Phlox Flower Information in Marathi
Phlox Flower – फ्लॉक्स माहिती
- फ्लॉक्स हे पॉलिमोनियेसी वर्गातील छोटे से रोप आहे. ह्या फुलांच्या जवळपास ६० प्रजाती आढळून येतात. निळ्या, गुलाबी, लाल, केशरी, जांभळ्या किंवा पांढऱ्या रंगाची ही फुले झुपक्याने उमलतात. त्यामुळे बागेत सुंदर रंगीत गालीचा पसरल्याप्रमाणे वाटतो. मॉस पिंक किंवा ग्राउंड फ्लॉक्स नावाने ओळखल्या जाणाऱ्या फ्लॉक्स सुबुलेटा नावाची प्रजाती बागेमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येते. फ्लॉक्स हा ग्रीक शब्द आहे ज्याचा अर्थ आहे ‘ज्वाला.’ ह्या फुलांच्या तेजस्वी आणि उज्जवल रंगांमुळे असे कदाचित ह्या फुलांना हे नाव पडले असावे.
- फ्लॉक्स फुलाच्या काही प्रजाती वसंत ऋतूच्या सुरुवातीस फुलतात तर काही ग्रीष्म ऋतूमध्ये उमलतात. यातील बहुतेक प्रजाती मूळच्या समशीतोष्ण कटिबंधातील आहेत पण काही प्रजाती ईशान्य आशियामधील देखील आहेत. फ्लॉक्सच्या प्रजाती मूळतः उत्तर अमेरिकेतील असल्या तरीही १८०० च्या सुरुवातीच्या काळात इंग्लंडमध्ये देखील ह्या फुलांची लागवड केली जात होती. आजही ही रोपे बागेत व जंगलात देखील आढळून येतात.
- ह्या बारमाही वनस्पतीला उन्हाळ्यापासून शरद ऋतूपर्यंत नेहमी फुले येतात व हिवाळ्यात ह्यांना फुले येत नाहीत. ह्या फुलाला सामान्यतः पाच पाकळ्या असतात आणि ह्या फुलांचा आकार लहान म्हणजे २.५ सेमीपर्यंत असतो.
- याची पाने लांब, निमुळती व समोरासमोर असतात. काही प्रजाती उंच वाढतात तर काही प्रजाती गालीच्याप्रमाणे पसरतात. ही फुले विविध रंगात तसेच दोन रंगांच्या रंगछटा असेलली देखील असतात. ह्या फुलांकडे फुलपाखरे आकर्षित होतात व त्यामुळे बागेची शोभा अधिकच वाढते.
- फ्लॉक्स फुलांना भरपूर किंवा माफक सूर्यप्रकाश आणि ओलसर माती मानवते. ही फुले नाजूक दिसत असली तरीही नाजूक नसतात आणि म्हणूनच त्यांची फारशी काळजी घ्यावी लागत नाही.
- ह्या फुलांना थंड हवामान मानवत असल्या कारणाने युरोप किंवा उत्तर अमेरिकेसारख्या ठिकाणीच ही फुले आढळून येतात.
- ही फुले जितकी सुंदर दिसतात तेवढीच उपयोगी देखील आहेत. निळ्या जंगली फ्लॉक्सच्या संपूर्ण रोपाचा चहा पोट आणि आतड्यांच्या समस्यांवर उपाय म्हणून पितात. हा चहा अपचन व पोटदुखीवर गुणकारी समजला जातो.
- फोल्क्सच्या सुकलेल्या पानांचा काढा रक्त शुद्ध करण्यासाठी आणि त्वचेचे विकार बरे करण्यासाठी घेतला जातो. मूळ आदिवासी लोक ह्या रोपाचा विविध आजारांमध्ये उपयोग करतात. ह्याची मुळे वेदनेपासून व सर्दीपासून आराम मिळण्यासाठी वापरली जातात. ही मुळे ठेचून अंगावर चोळली जातात. तसेच लहान बाळांची पोटदुखी बरी करण्यासाठी देखील ह्यांचा वापर केला जातो.
- अशक्त मुलांना सुदृढ करण्यासाठी आदिवासी लोक ह्या रोपाच्या विविध भागांचा उपयोग करतात. ह्या रोपांच्या मुळांचा काढा अतिसारावर रामबाण उपाय आहे तसेच ही मुळे उकळून त्याचे पाणी डोळ्यांच्या रोगामध्ये वापरले जात असे.
- शायान इंडियन्स जमातीमधील लोक ह्या रोपाच्या पानांचा उपयोग अंगाचा सुन्नपणा घालवण्यासाठी करत. फ्लॉक्सची पाने व फुले अंग धुण्यासाठी वापरत. या फुलांच्या औषधी गुणधर्माशिवाय इतरही महत्व होते. व्हिक्टोरियन काळात इंग्लंडमधील तरुण स्त्रिया या फुलांचे पुष्पगुच्छ आवडीने घेऊन जात असत. त्या काळी हे फुल प्रेमाच्या मागणीच्या आणि आनंददायी स्वप्नांच्या इच्छेचे प्रतिक होते.
I like such flowers…it is cute, and its health application is also too good