळात कोरलेल्या आहेत व त्यावर दगडाचे छत कोरले आहे. तेथील गंगा जमुना हि टाकी उत्तम बांधकामाचा नमुना आहे. दुर्गाच्या परिसरातील काही लेणी तर दोन हजार वर्षे जुनी आहेत. काही लेण्यांमध्ये प्राचीन शिलालेख आहेत परंतु त्यांचा अजूनही संदर्भ लागला नाही. जाण्यासाठी मार्ग
- गडावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. जुन्नर शहरातील बसस्टँड समोर एक चौक आहे त्यातील डाव्या बाजूचा रस्त्याने चालत गेल्यावर उजव्या कडेला एक मंदिर लागते. मंदिरासमोर पायवाट आहे जी शिवनेरी किल्ल्यापाशी जाते. इथे कातळात खोदलेल्या पायर्या आहेत व सुरक्षेसाठी साखळ्या लावल्या आहेत. या वाटेलाच साखळ्यांची वाट म्हणतात. या वाटेने गडावर जाण्यास सुमारे पाऊण तास लागतो.
- दुसरी वाट शिवाजीच्या पुतळ्यापासून डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत गेल्यास लागते. ती वाट गडाच्या पायथ्याशी पोहचते. या वाटेने येताना सात दरवाजे लागतात. महादरवाजा, पीर दरवाजा, परवानगीचा दरवाजा, हत्ती दरवाजा, शिपाई दरवाजा, फाटक दरवाजा आणि शेवटचा कुलाबकर दरवाजा. या मार्गे किल्ल्यावर पोहचण्यासाठी दीड तास लागतो. परंतु शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेला हा किल्ला सर्वच मराठी मनांना भुलवत राहतो.
Best information
very nice informaton