Sant Muktabai Information in Marathi
बाल योगिनी – मुक्ताबाई माहिती
“योगी पावन मनाचा साही अपराध जनांचा | विश्व पेटता रे वन्ही संत मुखे व्हावे पाणी |“
संत मुक्ताबाई माहिती
- ज्ञानियांचा राजा प्रत्यक्ष ज्ञानदेवांना उपदेश करणारी ही चिमुकली म्हणजे त्यांची धाकटी बहीण मुक्ताबाई !
- तिने भल्या भल्या संतांना आणि योग्यांना आपल्या तेजस्वी, ज्ञान पूर्ण, आणि सडेतोड शब्दात ठणकावले होते.
- लहान असून निवृत्ति, सोपान आणि ज्ञानदेवांची ती आई बनली होती. अशी ही विजेसारखी तल्लख आणि तेजस्वी मुक्ताबाई ही बाल योगिनी होती.
- मुक्ताबाई विठ्ठल गोविंद कुलकर्णी आणि रुक्मिणी ह्यांचे शेवटचे अपत्य.
जीवन आणि बालपण :
- तिचा जन्म १२७९ साली झाला. विठ्ठलपंत वेदशास्त्र संपन्न देशस्थ ब्राम्हण होते.
- त्यांना आधीपासूनच परमार्थाची आवड होती. म्हणून लग्नानंतर ते यात्रा करायला गेले आणि रामानंद स्वामींच्या सहवासात राहून त्यांनी संन्यासाची दीक्षा घेतली. इकडे रुक्मिणीने घोर व्रत वैकल्य सुरू केले.
- रामानंद स्वामींना जेंव्हा हे कळले की विठ्ठलपंत विवाहित आहेत तेंव्हा त्यांनी विठ्ठल्पन्ताना गृहस्थाश्रम परत स्वीकारायची आज्ञा केली. विठ्ठलपंत परत आले आणि ते कुटुंब आपेगावला संसार थाटून राहिले.
- त्यांना निवृत्ति, सोपान ज्ञानदेव आणि मुक्ता अशी चार अपत्ये झाली. त्यांनी मुलांना पण वेद शिकविले. आणि जेंव्हा त्यांच्या मुंजीची वेळ आली तेंव्हा गावातील धर्म मार्तंडानी त्यांना वाळीत टाकले. कारण संन्याशाच्या मुलांना मुंजीचा हक्क नाही.
- शेवटी खूप विनवणी केल्यावर त्यांनी प्रायश्चित्त सांगीतले ते म्हणजे देहांत. मुलांना समाजाने अंगीकारावे म्हणून माता पित्याने आपली जीवनयात्रा संपवली आणि ही चार भावंडे पोरकी झाली.
- एका दिवसात मुक्ताबाई समंजस आणि मोठी झाली. आणि भावांना खाऊ पिऊ घालू लागली. चार ही भावांमध्ये तिचे ज्ञानदेवांशी जास्त पटत होते. आई बाबांच्या मृत्युच्या आधी हे लोक त्र्यंबकेश्वरला गेले असताना निवृत्तिला गहिनीनाथांनी नाथपंथाची दीक्षा दिली.
- त्यांच्या आजोबांना पण गोरक्ष नाथांनी अनुग्रह दिला होता. नंतर ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई निवृत्तीनाथांचे शिष्य झाले आणि त्यांनी योगाचे ज्ञान आत्मसात केले. असे म्हणतात की त्यांनी ह्या सामर्थ्यावर खूप चमत्कार केले.
- एकदा मुक्ताबाई पूरण पोळ्या करू पाहत होती पण तिला तवा आणि जळण मिळाले नाही तेंव्हा ज्ञानदेवाने तिला त्यांच्या पाठीवर पोळ्या भाजायला सांगितल्या आणि पाठ योगाने तापवून पोळ्या भाजून घेतल्या.
- जेंव्हा संत चांगदेव त्यांना भेटायला मोठा शिष्य समुदाय बरोबर घेऊन वाघावर बसून आले तेंव्हा ही भावंडे भिंत चालवून त्यांना सामोरे गेले. त्यामुळे चांगदेवांचे गर्वहरण झाले आणि ते मुक्ताबाईचे शिष्य झाले.
