Gokul Ashtami Information in Marathi
गोपाळकाला / गोकुळाष्टमी मराठी माहिती
गोकुळ अष्टमी म्हणजे कृष्ण जन्माचा दिवस, जन्माष्टमी.याच दिवशी म्हणजेच श्रावण महिन्यात वद्य अष्टमी, या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणूनच या दिवशी आनंदोत्सव साजरा केला जातो. हा उत्सव सर्व भारतात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. विशेषतः वृंदावन, मथुरा, गोकुळ, द्वारका, पुरी या ठिकाणी हा सण फार भव्य दिव्य प्रमाणावर होतो. हिंदू धर्मामध्ये गोकुळाष्टमीला एक अनन्यसाधारण महत्व आहे.
गोकुळाष्टमी दिवशी महाराष्ट्र राज्यात विशेषतः मुंबईत, उंच मातीच्या मडक्यामध्ये दही व दुध भरून उंच दोरीने बांधले जाते. तिथपर्यंत मानवी मनोरा तयार करून मडक्यापर्यंत पोहोचण्यासाठी स्पर्धा केल्या जातात.जो मडक्यापर्यंत पोहोचला तो त्या मडक्याला नारळाने फोडून दहीहंडी स्पर्धा जिंकतो.‘गोविंदा’ हा एकदम साहसी खेळ आहे.
या उत्सवाच्या दिवशी काल्याचा प्रसाद तयार केला जातो. सर्वांना नैवैद्य म्हणून दही, पोहे, काकडी यांचा एकत्र काला दिला जातो. लोणी आणि साखरेचा प्रसाद एकत्र करून कृष्णाला दिला जातो.
इतर नावे
कृष्ण जन्माष्टमीला कृष्णाष्टमी, गोकुळाष्टमी, अष्टमी रोहिणी, श्रीकृष्ण जयंती, श्री जयंती असे म्हणण्यात येते.
कृष्ण जन्माष्टमी हा सण भगवान कृष्णाचा जन्म दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो.कृष्ण हे भगवान विष्णूचे आठवे अवतार आहेत असे पुराणामध्ये वर्णन आहे.हा सण श्रावण महिना म्हणजेच ऑगस्ट सप्टेंबर महिन्यादरम्यान कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी साजरा केला जातो.रास लीला म्हणजेच कृष्णाच्या जीवनावर आधारलेले नाटक रूपांतर असते.रास लीला विशेषतः मथुरा आणि वृंदावन मध्ये खूप उत्सहाने साजरी केली जाते. भगवान कृष्ण हे वासुदेव आणि देवकीचे आठवे पुत्र होते.कृष्ण यादव कुळाचे मथुरावासी होते.
सण साजरा करण्याची पद्धत
हिंदू लोक जन्माष्टमीच्या दिवशी उपवास ठेवतात,त्या दिवशी कृष्णाची पूजा करतात,रात्री उशिरापर्यंत जागतात आणि कृष्ण जन्माच्या वेळेला पार्थना करतात.बाळकृष्णाचा फोटो किंवा मूर्ती पाळण्यात ठेवून त्याला झोका दिला जातो.पाळण्याच्या भोवती भक्तजन जमून भक्तिमय गाणी म्हणतात, नृत्य करतात आणि एकमेकांना भेट वस्तू देतात.काही ठिकाणी भगवद्गितेचे पारायण करून हा सण साजरा केला जातो.
महाराष्ट्र
जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमीचा दुसरा दिवस मुंबई पुण्यामध्ये दहीहंडी म्हणून प्रसिद्ध आहे. लहानपणी श्री कृष्ण मटकीमधून लोणी चोरत असत त्या कल्पनेतून उंचावर बांधलेली हंडीला फोडून लोणी लुटले जाते.दही हंडी मध्ये विविध पथक भाग घेतात आणि भाग घेणाऱ्यांना गोविंदा असे म्हटले जाते.अलीकडच्या काळामध्ये राजकीय पक्ष दही हंडी वर भरपूर बक्षिसे ठेवतात आणि गोविंदा पथक स्पर्धा लावून दही हंडी फोडून ती बक्षिसे मिळवतात.स्थानिक कलाकार तसेच फिल्म जगतातले लोक सुद्धा आजकाल दही हंडी मध्ये सामील होत असतात.मुंबईच्या दादर, लोवर परेल, वरळी, माझगाव, लालबाग ह्यांना प्रसिद्ध दही हंडी मंडळ म्हणून ख्याती मिळाली आहे.तर पुण्या मध्ये बाबू गेनू दही हंडी मंडळे प्रसिद्ध आहे.मुंबई मध्ये साधारणतः ४००० आणि पुण्यात २००० ठिकाणी दही हंडी बांधली जाते आणि त्यावर बक्षिसे ठेवली जातात.
ओरिसा राज्यामध्ये, पुरी प्रांतामध्ये, पश्चिम बंगालचे लोक जन्माष्टमी मध्य रात्रीपर्यंत उपवास पकडून आणि प्रार्थना करून करतात.
आसाम
जन्माष्टमीला आसाम राज्यात सारख्याच नावाने संबोधले जाते.आसाम मध्ये हा सण मंदिर आणि घरामध्ये साजरा केला जातो.या दिवशी आसाम मध्ये अन्न आणि फळाचे वाटप केले जाते.देवाची प्रार्थना केली जाते.
मणिपूर
मणिपूर मध्ये जन्माष्टमीला कृष्णा जन्म असे म्हटले जाते.मणिपूरचे राजधानी इंफाळ असून येथील दोन मंदिरामध्ये म्हणजेच गोविंदजी मंदिर आणि इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्स्कीऊसनेस टेम्पल, कृष्ण जन्म साजरा केला जातो.
तामिळनाडू
तामिळनाडू मध्ये लोक जमिनीवर तांदळाच्या पिठापासून (कोलम) सुंदर अशा नक्षीकला काढतात. गीत गोविंदम वगैरे भक्तिमय गाणे गाऊन देवाची प्रार्थना केली जाते.कृष्णाच्या पायाचे ठसे घराच्या बाहेरपासून आत पूजा गृहापर्यंत काढले जातात.हे ठसे घरामध्ये कृष्ण रुपी समृद्धी येते असा समज आहे.