Sant Janabai Information in Marathi
नामयाची दासी – संत जनाबाई
संत जनाबाई माहिती
- तो तेराव्या शतकाचा काळ होता. धर्माला ग्लानि आली होती आणि कर्मकांडाचे महत्व वाढले होते. त्यातच मुसलमानी अंमलामुळे धर्मावर संकट आले होते.
- अशावेळी सर्व जातीतील सात्विक आणि थोर संतांनी भागवत धर्माचा प्रसार करून तसेच वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून सामान्य जनांना परत निर्मल, विशुद्ध आणि पूर्ण निष्काम भक्तीचा मार्ग दाखविला.
- संत ज्ञानदेव, तुकाराम, नामदेव, विसोबा, गोरा कुंभार, चोखामेळा, निवृत्ति सोपान मुक्ताबाई असे सर्व जातीतील संत महात्मे, फक्त विठ्ठलाच्या भक्तीने एक झाले आणि ह्या ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळीत नामदेवाचे बोट धरून आली जनाबाई! तिची ओतप्रोत वत्सलता, प्रेम, सख्य, आणि समर्पण तिच्या ओव्यातून प्रकट झाले आहे.
- नवविधा भक्तीचे नावही माहित नसलेली जनाबाई श्रवण, किर्तन, अहोरात्र स्मरण, अतिशय लीनतेने केलेले पाद सेवन, वंदन, अर्चन, दास्य आणि सख्य तसेच आत्मनिवेदन ह्या सगळ्या पायऱ्या ती सहजतेने पार पडते.
- “दळीता कांडिता तुज गाईन अनंता” असे म्हणत काबाडकष्ट करताना अखंड नामाचा जप करून तिने विठ्ठलाला आपलेसे केले.
- काबाडकष्टाचे तिला काहीच वैषम्य नव्हते. कारण तिला माहित होते की ती नामदेवाकडे आश्रित म्हणून राहिलेली होतो.
जीवन आणि बालपण:
- तिचा जन्म गंगाखेड येथे एका अस्पृश्य दलित कुटुंबात झाला. आईचे नाव करंद आणि वडीलांचे नाव दमा (रंड ) असे होते. ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे भक्त होते.
- त्यांनी पुत्र व्हावा म्हणून विठोबाला साकडे घातले .पण विठोबाने त्याला सांगीतले की त्याला गुणवान मुलगी होईल आणि तिला दामाशेटकडे ठेव.
- लवकरच त्यांना मुलगी झाली आणि थोड्याच दिवसात तिची आई वारली.
- रंड ने त्या मुलीला पंढरपूरच्या दामा शेट कडे सोडले. दामा शेटचे मोठे 14 माणसांचे कुटुंब होते आणि ते सर्वजण सात्विक प्रवृत्तीचे आणि विठ्ठलभक्त होते.
- जनाबाई त्यात सहज सामावून गेली. गरिबी, पोरकेपण आणि स्त्रीसुलभ सहनशीलतेने तिने सगळ्यांचे मन जिंकून घेतले.
- नामदेवांचा जन्म झाल्यावर त्यांना तिने सांभाळले आणि नंतर ते मोठे संत झाले तेंव्हा तिने अभिमानाने स्वत:ला “नामयाची दासी” हे नाव घेतले.
आयुष्य:
- नामदेवांबरोबर सगुण विठ्ठलाची भक्ती करता करता ती इतकी त्याच्यात विरघळून गेली की जिथे तिथे तिला विठ्ठलाचे अस्तित्व जाणवू लागले. “माय बाप बंधु भगिनी तू गा सखा चक्रपाणी” असे म्हणून ती पूर्णपणे विठ्ठलरूपी झाली.
- इतकी की तिच्या न संपणाऱ्या कामात तिला विठ्ठल सहाय्य करू लागला. सकाळी तिच्याबरोबर जात्यावर दळण करू लागला,धुणे धुवू लागला, गोवर्या थापू लागला.
- संत नामदेव आणि त्यांच्याकडे काम करणारी जनाबाई ह्यांना अशी प्रत्यक्ष परमेश्वराची अनुभूति झाली.
- नामदेव विठ्ठलाकडे लडिवाळ करत असे पण जनाबाईचा विठ्ठलच तिच्याकडे लडिवाळ करीत असे. “ धरिला पंढरीचा चोर “ असे म्हणून ती यशोदेसारखी विठ्ठलाला भाकरी पळवताना पकडे तर “ये ग ये ग विठाबाई, माझे पंढरीचे आई “ म्हणून त्याला माउलीचे रूप देई.
