Letter to Dad in Marathi
Patra Lekhan : Letter to Dad from Daughter in Marathi Language
प्रिय बाबा,तुम्ही सर्व खुशाल आहेत अशी अपेक्षा करते, मी सुद्धा इकडे छान आहे. आता होस्टेलवर रुळली आहे. माझ्या रूम पार्टनर खूप चांगल्या आणि मनमिळावू आहेत. एका रूममध्ये आम्ही ३ जणी आहोत. रूम पण छान आहे, समोरच एक बगीचा आहे सकाळी-सकाळी येणारे कोवळे ऊन एकदम छान वाटते. जेवण पण बरे आहे, माझी काळजी करू नका मी झालीय या वातावरणात सेट आता.
सगळं छान आहे, पण सकाळी सकाळी अलार्म लावून उठण्यात, आईला ५ मिनिट अजून झोपू दे ना, असे म्हणण्यातली मजा नाहीये. तुमच्यासोबत नाश्ता करताना होणाऱ्या गप्पा तर मी प्रचंड मिस करतेय बाबा. मी कधी स्वतः हाताने चहा केला नाही कि आईला कामात कधी मदत केली नाही, इकडे सगळे स्वतःचे स्वतः करावे लागत आहे. मी उठली कि आई अगदी हातात चहा आणून देई, तुम्हाला माहित आहे का? आता माझा चहा रोज मीच करते आणि मस्त बाल्कनीमध्ये जाऊन पिते, पण एकटीच.
इथे घराची उब नाहीये बाबा, कधीकधी रडू येते तुमची खूप आठवण येते, पण मग तो प्रसंग आठवतो, आपल्या घरातल्या चिमणीच्या घरट्यात जेव्हा पिल्लाना चिमणी उडायला शिकवत होती तेव्हा ते बघून मी तुम्हाला म्हणाले होते, कशाला या एवढ्याशा पिल्लाला असा त्रास द्यायचा? नाही उडाला तर काय होते? बरा आहे कि घरट्यातच. तेव्हा तुम्ही मला समजावले होते, उडायचे असेल तर घरटे सोडावेच लागते पिल्लांनी घरटे सोडले नाही तर ते कधीच उडणार नाहीत आणि पक्ष्याला एक ना एक दिवस उडावेच लागते. याचा अर्थ मला आज आता कळतोय बाबा. एकदम बरोबर होते तुमचे, जर मी घर सोडले नाही तर कधीच उडू शकणार नाही, कधीच स्वावलंबी होऊ शकणार नाही. तुमचे, माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला घर सोडावे लागणारच होते.
मला माहिती आहे कि बाबा तुम्हाला सुद्धा माझी खूप आठवण येत असणार, तुम्हाला कदाचित माझ्यापेक्षा जास्त त्रास होत असणार. मी तुमचा त्रास फुकट जाऊ देणार नाही बाबा, ज्या ध्येयाने ज्या उद्देशाने मी घर सोडले आहे, तुमच्यापासून दूर रहात आहे, ते मी पूर्ण करूनच घरी परतणार बाबा आणि तेसुद्धा वेळेत. आजपर्यंत कोणत्याही गोष्टीची कमी तुम्ही मला जाणवू दिली नाही, कधी कोणत्या गोष्टीला नाही म्हटले नाही. परिस्थिती तेवढी चांगली नसूनसुद्धा माझ्या चांगल्या भविष्यासाठी तुम्ही मला एवढ्या दूर सर्वात उत्तम कॉलेज मध्ये प्रवेश घेऊन दिला, तुम्ही तुमच्या प्रेमात कुठेही कमी पडला नाहीत बाबा आणि आता माझी पाळी, मी तूम्हाला नाराज करणार नाही बाबा. तुमच्या आणि आईच्या सर्व कष्टांचे मी चीज करेन. एक दिवस असा येईल तुम्हाला माझा गर्व असेल बाबा.
पुढच्या महिन्यापासून परीक्षा झाली कि मला सुट्ट्या लागणार आहेत, लवकरच घरी येते. मग आपण सर्व बसून गप्पा मारू, इथल्या खूप गमती जमती मला तुम्हाला सांगायच्या आहेत. आईची आणि स्वतःची काळजी घ्या, गोळ्या औषधे वेळेवर घ्या. मी लवकरच येते.
तुमची लाडकी,पूजा
Can I write this letter?
Can you allow us to copy it?
Yes