Goldfish Information in Marathi
गोल्डफिश माहिती
आमच्या शेजारच्या राजूला अक्वेरीयमची (aquarium) खूप आवड होती. त्याने हौसेने टॅंक मध्ये विविध रंगांचे मासे आणले होते. गोल्ड फिश तर त्याच्या अगदी आवडीचा मासा होता. त्यांच्यासाठी त्याने डॅफनियाचे खाणे आणले होते. माशांना खूप ताकद यावी म्हणून त्याने भरपूर खाऊ टाकला आणि दुसऱ्या दिवशी सगळे गोल्ड फिश फुगून मेलेले आढळले. इतका रडला तो…पण आता त्याने व्यवस्थित माहिती घेतली आणि परत चांगले मासे आणून अक्वेरीयम सजवले.
फिश टॅन्क किंवा अक्वेरीयम मध्ये बागडणाऱ्या रंगबिरंगी माशांमध्ये गोल्ड फिशचा नंबर सर्वात वरचा लागतो. त्यांचा सोनेरी चमकणारा रंग, मोठे मोठे डोळे, मागे झुपकेदार शेपटी आणि विद्युत चपळाई तासन तास बघावीशी वाटते. घरात हॉटेल्स मध्ये, मोठ्या अक्वेरीयम मध्ये हे मासे शोभा वाढवतात. पण ह्यांना सांभाळणे पण तितकेच जिकीरीचे असते हे आपण वर पाहिलेच. अक्वेरीयम मध्ये कृत्रिम गुहा, झाडे, शेवाळ आणि समुद्रासारखे वातावरण ठेवले तर त्यातील माशांच्या लीला बघत राहाव्या इतक्या नयनरम्य होतात.
गोल्डफिश इतिहास :
गोल्ड फिश मुख्यत: चीनचा रहिवासी आहे. इ.स. २६५ ते ४२० वर्षापूर्वी जिंग घराणे त्याचा खाण्यासाठी उपयोग करीत होते. त्याला एशियन कार्प म्हणत असे. तेंव्हा चंदेरी माशांमध्ये म्युटेशन होऊन नारंगी, सोनेरी मासे पाहण्यात आले. त्यानंतर इ.स. ६१८ ते ९०७ जेंव्हा टॅंग घराणे राज्य करीत होते तेंव्हा त्यांना पाळणे आणि प्रदर्शन करणे सुरु केले. नंतर सॉंग घराणे राज्यावर असताना सामान्य नागरिकांना पिवळ्या गोल्ड फिश सोडून इतर गोल्ड फिश पाळायला मुभा देण्यात आली. पिवळा रंग फक्त राजे लोक वापरत होते. त्यानंतर मिंग (१३६८-१६४४) घराणे आले. त्यांनी आकर्षक शेपटीचे गोल्ड फिश शोधले. त्यानंतर गोल्ड फिश जपान, पोर्तुगाल, अमेरिका आणि नंतर सर्व जगात आवडते झाले.
चीन मध्ये मोठ्या हंडी मध्ये मासे ठेवून ते दिवाणखान्यात ठेवतात. ते फेंग शुई प्रमाणे संपत्ती देतात. ते बघून बऱ्याच घरांमध्ये दिवाणखान्यात हंडीत किंवा अक्वेरीयम मध्ये मासे ठेवण्याची प्रथा सुरु झाली.
गोल्ड फिश हा सायाप्रीनिडी कुटुंबातील प्राणी असून त्याच्या प्रजातीचे नाव कॅरॅसिसस ऑरेटस असे आहे. अर्थात त्याचे प्रचलित नाव कार्प असेच आहे आणि त्याच्या प्रकारांमध्ये हेच वापरले जाते.त्याचे रंग आणि रूपाप्रमाणे अनेक प्रकार आहेत.
गोल्डफिशचा आकार व शरीर :
आकारावरून पण गोल्डफिशचे वर्गीकरण केले जाते. गोल्ड फिशची लांबी १५ ते १९ इंच असते आणि वजन २ ते ५ पौंड असते.त्याची नजर अतिशय तीक्ष्ण असून ती चार रंग ओळखू शकते – लाल, हिरवा, निळा आणि अतिनील. तसेच त्याची ऐकण्याची क्षमता पण तीव्र असते जी ध्वनी लहरींच्या कणांची हालचाल पण ओळखते.
गोल्डफिशचे प्रकार :
गोल्ड फिशचे विविध आकार आणि रंगांची उधळण ह्यामुळे ते सर्वांचे लाडके मासे आहेत. साधारणपणे खालील प्रकारचे गोल्ड फिश जास्त आढळतात.
- १. कॉमन गोल्ड फिश :- लाल, सोनेरी, पांढरे, काळे, केशरी, पिवळे. एका काचेच्या हंडी मध्ये हे सर्व ठेवले तर इंद्राच्या अप्सरा नाचताहेत असे वाटते.
- २. सिलेस्तीयाल आय : ह्यांचे डोळे मोठे असून बाहेर आलेले असतात.
- ३. लायन हेड : ह्याला सिंहाप्रमाणे मानेभोवती हूड असते.
- ४. पोमपोम : ह्याला हनफुसा पण म्हणतात. ह्याच्या नाकाजवळ सुटे मांसल वाढलेले भाग असतात. त्याला नेसल बकेट म्हणतात.
