Ramdas Athawale Information in Marathi
रामदास आठवले – रिपब्लिकन पक्षाचं आज महाराष्ट्रातलं प्रभावशाली नेतृव
रिपब्लिकन पक्ष (आठवले गटाचे) नेते, महाराष्ट्रात दलित सामाजाचा एक मोठा नेता म्हणून रामदास आठवले यांच्याकडे बघितला जातं. आज रिपब्लिकन पक्षाची अवस्था एवढी मजबूत नसतांना, आठवलेंनी मात्र राजकारण आणि समाजकारणात आपला दबदबा कायम ठेवलाय. त्यांची कपडे घालण्याची स्टाईल आणि भाषणांमध्ये कविता करण्याची लकब यामुळे आठवलेंची लोकप्रियता सर्व सामान्य जनतेत अजूनही कायम आहे.
रामदास आठवलेंची स्टाईल आणि त्यांच्या कविता आज त्यांचा “यूएसपी (unique selling points)” ठरलीये. साठी ओलांडलेले आठवले आता राज्य सभेचे सभासद व केंद्र सरकारमध्ये मंत्री देखील आहेत आहेत. दलित पँथरचा झुंजार कार्यकर्ता ते भारतीय संसदेत कवितांचा मारा करणारा खासदार असा रामदास आठवलेंचा जीवनप्रवास मोठा रंजक आहे.
शिक्षण व बालपण : Childhood and Education
- रामदास बंडू आठवले यांचा जन्म २५ डिसेंबर १९५९ सांगली जिल्ह्यात आगळगाव इथे झाला. १९६० च्या दशकात महाराष्ट्रत जातीभेद मोठ्याप्रमाणात होता. दलितवस्ती गावाबाहेर आणि दलित घराच्या उंबरठ्याबाहेर अशीच परिस्थिती होती.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीनंतर बहुतेक दलित समाजानं बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. पण त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीत फारसा फरक पडला नव्हता. आणि अशाच सामाजिक अवस्थेत रामदास आठवले आपलं शिक्षण घेत होते.
- सामाजिक विषमतेबाबत त्यांच्यात चिड निर्माण झाली होती ती शाळेच्या दिवसांपासूनच, शाळेपासून मिळणार वेगळी वागणूक कुठे ना कुठे त्यांना बंड करायला प्रवृत्त करित होती. त्यातचं पुढच्या शिक्षणासाठी त्यांनी मुंबई गाठली.
राजकीय जीवनाची सुरुवात – दलित पँथर
- रामदास आठवलेंच्या राजकीय जीवनाची सुरुवात दलित संघर्षातून झाली.
- साधारण १९७५ च्या आसपास आठवले मुंबईत दाखल झाले. आणि त्यांनी गाठलं ते सिद्धार्थ कॉलेज. सिद्धार्थ कॉलेज आणि सिद्धार्थ कॉलेजचं वसतीगृह तेव्हा सामाजिक चळवळींच केंद्र बनले होतं.
- खासकरुन दलित चळवळीच केंद्र सिद्धार्थ कॉलेज बनलं होतं. दलित समाजातले बरेच तरुण शिक्षणासाठी सिद्धार्थ कॉलेज गाठत होते आणि तिथे त्यांच्यातल्या असंतोषाला इथं वाचा फुटत होती. अशा वातावरणात रामदास आठवलेंची गाठ पडली ती राजा ढाले यांच्याशी – राजा ढाला तेव्हा ‘दलित पँथर’ या संघटनेचं काम करत होते.
- सिद्धार्थ वसितीगृहाच्या रुम नंबर ५०मध्ये राजा ढाले आणि रामदास आठवले सोबत राहत होते. राजा ढालेंनी रामदास आठवलेंना दलित पँथरमध्ये सामिल केलं आणि खऱ्या अर्थानं रामदास आठवलेंच्या मनातल्या असंतोषाला एक मार्ग मिळाला.
- आठवले दलित पँथरच्या माध्यमातून वेगवेगळ्या कामांमध्ये सहभागी होत होते. मोर्चा काढण्यापासून ते दलितांच्या हक्कासाठी दगड उचलण्यापर्यंत रामदास आठवले सर्वस्तरावर दलित पँथरमध्ये सक्रीय होते. याचं माध्यमातून त्यांची अनेक मोठ्या दलित नेत्यांशी भेट होत होती.
- १९७७ मध्ये त्यांच्या दलित पँथरच्या संघटकपदी नियुक्ती झाली. तिथून रामदास आठवलेंनी आपल्या नेतृत्वाची छाप पाडायला सुरवात केली. दलितांचा फायर ब्रँड नेता अशी त्यांची प्रतिमा तयार होत होती. दलित पँथर संघटना म्हणून आणि रामदास आठवलेंचं नेता म्हणून वर्चस्व प्रस्थापित होत होतं. अशावेळी दलितांसाठी वेगवेगळ्या संघटना नको, सर्व दलित संघटनांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये सहभागी व्हावं असं आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आणि रामदास आठवले यांनी त्यांला प्रतिसाद देत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये सहभागी झाले.
