Angela Merkel Information in Marathi
एंजेला मर्केल मराठी माहिती
- जगातील देशांमध्ये प्रगत अशा युरोपियन देशात जर्मनी आपले वेगळे स्थान टिकवून आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या हानीतून फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेऊन हा देश जगाच्या अर्थ व्यवस्थेत आपला अधिकार गाजवित आहे. ह्याचे कारण त्या देशातील लोकांचे प्रखर राष्ट्रप्रेम आणि एकापेक्षा एक कर्तबगार राष्ट्रप्रमुख!
- मध्यंतरी आलेल्या मंदीच्या लाटेत सगळे मोठे मोठे युरोपियन देश भरडले गेले पण पाय रोवून आपली अर्थव्यवस्था मजबूत टिकवून ठेवली ती फक्त जर्मनीने. त्याला प्रमुख कारण म्हणजे सतत चार वेळा जर्मनीच्या ‘चॅन्सलर’ (जसा भारतात प्रधानमंत्री) म्हणून निवडून आलेल्या एंजेला मर्केल- एक कर्तबगार महिला!
- व्यक्ती मोठी किंवा आदर्श होते ती तिच्या कर्तृत्वाने. जेव्हा सर्वप्रथम राष्ट्राचा विचार करून जी व्यक्ती कर्तृत्व दाखवते ती नक्कीच श्रेष्ठ असते. मानवतेसाठी शांततेच्या काळात बऱ्याच थोर व्यक्ती जन्माला आल्या आणि त्यांचे नाव झाले, परंतु आणीबाणी मध्ये कुशलतेने राष्ट्राला सावरणाऱ्या व्यक्तींचे कार्य अद्वितीय होय. अशा व्यक्तींनीच राष्ट्र मोठे बनते.
युरोपियन देशांतील एकमेव कर्तबगार राष्ट्र प्रमुख
- ख्रिश्चन डेमोक्रेटिक पार्टीच्या नेत्या होऊन मर्केल त्या पार्टी तर्फे २००५ पासून आजतागायत जर्मन ह्या बलाढ्य आणि प्रगत देशाची धुरा वाहत आहेत.
- मर्केलनी माणसे हाताळण्याच्या कौशल्याचा वापर करून व वेळ प्रसंगी विरोधकांशी युती करून मोठे मोठे निर्णय घेतले. विशेष म्हणजे आर्थिक बाबतीत त्यांनी जर्मनीला इतर युरोपियन राष्ट्रांच्या तुलनेत उच्च स्थानावर नेऊन ठेवले. हे एक स्त्रीच करू शकते कारण तिला घर कसे चालवायचे ते ठाऊक असते. त्यासाठी त्यांना जगभर मान्यता मिळाली आहे.
सुरुवातीचे दिवस :
- ह्या सर्व अलौकिकते मागे मर्केल यांच्या घराण्याचे मोठे योगदान आहे! एंजेला डोरोथी कासनर ह्यांचा जन्म १७ जुलै १९५४ ला हॅम्बर्ग येथे झाला.
- वडील ‘होस्ट कासनर’ हे ल्युथेरन पॅस्टर आणि आई ‘हेर्लीन’ इंग्लीश आणि लॅटीनची शिक्षक. वडीलांना पॅसटोरेट पद मिळाले तेंव्हा एंजेला अवघ्या तीन महिन्याच्या होत्या.
- लहानपणी एंजेलाना ‘कासी’ म्हणत असत जो ‘कासनर’ चा शोर्ट फॉर्म होता.
- एंजेलाचे आजोबा पोलिश सरकारकडे जर्मन पोलीस होते. त्यांनी आणि जर्मन आजीने आडनावाचे कासनर असा बदल केला. एंजेलाचे आईचे वडील राजकीय नेता होते. त्यामुळे अँजेला यांच्यात पोलिश अधिक जर्मन दोन्ही संस्कृतींचे मिश्रण आहे.
- आजोबा जरी ख्रिश्चन होते तरी एंजेलानी नंतर ल्युथेरानिजम अंगिकारला आणि ते पूर्व जर्मनीत स्थलांतरित झाले.
- तरुण वयातच एंजेलानी ‘फ्री जर्मन यूथ’ ह्या कम्युनिस्ट शैलीच्या पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी ‘मार्क्सिझम’ चा अभ्यास केला. त्या रशियन आणि गणित पण शिकल्या ज्यात त्यांना खूप बक्षिसे मिळाली. नंतर ‘कार्ल मार्क्स युनिव्हर्सिटी’ मध्ये शिकल्या. नंतर एका इंजिनियरिंग शाळेत सहायक प्रोफेसर म्हणून काम केले.
