Kojagiri Purnima Importance in Marathi
कोजागरी पौर्णिमा माहिती
कधी साजरा केला जातो :
कोजागरी पौर्णिमा हि आश्विन पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी करण्यात येते .या पौर्णिमेला माडी पौर्णिमा असेही संबोधले जाते.शरद ऋतूतील आश्विन महिन्यात हि पौर्णिमा साजरी केली जाते.तसेच इंग्लिश कॅलेण्डर प्रमाणे हि पौर्णिमा ऑक्टोबर महिन्यात येत असते .
सणातील खाद्यपदार्थ:
या दिवशी दूध गरम करून त्याला आटवून त्यात काजू,बदाम,पिस्ता,केसर ,साखर,जायफळ,वेलदोडे वगैरे गोष्टी घालून,लक्ष्मीदेवी समोर नैवेद्य म्हणून दाखविले जाते. मध्यरात्री दुधात संपूर्ण चंद्राची किरणे पडू दिली जातात आणि ते दूध मग सगळ्यांना प्राशन करण्यासाठी दिले जाते. अर्ध्या रात्रीपर्यंत जागरण केले जाते.पुराणात व प्राचीन ग्रंथात असे सांगितले जाते की मध्य रात्री नंतर साक्षात लक्ष्मीदेवी येऊन ‘को जागर्ति’ म्हणजे ‘कोण जागत आहे असे विचारून जागे असलेल्या लोकांना धन दान करते, म्हणून या पौर्णिमेला ‘कोजागरी पौर्णिमा’म्हणतात.
ऐतिहासिक महत्त्व :
या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या इतर दिवसांपेक्षा जवळ असतो. या दिवशी दम्यावरचे आयुर्वेदिक औषध अतिशय इलाजकारक असते असा आयुर्वेदात उल्लेख आहे त्यामुळे दम्यावरचे औषध या दिवशी प्राशन केले जाते.
सण साजरा करण्याच्या इतर पद्धती :
- गुजरातमध्ये कोजागरी पौर्णिमा रासदांडिया व गरबा खेळून शरद पुनम नावाने साजरी केली जाते. बंगालमध्ये सर्व लोक या पूर्णिमेला लोख्खी पुजो म्हणतात व या दिवशी लक्ष्मीची पूजा करतात. मिथिलेमध्ये या रात्रीला कोजागरहा संबोधिले जाते.
- प्रत्येक कुटुंबातील वडीलधारे लोक या दिवशी आपल्या कनिष्ठाना ओवाळून ‘आश्विनी’ साजरी करतात.आश्विन महिन्यात मध्यरात्रीला जी पौर्णिमा येते तिला कोजागरी पौर्णिमा म्हणतात. तशी पौर्णिमा जर आली नाही तर दुसऱ्या दिवशीला येणाऱ्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा समजले जाते आणि त्या दिवशी नवान्न पौर्णिमा साजरी करणे प्रचलित आहे. खरे म्हणजे हि पौर्णिमा कोजागरी पौर्णिमा परंतु हा शब्द मराठीत, अनेकजण कोजागिरी असा उच्चारतात आणि लिहितात.
- पौर्णिमेची रात्र, चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते. अश्विन शुक्ल पोर्णिमा म्हणजे ‘कोजागरी पोर्णिमा’ या रात्री चंद्र प्रकाशात जे लोक आनंदात हशीखुशीमध्ये रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर देवी देवता प्रसन्न होतात अशी आख्यायिका आहे.हा उत्सव रात्री ठीक १२ ते १२.३९ या ३९ मिनिटात साजरा करायचा असतो. भगवान लक्ष्मी,इंद्र,चंद्र, कुबेर यांची मनोभावे अर्चना करण्याची हीच एकमेव वेळ असते. शक्यतो हा उत्सव प्रत्येकजण आपापल्या घरीच साजरा करतात तर काही जण एकत्रित पणे साजरा करतात.या दिवशी लक्ष्मी,इंद्र,कुबेर देवता पृथ्वी तलावर आशीर्वाद देण्यासाठी येत असतात व त्यांना दुधाचा नैवेद्य लागतो असा समज आहे.
पूजाविधी मांडणी :
मांडणी करतांना एका पाटावर किंवा चौरंगावर
१) लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याचे पान ठेवावे चौरंगावर मांडावेत
२) विड्याच्या जोड पानावर कुबेराचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवावी.
३) तांदुळाच्या ढिगाऱ्यावर पाण्याने भरलेला ताम्बर धातूचा तांब्या, त्यात आंब्याचा डहाळा इंद्राचे प्रतिक म्हणून घ्यावा. अशी मांडणी रात्री १२ वाजेपर्यंत करून ठेवावी. रात्री ठीक १२ ते १२:३९ या ३९ मिनिटात दुधाचे भांडे चंद्राकिरणात प्रकाशात ठेवावे. जेणे करून चंद्र देवता प्रकाश रुपात अमृताचा प्रसाद रुपी वर्षाव करतात.
४) चंद्राचे प्रतिक म्हणून चंदनाने एक छोटा चंद्रकोर गोल तयार करून घ्यावा.
५) १२:३० ला पूजेच्या पाटासमोर दुधाचे भांडे ठेवून इंद्र,कुबेर,लक्ष्मी आदी देवांची हळद कुंकू, पांढरी फुले, अक्षता, अष्टगंध वाहून पूजा करावी. त्यात एक तुळशीपत्र टाकून नैवेद्य दाखवावा व सुख आणि समृद्धीची देवाला प्रार्थना करावी.
दुधाचा नैवेद्य फक्त घरातील सर्व व्यक्तींना द्यावा.सुपारी जपून ठेवावी व पाने पाण्यात वाहून द्यावीत. सुपारी दरवर्षी पुजाव्यात.
हा लक्ष्मी प्राप्तीचा कार्यक्रम अतिशय महत्वाचा समजला जातो. लक्ष्मी अनेक प्रकारची असते जसे भावलक्ष्मी, गुणलक्ष्मी,वित्तलक्ष्मी वगैरे. सर्वच प्रकारची लक्ष्मी फक्त जागृत माणसाला मिळत असते.तर आळशी, झोपाळू,प्रमादी माणसाला लक्ष्मी समोर आलेली असताना काही समजत पण नाही. देवी महालक्ष्मी हि परमदयाळू, कृपाळू आहे, ती सर्वांचे हित करणारी आहे परंतु या देवीची मोठी बहिण मात्र संकटे आणणारी त्रास देणारी कटकटी निर्माण करणारी असते अशी कल्पना आहे.