Holi Festival Essays in Marathi Language :
Introduction of Holi : होळी
होळी हा संपूर्ण भारतामध्ये विशेषत:उत्तर भारतामध्ये अतिशय उत्साहाने साजरा होणारा सण आहे. या सणाला “होळी पौर्णिमा” असेही संबोधले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची स्थाननिहाय विभागणी होते तर काही ठिकाणी एकत्रितरीत्या तो साजरा होतो. फाल्गुनी पौर्णिमा या दिवसापासून पंचमी पर्यंत, या ५-६ दिवसांत कुठे दोन दिवस तर कुठे पाचदिवस हा उत्सव साजरा केला जातो.
भारतातल्या वेगवेगळ्या भागांत फाल्गुन पौर्णिमेला होळी लोकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. ह्या उत्सवाला “होलिकादहन” किंवा “होळी,” “शिमगा,” “हुताशनी महोत्सव,” “दोलायात्रा,” “कामदहन” अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या ह्या लोकोत्सवाला “फाल्गुनोत्सव,” आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त “वसंतागमनोत्सव” किंवा “वसंतोत्सव” असेही म्हणण्यात येते.
Importance of Holi : होळीचे महत्त्व
होळी मनुष्याच्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी अशी कल्पना आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते.
होळीच्या दुसऱ्या दिवशी वसंतोत्सवाचा प्रारंभ होतो. यात वाळलेली पाने आणि लाकडे एकत्र करून जाळणे हाच होळीचा उद्देश आहे. दुसऱ्या दिवशी होळीच्या अग्नीत गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला धुळवड असेही म्हणतात. एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधूभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते.
Myths and Beliefs : पौराणिक दाखले
लहान मुलांना पीडा देणाऱ्या “होलिका,” “ढुंढा,” “पुतना” ह्यांसारख्या राक्षसींच्या दहनांच्या कथांमधे ह्या उत्सवाच्या परंपरेचा शोध काही लोक घेतात. एका पौराणिक कथेनुसार विष्णूभक्त प्रल्हादला मारण्यासाठी हिरण्यकश्यप्पूने धाडलेल्या होलिकादेवीचा श्रीविष्णू देवाने वध केला होता. होलिकेला वर होता की तिला अग्नि जाळू शकणार नाही, परंतु प्रल्हादाला जाळ्ण्यासाठी त्याला मांडीवर घेऊन अग्नीकुडांत प्रवेश केला व प्रल्हाद बचावला व होलिकेचे दहन झाले.
Holi in Maharashtra : महाराष्ट्रातील होळी
महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात आणि पेटलेल्या होळीभोवती ‘बोंबा’ मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळी नंतर ५ दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो.
कोकणातील शिमगोत्सव / होलिकोत्सव
कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा हा सण अधिक मोठ्या प्रमाणात साजरा होतो. तिथे हा सण सुमारे ५ ते १५ दिवस असतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो.
पालखी व मुख्य विधी
यामध्ये मुख्य काम म्हणजे ग्रामदेवतेची पालखी सजवून त्यात रुपे (देवीच्या उत्सवमूर्ती) ठेवून पालखी देवळातून सहाणेवर आणणे. सहाण ही जागा मुख्यत्वेकरून गावातील चावडी असते. पालखी सजवून ढोल-ताशाच्या गजरात सहाणेवर आणायची ती होळीच्या दिवशी संध्याकाळी. त्यानंतर रात्री आंब्याच्या किंवा सुरमाडाच्या झाडाची होळी तोडून आणल्या जातात. प्रसंगी सुमारे ५० ते ७० फूट उंचीचे, अंदाजे १५ वर्षे वयाचे, आणि सुमारे १२०० ते १५०० किलो वजनाचे झाड तोडून ते गावकरी खांद्यावरून नाचवत सहाणेवर पालखीसमोर आणून उभे करतात. मागच्या वर्षीच्या होळीचा जो खुंट ज्या खड्ड्यात शिल्लक असतो, तोच खड्डा मोठा खणून त्यात होळीसाठी आणलेले झाड उभे करतात व त्याभोवती गवत रचून मग पालखी प्रदक्षिणा होते आणि मग होम जाळला जातो. गावातील नवीन जोडपी या होमात नारळ अर्पण करतात.
गार्हाणे, खुणा काढणे
दुसर्या दिवशी गावकरी परत सहाणेवर जमतात. तिथे होळीच्या शेंड्याखाली सगळं गाव उभा राहून गार्हाणे नावाचा कार्यक्रम करतात, ज्यात मागच्या वर्षीचे नवस फेडणे आणि यावर्षी नवीन नवस करणे असा प्रकार असतो. त्यानंतर बैठक(गावची सभा) असते, ज्यात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होते.त्यानंतर तिसर्या दिवशी पालखीने खुणा काढणे हा कार्यक्रम असतो, यामध्ये गावचा गुरव आदल्या रात्री एक नारळ सहाणे समोर पटांगणात जमिनीत लपवून ठेवतो. तो नारळ पालखी हुडकून काढते. हा कार्यक्रम पाहण्यासाठीही गर्दी होते.
समारोप
त्यानंतर सत्यनारायण पूजा आणि भजन व रात्री गावचे खेळे, नमन हा लोकनृत्य प्रकार असतो. काही ठिकाणी पालखीनृत्य स्पर्धा ही असतात. त्यानंतर पुढील दिवसात पालखी घरोघरी दर्शन देते. याचा समारोप काही ठिकाणी शिंपणे या कार्यक्रमाने तर काही ठिकाणी देवीचा दिवट्या गोंधळ घालून होते.
आजच्या लोकोत्सवात “होलिकोत्सव” (होळी), “धूलिकोत्सव” आणि रंगपंचमी हे तीन मुख्य पदर उठून दिसतात. जडवाद आणि भोगवाद ह्यांना जाळून, त्यांची धूळवड करून आयुष्यातल्या आनंदाचा रंगोत्सव साजरा करायचा किंवा समाजातल्या असद्वृत्ती भस्मसात करून त्यांच्या नावाने “शिमगा” करत सदवृत्तींचा जयघोष करायचा हा उत्सव आहे.
best holi information thank you so much sir
Nice