- त्यानंतर सेन्ट्रल इन्स्टीटयूट मध्ये त्यांना आयुष्याचा जोडीदार ‘यूलरीच मर्केल’ मिळाला आणि त्यांनी “Quantum” केमिस्ट्रीत प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळवली. शिक्षण पूर्ण झाल्यावर अँजेलानी संशोधक म्हणून काम सुरु केले.
राजकारणात प्रवेश :
- १९९० मध्ये पूर्व आणि पश्चिम जर्मनीमधील भिंत तोडल्याने मर्केल यांच्या कारकिर्दीला सहायता मिळाली आणि त्यांनी नवीन पक्ष “डेमोक्रेटिक अवेकनिंग” ह्या मध्ये प्रवेश केला.
- तोच पक्ष पुढे “इस्ट जर्मन ख्रिश्चन डेमोक्रेटिक यूनियन” ह्या नावाने प्रसिद्ध झाला. उत्तम संभाषण चातुर्यामुळे त्यांना पार्टीची प्रवक्ता केले गेले. तेथे त्यांनी पत्रकारांवर आपला प्रभाव दाखविला.
- १९९०च्या निवडणुकीत त्या उभ्या राहिल्या आणि जिंकल्या. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्या महिला आणि तरुणांच्या मिनिस्ट्री मध्ये मंत्री झाल्या.
- १९९४ मध्ये त्या मिनिस्टर फॉर एन्विरोन्मेंट अॅंड न्युक्लीयर सेफ्टी ह्या खात्याच्या मंत्री झाल्या. त्यामुळे त्यांचे राजकीय वर्चस्व आणि दृष्टी वाढली.
- मर्केल यांची पार्टी नंतर निवडणूक हरली पण मर्केल ह्या सेक्रेटरी जनरल म्हणून निवडल्या गेल्या.
चॅन्सलर होण्याचा प्रवास
- मर्केल ह्यांनी पार्टीची पुनर्रचना करून तिला नवजीवन दिले आणि त्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या झाल्या. तसेच हळूहळू त्यांनी आपल्या पक्षातीलच विरोधकांना हरवले.
- योग्य ते धोरण राबवून त्यांनी इराक युद्ध यावर आपले मत दर्शविले आणि लोकांचे मन जिंकले. तसेच जर्मनीच्या आर्थिक आणि सामाजिक सुधारणा सुचवून मंदी आणि बेरोजगारीवर तोडगा काढला. ह्या सर्वाचे फलित म्हणून २००५ मध्ये त्या जास्ती जागा निवडून चान्सेलरपदावर हक्क सांगू शकल्या. जरी बहुमत नसले तरी योग्य ती युती करून त्यांनी वाटाघाटी करून त्या चान्सेलर झाल्या. त्यानंतर २००९, २०१४ आणि २०१८ त्या सलग चॅन्सलर झाल्या.
- इतक्या प्रदीर्घ कालावधीत त्यांचे ठळक कार्य म्हणजे मंदीत जर्मनीची आर्थिक घडी बसविणे आणि निर्वासितांचा प्रश्न.
- यादवीमुळे सिरीया आणि अफगाणिस्तानातून निर्वासितांचे लोंढे जर्मन मध्ये येत होते. जर्मनीतील प्रतिगामी पक्षांना हे पसंत नव्हते.
- पण आंतरराष्ट्रीय घडामोडींचा विचार करून त्यांनी निर्वासितांना प्रवेश देण्याचे मान्य केले. पण त्याच बरोबर हेही ठणकावून सांगीतले की आम्ही आमच्या धर्माचा आदर करतो तेंव्हा येथे राहू इच्छिणाऱ्यानी पण आमच्या धर्माचा आदर केला पाहिजे. त्यामुळे प्रतिगामी नरमले.
- त्यांची माणसे हाताळण्याच्या कसबामुळे कधी निर्विवाद बहुमत मिळवून तर कधी योग्य अशी युती करून त्या चॅन्सलर पदावर कायम राहिल्या.
- त्यामुळे त्यांना सर्वांनी एक सर्वात जास्त शक्तिशाली महिला ह्या सन्मानाने गौरविले.तरीही राजकारणात त्या चिकटून न राहता त्यांनी घोषणा केली आहे की २०२१ ची निवडणूक त्या लढणार नाही. एक वादळी व्यक्तिमत्व जर जर्मनीच्या राजकारणातून बाहेर गेले तर मागे काय राहील?