Mala Lottery Lagli Tar
मला लॉटरी लागली तर
श्रीमंत व्हायला कोणाला आवडत नाही?? आपण धनवान असावे, आपल्याकडे अलिशान बंगला, नोकर चाकर, अलिशान गाडी मोठे फार्महाउस असावे असे सगळ्यांनाच वाटत असते. ती सुखद जाणीव किती मनाला गुदगुल्या करते? पण सगळेच अंबानी, टाटा व अदानी होऊ शकत नाही. आणि त्यांनी घेतलेले कष्ट झेलायची कोणाचीच तयारी नसते. पुढे मी नोकरी करेन आणि मला खूप पैसे मिळतील की नाही सांगू शकत नाही पण मला श्रीमंत व्हायचे आहे अशी माझी खूप इच्छा आहे…आणि म्हणतात न, इच्छा तेथे मार्ग.
असेच एकदा मी एक ऑनलाईन लॉटरीचे तिकीट घेतले. त्यावर एक कोटीचे बक्षीस लिहिले होते आणि जॅकपॉट लागला तर पाच कोटी रुपये मिळतील असे लिहिले होते.देव प्रसन्न झाला आणि त्याने मला पाच कोटींची लॉटरी जिंकून दिली तर? अहा, काहीच करायला नको.फक्त देवावर भरोसा ठेवायचा आणि एक लॉटरी तिकीट काढायचे. रिझल्ट लागला की आपला नंबर बघायचा आणि ऐटीत रकम घ्यायला जायचे. रकम घ्यायची आणि ऐश करायची. काय सुंदर कल्पना आहे नाही?
मी ते कल्पना करू लागलो खरच मला हे तिकीट लागले तर…..माझ्या इतक्या इच्छा आहे, त्या साऱ्या मला पुऱ्या करता येतील एका फटक्यात. गाडी, बंगला ह्यामध्ये सारा पैसा खर्च केला तर लक्ष्मीचा अपमान होईल. आणि असे पैसे उडविले तर पुढे काय करणार? मी शांतपणे विचार करू लागलो. जेंव्हा लोकांना खूप पैसे मिळतात किंवा ते खूप पैसे कमावतात तेंव्हा ते कसा खर्च करतात? मी चाणक्य नीती मध्ये वाचले आहे की पैसा मिळाला की त्याचे चार भाग करावे. एक भाग धन भविष्याकरिता ठेवावे.एक भाग स्थावर जंगम यासाठी खर्च करावे, एक भाग दानधर्म करावे आणि एकाच भागात चरितार्थ चालवावा. हे सगळ समजण्याएव्हडा मी मोठा नाही तरी मी कल्पना करू शकतो मी कसा कसा पैसा खर्च करीन ते.
माझी खूप इच्छा आहे सगळा भारत फिरून यावा आणि युरोप ची टूर करावी. सर्वप्रथम मी ती इच्छा पूर्ण करीन. या भ्रमंतीमध्ये मला जे व्यवहारज्ञान मिळेल आणि जगात वावरण्याचे शिक्षण मिळेल ते कुठल्याही पुस्तकात किंवा पर्सनल ट्युटर लावून मिळणार नाही. मी भारतातील आणि जगातील माझ्यासाठी करिअरच्या दृष्टीने मिळू शकणाऱ्या संधींची माहिती घेईन. ओळखी करून घेईन. तसेच सर्व ठिकाणाचे निसर्गसौंदर्य मनात साठवून ठेवीन. मला अशाने आनंद आणि आशा मिळेल.
त्यानंतर मी शिक्षण पूर्ण करीन.त्यासाठी लागणारे साहित्य,फी आणि क्लासेस ची फी इत्यादी मी माझी भरीन बाबांकडून कांही घेणार नाही. मला डॉक्टर व्हावयाचे आहे आणि त्यासाठी लागणारी भरमसाठ फी मी बक्षिसातून भरू शकेन आणि माझे स्वप्न साकार करेन. त्याचबरोबर माझा एक मित्र अतिशय हुशार आहे पण परिस्थितीमुळे तो शिक्षण घेऊ शकत नाही. मी त्याचे पण पैसे भरीन. आम्ही दोघे एकाच वेळी डॉक्टर झालो तर आम्ही ठरविले आहे की डॉ. प्रकाश आमटे यांसारखे दुर्गम भागातील आदिवासींना औषधोपचार करू. मोठा दवाखान काढू आणि सगळी अद्ययावत सामग्री आणून तेथील जनतेला वाचवू. त्यासाठी माझी बक्षिसाची रकम उपयोगी ठरेल.