- ५. टेलेस्कोप : ह्याचे वटारलेले बाहेर आलेले डोळे असतात. त्याला ड्रॅगन आय पण म्हणतात.
- ६. व्हेटेल : ह्याची जरा जास्तच लांब शेपटी असते आणि ती शेवटी विभागलेली असते.
- ७. लायनचू : हा मासा लायनहेड आणि रंचू ह्या गोल्ड फिशच्या दोन जातींचे हायब्रीड आहे.
- ८. कार्ल्ड गिल : ह्याचे कल्ले उलटे असतात.
- ९. व्हाईट/ब्लाक टेलेस्कोप :- हे पांढरे आणि काळे गोल्डफिश रंगीबेरंगी गोल्डफिश मध्ये वेगळेपणाने उठून दिसतात. बहुतेक त्या रंगीबेरंगी चमचमत्या माशांना दृष्ट लागू नये म्हणून.
- १०. कॉमेट : धुमकेतूप्रमाणे लांबच लांब शेपटीचा फराटा असतो आणि त्यावर कांटे असतात.
- ११. ओरंडा : ह्याचे हूड रासबेरी सारखे असते.
- १२. रायकीन: ह्याला खांद्यावर वशिंड असते.
- १३. रांचू: ह्याला मोठे हूड असते म्हणून ह्याला गोल्ड फिशचा राका म्हणतात.
- १४. बटरफ्लाय टेल:ह्यालाच मूर असेही म्हणतात.त्याचे पंख फुलपाखरासारखे पसरतात.
- १५. तमासाबा : धुमकेतू सारखी शेपटी असते.
- १६. बल्बआय: डोळ्याजवळ दोन रस भरलेले फुगे असतात. ते बल्बासारखे दिसतात म्हणून बल्ब आय असे ह्याला म्हणतात.
- १७. फोर्टेल : अंड्यासारखे शरीर असते. लांब पंख असतात.
- १८. पर्ल स्केल: ह्याच्या शरीरावरील पापुद्रे मोत्यासारखे फुगीर आणि तेजस्वी असतात.
- १९. पांडा टेलेस्कोप: ह्याचे वेगवेगळे रंग असतात.
- २०. मिटीओर, शुकीन, आणि तोसाकीन : हे रांचू सारखेच पण थोडाफार शेपटीत बदल असतो.
गोल्डफिशची काळजी कशी घ्यावी :
गोल्डफिश अक़्वेरियम मध्ये, टॅंक मध्ये किंवा शोभेच्या हंडी मध्ये पाळले जातात. त्यांना कोमट (७० डिग्री) आणि स्वच्छ पाणी लागते. ते नळाच्या पाण्यात राहू शकत नाही कारण त्यात आम्ल जास्त असते. जर हंडी वगैरेमध्ये ठेवले त्यांचे पाणी सारखे बदलावे लागते, कारण ते त्यांनी केलेल्या घाणीमुळे निघालेलला अमोनिया सहन न होऊन गुदमरतात आणि मरतात. त्यांना खाणे पण मोजून द्यावे लागते नाहीतर जास्त खाण्याने आतडे ब्लॉक होऊनही ते मरतात.जेव्हढे त्यांना पाहून मजा वाटते तितकीच त्यांची काळजी पण घ्यावी लागते. ते लहान लहान किडे, अळ्या खातात,जे तुम्हाला अक़्वेरियमवाल्याकडे मिळतात.
गोल्डफिशचे प्रजनन :
गोल्ड्फिश अंडे घालून प्रजनन करतात. अंडे ४८ ते ७२ तासात उबतात. नर अंडे असलेल्या मादीला ढोसून अंडे द्यायला लावतो आणि शुक्रजंतू त्यावर सोडतो. लहान गोल्डफिशला फ्राय म्हणतात. ते खूप लवकर वाढतात कारण त्यांना गोल्डफिश स्वत:च खातो. लहान गोल्डफिश पाण्यातली वनस्पतींना लटकून राहतात आणि मोठे झाल्यावर आपले जीवन जगतात. गोल्ड्फिशची जोडी नसते, पण त्यांना एकटे राहायला आवडत नाही. गोल्डफिशला त्रास होतो आहे त्याच्या वागण्यावरून कळते. तो खूप गरगर फिरतो, सारखं पृष्ठभागावर येतो अथवा खाली वनस्पतीत जाऊन पडतो. हि लक्षणे दिसली की ताबडतोब त्याला बाहेर काढून स्वच्छ पाण्यात ठेवावे लागते, कारण हि लक्षणे त्याला ऑक्सिजन कमी झाल्याची आहेत.
पण ते मरतात तेंव्हा हृदयाला चटका लावून जातात. अगदी काही लोकांना त्यांच्या मरणानंतर रडू येते. इतका सुंदर जीव देवाने निर्माण केला आहे की खरच त्याच्यावर जीव जडतो, काचेच्या जवळ त्याचे डुकरा सारखे ओठ आले की तो बोलतोय असेच वाटते. तासनतास त्यांच्या लीला म्हणूनच लहान मुले बघत बसतात. अगदी मोठ्यांनाही ताण घालवायला हे एक उत्तम साधन आहे.
I want smaller information