Naming Ceremony Information in Marathi
नामकरण / बारसे माहिती :
शेक्सपिअरने म्हटले होते की ‘नावात काय आहे?’ पण तसे पहायला गेले तर नावातच सर्व काही आहे. एखाद्या गोष्टीचे नावच माहित नसेल तर त्याबद्दल तुम्ही सांगणार कसे? एखाद्या व्यक्तीचे नावच माहित नसेल तर त्याला बोलावणार कसे? म्हणूनच लहान बाळ जन्माला येताच त्याचे नाव ठेवतात आणि आयुष्यभर ते नाव त्याची ओळख बनून राहते. हेच नाव त्याच्या शाळेत, कॉलेज आणि इतर सर्व व्यवहारात उपयोगी पडते. बरेच लोक बाळांची दोन नावे ठेवतात, एक म्हणजे जन्मनाव जे पत्रिकेत लिहितात व शुभकार्याच्या वेळेस वापरतात आणि दुसरे असते व्यवहारिक नाव जे दैनंदिन व्यवहारात वापरतात.
हिंदू रिती-रिवाजाप्रमाणे बाळ जन्माला आल्यापासून बाराव्या दिवशी बाळाचे नाव ठेवले जाते. म्हणूनच या दिवसाला बारसे किंव्हा नामकरण असे संबोधतात. लग्न समारंभ, साखरपुडा, मुंज या प्रमाणेच बारसे देखील खूप उत्साहाने आणि धूम-धडाक्यात करण्याची प्रथा आहे. बाळाच्या चांगल्या व सुंदर जीवनासाठी बारस हे विविध पारंपारिक पद्धतीने केले जाते. बाळाचे नाव ठेवण्यापासून ते त्याला पाळण्यात घालण्या पर्यंत बरेच विधी केले जातात. सुरवातीच्या काळात लोक सर्व विधी पूर्णपणे पार पडत होते पण बाळाच्या नावा विषयी तितके उस्ताही नसायचे.
बाळाला त्यांच्या घराण्यातील एखाद्या मृत वडिलधाऱ्या व्यक्तीचे नाव ठेवले जायचे. सहसा आजोबाचे किंवा पणजोबाचे नावच बाळाला ठेवले जायचे. परंतु हल्ली सर्व लोक आपल्या बाळाचे नाव सगळ्यांपेक्षा वेगळे असेल याचा प्रयत्न करतात. पौराणिक किंवा वैदिक नाव ठेवण्याची देखील रीत आजकाल दिसून येते. एखादे वेगळे नाव ज्याला काहीतरी छान अर्थ असेल असे नाव ठेवण्याकडे पालकांचा कल असतो. आपल्या भारतीय संस्कृतीत बाळाचे नाव ठेवण्याचा अधिकार हा आत्याचा असतो. पण आता परिस्थिती बदलेली आहे, बाळाचे नाव हे त्याचे आई-बाबाच ठेवतात. आपल्याकडे जसे लग्नाचे मुहूर्त पहिले जातात तसेच नामकरण करण्याचा पण दिवस व वेळ ठरवली जाते.
आपल्या भारतात अनेक जाती धर्माचे लोक राहतात व त्याच प्रमाणे त्यांच्या अनेक रूढी परंपरा व वेगवेगळे सण आहेत. सण साजरे करण्याच्या पद्धती पण वेगवेगळया आहेत. तसेच बारस करण्याच्या पद्धती पण वेगवेगळ्या आहेत. बारस हे आपल्या बाळाच्या आयुष्यातला पहिला संमारभ आसतो. हिंदू संस्कृतीत बाळाचे नाव व त्याचे पहिले अक्षर काय असावे हे ब्राह्मणाला विचारले जाते. बाळाची जन्मवेळ व जन्मवार यावरून त्याचे जन्मनाव ठेवले जाते. आणि पाळण्यात घालताना हे नाव ठेवले जाते. ब्राह्मणाकडून ठेवलेले नाव कायम उचित ठरते. कारण ते नाव सर्व काळ वेळ आणि ग्रहांची दिशा पाहून ठरवलेले असते.