माझी माझ्या घरासाठी पण कांही स्वप्ने आहेत. माझ्या आईला झाडाझुडपांची लागवड करण्याची खूप आवड आहे. तिला ज्ञान पण आहे. मी तिच्यासाठी मोठा परिसर असलेला बंगला घेऊन तिथे एक माळी ठेवून तिला तिची आवड जोपासायला मदत करीन. माझ्या बाबांना पण खेळांची आवड आहे. त्यांना बंगल्यात बॅडमिंटन कोर्ट आणि स्विमिंग पूल बांधून देईन. तसेच त्यांना जर होतकरू मुलांना शिक्षण द्यायचे असेल तर त्यांच्यासाठी क्रिकेटचे सामान, आणि इतर खेळांचे पण सामान आणून देईन. त्यामुळे त्यांचे रिटायर्ड जीवन मजेत जाईल.
दुर्दैवाने डॉक्टर नाही होता आले तर मी ह्या पैशातून चांगली गुंतवणूक करून माझे शिक्षण पूर्ण होईपर्यंत ह्या पैशांचे दुप्पट तिप्पट करून ठेवीन. मी सायन्सच्या रिसर्च साठी परदेशात जाऊन भारतासाठी उपयोगी रिसर्च करीन आणि त्याचे पेटंट घेऊन भारतात येऊन त्याची कंपनी काढीन. एकदा कंपनी नीट चालायला लागली की मी माझी व आई वडिलांची स्वप्ने पूर्ण करीन.
मला अकौंटमधेही गोडी आहे. मी त्यातील चार्टर्ड अकाउंटंट ची परीक्षा देऊन मी त्याची फर्म काढीन आणि त्यासाठी मोठ्या शहरात ऑफिस घेऊन माझा बिजिनेस करीन. त्यामुळे मी आणखी कांही जणांना पण नोकऱ्या देऊ शकेन.आणि मग माझे टूरचे आणि आई बाबांचे स्वप्न पूर्ण करीन.
जर मी कोट्याधीश झालो तर मला कारखानदार पण व्हायला आवडेल. मी माझ्या भ्रमंतीमध्ये कुठले कारखाने चालतात आणि कशाला जास्त मागणी आहे हे पण बघीन आणि त्यानुसार मी मेकॅनिकल इंजिनियरिंग करून पुढे MBA करून कारखाना काढीन. त्यामुळे आमच्या गावात उद्योग सुरु होतील आणि स्थानिक लोकांना नोकऱ्या मिळतील. मला याबाबतीत श्री टाटा आणि श्री कृष्णमूर्ति हे आदर्श वाटतात. मी त्यांच्या सारखे मोठे होऊन देशाचे नाव मोठे करणारे उद्योगांची स्थापना करीन.
आणि जरी मला साधे राहायला आवडत असले तरी माझ्याकडे पैसे आल्यावर मी माझ्या आवडीचे ड्रेसेस आणि म्युझिकल इन्स्ट्रुमेंट घेईन. एक कोपरा त्यातला पियानोचा असेल. माझा बंगला मी सुंदर सुंदर चित्रांनी सजवीन. माझी मोठी लायब्ररी करीन. त्यात जगभरातील उत्तमोत्तम पुस्तके, कादंबऱ्या असतील. माझे मी व्यक्तिगत जिम पण बांधीन.
आर्य चाणक्य यांनी सांगितल्याप्रमाणे मला समाजासाठी पण कांहीतरी कार्य करावेसे वाटते.जर मला चांगले बक्षीस मिळाले तर ब्राड पिट प्रमाणे मी जगातील गरजू,हुशार आणि वंचित मुलांना दत्तक घेऊन त्यांचे आयुष्य घडविन. अशा मुलांसाठी मी एक आश्रम बांधून त्यात त्यांच्या सर्वांगीण विकासाची सोय करीन. एक असा आश्रम असेल जेथे जाती ,धर्म आणि राज्य /देश यांच्या सीमा तोडून टाकलेल्या असतील आणि ती मुले फक्त माणूस म्हणून घडतील. तसेच मी एक सैनिकी स्कूल पण काढीन जेथे माझ्या देशाच्या रक्षणासाठी शूर सैनिक घडतील.
पण हे सर्व केंव्हा करू शकेल? मला लॉटरी लागली तर…काय छान रमलो होतो मी कल्पना विश्वात. वास्तवाचे भान आल्यावर धपकन खाली पडलो. तरीही एक आशा तर मनात आहेच. खरच मी कोट्याधीश झालो तर?
Click Here for the Full List of Essays on Marathi.TV
Hello, my name is Muhammad Ahmad. I’ve been exploring your website and noticed a few areas that could be improved. I’d be happy to help you address these issues. Would you like me to share my findings with you in a list?