- तिच्या अभंगांमध्ये एक गेयता, गोडवा आणि भक्तीरस पुरेपूर भरला होता. तिच्या भक्तीचे एक वेगळेच रूप होते. दास्यभाव आणि पूर्ण एकरूपता यांचे अनोखे मिश्रण होते.
- त्यामुळे अनेक चमत्कार झाले आणि लोकांनी तिला संतपद बहाल केले. झाले असे, तिचे आणि एका बाईचे गोवर्या वरून भांडण झाले कबीर तेंव्हा जनाबाईच्या भेटीला आले होते. जेंव्हा जनाबाईने सांगीतले की माझ्या गोवर्यांमधून विठ्ठल असे नाम येईल.
- तर खरेच तिच्या गोवर्यांमधून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनि आला. काबिरांसारखा थोर संत तिच्यापुढे नत मस्तक झाला. असे म्हणतात की तिच्याकडे जेवायला आल्यानंतर विठ्ठल तेथेच वामकुक्षीसाठी लवंडला आणि घाई घाईने परत जात असता त्याचे दागिने तेथेच राहिले. आळ जनाबाईवर आला आणि तिला सूळावर देत असताना सुळा ऐवजी विठ्ठल लोकांना दिसला. भक्तीचा भुकेला विठ्ठल जनाबाईसाठी काय काय नाही बनला
जनाबाई म्हणते,
झाडलोट करी जनी |केर भरी चक्रपाणी ||
पाटी घेउनिया शिरी | नेउनिया टाकी दुरी||
ऐसा भक्तीला भुलला | नीच कामे करू लागला||
जनी म्हणे विठोबाला | काय उतराई होऊ तुला||
जनाबाईचे सर्व संतानी स्वागत केले आणि ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळीत ती पण सहजपणे सामावून गेली. ती विठ्ठलाला ह्या सर्व संतांमुळे लेकुरवाळा झाला असे म्हणाली.
विठू माझा लेकुरवाळा | संगे गोपाळाचा मेळा||
निवृत्ति हा खांद्यावरी | सोपानाचा हात धरी||
पुढे चले ज्ञानेश्वर | मागे मुक्ताई सुंदर||
गोरा कुंभार मांडीवरी | चोख जीवा बरोबरी||
बंका कडेवरी | नामा करांगुलि धरी||
जनी म्हणे गोपाळा करी भक्तांचा सोहळा||
कविता संरचना आणि साहित्य:
- जनाबाईने 300 अभंग लिहिले. ते नामदेवांच्या अभंगाबरोबर राहिले. तसेच कृष्णजन्म, थाळीपाक, प्रल्हादचरित्र, बालक्रीडा अभंग लिहिले.
- हरिश्चंद्र आख्यान असे आख्यान लिहिले. नामदेव हे तिचे गुरु, सखा, बंधु, सर्व काही होते त्यामुळे त्यांचे नाव तिने तिच्या प्रत्येक अभंगात “नामयाची जनी” असे लिहिले.
- आपले दलित असणे, पोरके असणे आणि आश्रित असणे तिने सहजपणे स्वीकारले होते तरीही बालसुलभ आणि स्त्रीसुलभ भावना तर होत्याच ना? त्या तिच्या काव्यातून दृग्गोचर झाल्या.
जनाबाईने निरागसतेने आपली सुख दु:ख भाव भावनांना विठ्ठलाकडे वाट करून दिली. तिचे सर्वस्व विठ्ठलच होते. ती म्हणते
माय मेली बाप मेला | आता सांभाळी विठ्ठला ||
मी तुझे ग लेकरू| नको मजसी अव्हेरू ||
नाही केली तुझी सेवा | दु:ख वाटतसे जीव||
- अशी विठ्ठलरंगी रंगलेली जनाबाई हे परमेश्वराशी होणार्या अद्वैताचे उत्तम उदाहरण आहे. मुमुक्षूसाठी एक निर्गुण भक्तीचा आदर्श आहे.
- देव भेटावा, देव पावावा म्हणून कर्मकांड नको, घोर साधना नको की उत्सव नगारे नको, केवळ त्या एकाच ईश्वरात पूर्ण समर्पण केले, त्याच्याशी सख्य जोडले तर तुम्हाला निश्चित देव प्राप्त होईल हे ह्या कुठलेही वेद, धर्मग्रंथ किंवा अध्ययन न केलेल्या सामान्य, नव्हे असामान्य स्त्रीने दाखवून दिले.
- नामदेवांबरोबर विठ्ठल भक्ती करता करता १३५० साली ती नामदेवांबरोबर स्वर्गवासी झाली.