- त्याचवेळी शिवसेना अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या “Riddles of Hinduism (रिडल्स ऑफ हिंदुजम)” या पुस्ताकाला विरोध केला. तेव्हा रामदास आठवलेंच्या नेतृत्वात दलितांनी मुंबईत मोर्चा काढत, दलितांची ताकद दाखवून दिली होती.
- दलित संघटना एकत्र आल्यातर काय होऊ शकत यांची झलक या मोर्च्यातून दिसून आली. त्याचवेळी रामदास आठवलेंचं नेतृत्वही प्रस्थापित झालं.
महाराष्ट्रातील मंत्रिपद :
- दलित संघटनांच्या ताकदीमुळे प्रस्थापीत काँग्रेस आणि शिवसेनेलाही धडकी भरली होती. नेमकं त्याचवेळी, राज्यात सरकार स्थआपनेसाठी काँग्रेसला पाठिंबा द्यायचा की जनता पक्षाला यावरुन रिपब्लिकन पक्षात फुट पडली. प्रकाश आंबेडकर यांचा काँग्रेसला पाठिंबा द्यायला विरोध होता. त्याचवेळी रामदास आठवलेंनी काँग्रेसला पाठिंबा दिला. आणि मुख्यमंत्री शरद पवार यांनी रामदास आठवले यांच्याकडे समाजकल्याण खात्याची जबाबदारी सोपवली. आणि रामदास आठवले यांनी सिद्धार्थ कॉलेजच्या वसतीगृहातून थेट मंत्रालय गाठलं.
- आठवलेंच्याच कारकिर्दीत, १९९४ मध्ये मराठवाडा विद्यापिठाचं “डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवा विद्यापिठ” असं नामांतर करण्यात आलं. काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबत रामदास आठवलेंचा प्रवास झाला तो २००९ पर्यंत सुरु होता.
- दरम्यानच्या काळात पंढरपूरमधून रामदास आठवले लोकसभेवर निवडूण ही गेले. पण एकावेळी दलितांसाठी लढणारे रामदास आठवलेंना सत्तेची चटक लागली, आणि त्यांनी दलितहीत बाजूला ठेवलं असा आरोप त्यांच्यावर लागू लागला. आठवले सत्तेत राहण्यासाठी काहीही करू शकतात असा आरोप अनेक दलित नेतेच त्यांच्यावर करू लागले.
- २००९ च्या लोकसभा निवडणुकीत रामदास आठवलेंचा पंढरपूरमधून पराभव झाला. आणि तिथूनच रामदास आठवले आणि शरद पवार यांच्या नात्यात दरी निर्माण झाली.
- रामदास आठवलेंनी शरद पवारांची साथ सोडत थेट मातोश्री गाठलं. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली. हा अध्याय होता शिवशक्ती-भीमशक्तीचा, शिवसेना-भाजपसोबत जाण्याचा धाडसी निर्णय रामदास आठवलेंनी घेतला. आठवलेंची ही कृती दलित समाजाला फारसी रुचली नाही. बाळासाहेब ठाकरेंचा नामांतराला असलेला विरोध, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकाला असलेला विरोध, शिवसैनिक आणि दलित कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामाऱ्या, हा सगळा इतिहास आठवले विसरले असा आरोप झाला.
- पण दलित समाजातून होणाऱ्या विरोध असतानाही आठवले, शिवसेना-भाजपसोबत गेले. रामदास आठवलेंची ही खेळी त्यांच्यांपथ्यावर पडली. एकूणच देशात काँग्रेस विरुद्ध असलेलं वातावरण आणि मोदी लाट यांच्या जोरावर भाजपनं केंद्रात २०१४ मध्ये सत्ता प्रस्थापित केली. काळाची पावलं पुन्हा एकदा रामदास आठवलेंनी ओळखली होती.
- २०१४च्या महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये शिवसेना व भाजप वेगवेगळे लढले. आणि ज्या सेनेसोबत आठवलेंनी शिवशक्ती-भीमशक्तीचा नारा दिला होता. त्या सेनेची साथ सोडून त्यांनी भाजपकडे मैत्रीचा हात पुढे केला. पुन्हा एकदा भाजपला जवळपास बहुमत मिळाले आणि आठवलेंचा निर्णय योग्य ठरला!
- आपल्या कारकिर्दीत सत्तेसाठी रामदास आठवलेंनी आपल्या तत्वांशी कायम तडजोड केली असा आरोप दलित नेते करतात. त्यामुळेच काँग्रेस,राष्ट्रवादी, शिवसेना असा प्रवास करत आज ते भाजपसोबत आहेत. रिपब्लिकन पक्षाची अधोगती सुरु असतांना, रामदास आठवलेंनी मारलेल्या उड्यांनी त्यांना तारलं हे ही मान्य करावचं लागेलं.