बारश्याचा समारंभ / नामकरण विधि मराठी :
बाळाच्या बारश्याच्या दिवशी कुटुंबातील जवळचे व लांबचे सर्व नातेवाईक बोलावले जातात. पूर्वी तोंडी निमंत्रण (INVITE) देत परंतु आता खास पत्रिका चपल्या जातात आणि ऑनलाईन मेसेज देखील पाठवले जातात. ह्या दिवशी आत्याचा मान मोठा असतो म्हणून आत्याला खास निमंत्रण असते. म्हणून आत्याला पण ह्या दिवसाची खूप आवड असते. बाळाचा पाळणा फुलांनी आणि फुगे तसेच सजावटीच्या सुंदर माळा लावून सजवला जातो. पाळण्याभोवती छान रांगोळी काढली जाते. पाळण्याच्या चारही पायांच्या जवळ व पाळण्याच्या खाली पिठाच्या पणत्या ठेवतात. बारश्याला सुरवात करण्यापूर्वी पाच सुवासिंनीना बोलावले जाते. त्या खास करून आत्याच असतात किंवा जवळच्या नातेवाईकांपैकी असतात.
काही ठिकाणी बाळाला पाळण्यात घालण्यापूर्वी वरवंट्याला कपडा गुंडाळून आणि चैन घालून पाळण्यात घालतात. पाळण्याच्या दोन्ही बाजूंना सुवासिनी उभ्या राहतात आणि हा वरवंटा पाळण्यात ठेवून परत बाहेर काढतात आणि समोरच्या सुवासिनी कडे देतात. असे पाच वेळा करतात आणि असे करताना ‘कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या’ असे म्हणतात. मग बाळाला पाळण्यात घालतात. नंतर बाळाला पाळण्याच्या खाली वर पाच वेळा करतात. या नंतर आत्या बाळाच्या कानात जे नाव ठरवलेलं असते ते सांगते व ‘कुर्रर’ असा आवाज करते व त्याच दरम्यान तिच्या वहिन्या तिच्या पाठीत बुक्यांचा मार देतात. ह्या सगळ्या गोंधळात बाळ रडू लागते पण सर्व लोकांच्या चेहऱ्यावर मात्र आनंदच असतो. सर्व जण बाळाला जवळ घेऊन प्रेम देतात.
आलेल्या सर्व स्त्रिया बाळाच्या आईची ओटी भरतात. आईची ओटी सदा भरलेली राहा म्हणजेच तिला मुला-मुलींचे सौख्य लाभो असा यामागचा उद्देश आहे. असा हा बारश्याचा समारंभ असतो. बाळाच्या बारश्यादिवशी प्रत्येकजण बाळासाठी काहीतरी भेटवस्तू आणतो. कोणी बाळाला खेळणी देतात तर कोणी कपडे देतात. कोणी सोन्या-चांदीचे महागडे दागिने देतात तर कोणी साधे झबले-टोपडे देतात. पण सर्व जण बाळाला भरभरून आशीर्वाद मात्र नक्की देतात. बाळाच्या मंगलमय जीवनासाठी शुभेच्छा देतात. येणाऱ्या सर्व पाहुण्यांना आई वडिलांच्या ऐपतीनुसार जेवण किंवा नाश्ता दिला जातो. बाळ मुलगा असेल तर पेढा आणि मुलगी असेल तर बर्फी वाटण्याची पद्धत आहे. गाणी लावून, फटाके वाजवून आनंद साजरा केला जातो. जाताना त्यांना भेटवस्तू दिल्या जातात.
मात्र आजकाल काही लोक वेगळ्या पद्धतीने बारसा साजरा करतात. खूप लोकांना बोलावून थाटामाटात बारसे करण्याऐवजी जवळच्या थोड्याच लोकांना बोलवून छोटासा बारसा करतात, बाळासाठी पूजा करतात. काही जण तर या सगळ्या गोष्टींसाठी पैसे खर्च करण्याऐवजी एखाद्या अनाथआश्रमात किंवा वृद्धाश्रमात जाऊन तेथील लोकांसोबत आपला आनंद वाटतात आणि त्यांचे आशीवार्द घेतात. हे विचार थोडे वेगळे आहेत पण कौतुकास्पद आहेत.
बारसे कसेही पार पडो, बाळाला सुंदर आयुष्य लाभो हीच सर्वांची इच्छा असते!