- तो काळ धर्माला ग्लानि आल्याने सगळीकडे गोंधळ आणि बुजबुजाट झाला होता. त्यावेळी सारे संत लोकांना प्रबोधन करून जनजागृती करीत होते. फक्त त्यांचे वेगवेगळे गट झाले होते.
- ही भावंडे पैठणला शुद्धिपत्र मागायला गेली तेंव्हा ज्ञानदेवांनी रेड्याकडून वेद म्हणवून घेतले. आणि सगळ्यांना त्यांच्या अलौकिकपणाची साक्ष पटली. परंतु ह्या भावंडांनी कुठलेही पत्र न घेता समाजासाठी आपले आयुष्य घालवायचे ठरवले. आणि बहुजन समाजाला धर्माची प्राकृत म्हणजे मराठीतून ओळख करून द्यायचे ठरवले.
कविता संरचना आणि साहित्य :
- तसेच तेंव्हा उदयास आलेला वारकरी संप्रदाय अभंग लिहून लोकांना धर्माची ओळख देत होते. मुक्ताबाई ने ही खूप चांगले अभंग लिहिले आहेत. पण सगळ्यात लोकप्रिय झाले ते तिचे ताटीचे अभंग.
- त्याचे असे झाले, कोणाच्या तरी कुत्सित अपमानकारक बोलण्याने ज्ञानदेव चिडले आणि झोपडीचा दरवाजा बंद करून स्वत:ला कोंडून घेतले.
- तेंव्हा मोठेपणाने आणि तरीही लडिवाळपणे समजुतीच्या स्वरात तिने ज्ञानदेवांना सांगीतले की “तुमच्यावर विश्वाचा भार आहे तेंव्हा तुम्ही तरूनी विश्व तारा, ताटी म्हणजे दरवाजा उघडा ज्ञानेश्वरा.”
- जणू काही ही भावंडे शापित देवलोकातील असावीत आणि लोकांना सन्मार्ग दाखविण्यासाठी त्यांनी जन्म घेतला आहे. असा प्रवाद आहे की मुक्ताबाई आदिशक्तीचे रूप होती. ती सडेतोड असल्याने तिने चांगदेव आणि नामदेव ह्यांचाही मुलाहिजा ठेवला नाही.
संत नामदेव विठ्ठलाचे परम भक्त म्हणून त्यांना अहंकार झाला होता .ते ज्ञानदेवांना भेटण्यास आले असताना निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव सर्वांनी त्यांना नमस्कार केला पण त्यांनी उलट नमस्कार नाही केला तेंव्हा मुक्ताई म्हणाली,
अखंड ज्याला देवाचा शेजार,
कारे अहंकार नाही गेला |
दिवस असता दिवा हाती घेसी |
आंधळ्याचे डोहाळे का बा झाले”
सगळे संत बसले असता कच्चे मडके म्हणून त्यांना गुरूची गरज आहे हे जाणवून दिले आणि ते विसोबा खेचर ह्यांचे शिष्य झाले. मुक्ताई ने हिंदी पण रचना केल्या आहेत.
वाहवा साहेबजी सद्गुरुलाल गुसाईजी लाल बीज मो उदीला काला, औठ पिठसो नीला|
मुक्ताबाईने रचलेल्या अभंगाची संख्या जास्त नाही तरी त्यात तिची प्रगाढ बुद्धिमत्ता, प्रज्ञा, अनुभवाची परिपक्वता आणि गेयता आढळून येते. अगदी लहान वयात समाजाच्या कठोर वास्तवाला सामोरे जावे लागल्याने ऐहिक जगाच्या बद्दल त्यांना विरक्ती आली आणि परमेश्वराचे एकरूपत्व समजून त्यांनी समाजाचा उद्धार केला.
जेंव्हा ज्ञानदेव आणि सोपान देवांनी समाधी घेतली तेंव्हा दु:खी होऊन त्या तापी तीरावर मेहूण गावी गेल्या असता वीज पडली आणि मुक्ताई त्यात अदृश्य झाली. एका सौदामिनीत दुसरी सौदामिनी एकरूप झाली. मुक्ताई मुक्त झाली.
This is too helpful…thanks Pratiksha di…thankyou so for you the best information about them…..I am so happy that I found this website once again