Gerbera Flower Information in Marathi
जरबेरा फ्लॉवर माहिती
Introduction / परिचय :
- वाढदिवसाची पार्टी असो, वास्तुशांती किंवा हॉस्पिटल मध्ये असणारा पेशंट.. कुणालाही भेटायला जाताना आपण सहजच एक गुलदस्ता किंवा ‘बुके’ आजकाल घेऊन जात असतो. या गुलदस्त्यामध्ये सर्वात आकर्षक आणि अधिक प्रमाणात असणारी फुलं म्हणजे म्हणजे जरबेरा. या फुलाची दांडी अत्यंत मजबूत असते ज्यामुळे सजावटीमध्ये याची रचना करण्यात सुलभता येते.
- तुम्ही ही फुलं नक्कीच बघितलेली असतील, मोठ्या आकाराची, विविध रंगाची आणि अनेक पाकळ्या असणारी ही फुलं असतात.
- फुलाच्या मधोमध काळ्या रंगाचे थोडे बीज असतात. हि फुले दिसायला मोठी असतात आणि त्याचे देठ कडक आणि मजबूत असले तरीदेखील हि फुले काहीशी नाजूक असतात आणि जास्त ऊन यांना सोसत नाही, त्यामुळे दुकानांमध्ये विक्रीला असताना हि फुलं नेहमी पाण्यामध्ये ठेवलेली असतात आणि सहसा तिथे आपण हिरव्या रंगाचे कापड बांधलेले बघू शकतो ज्यामुळे फुलांना उन्हाचा त्रास होणार नाही आणि ती टवटवीत दिसतील.
Description / वर्णन :
- जरबेरा…अत्यंत आकर्षक, रंगीत असे हे फुल आवडत नाही असे कदाचितच कुणी असेल. अत्यंत मनमोहक, रंगीत असे हे छान फुल असते. लाल, गुलाबी, भगवा, पिवळा, पांढरा असे एक ना अनेक रंगांमध्ये हे फुल उगवत असते. या फुलाला कट फूल असे देखील नाव आहे.
- साधारण उंचीचे याचे झाड असते, या झाडाची पाने थोडीशी खडबडीत आणि टोकदार असतात, एका उंच दांडीवर हे फुल उगवत असते. हे फुल भरपूर दिवस झाडावर राहू शकते तसेच झाडावरून तोडल्यावर देखील हे फुल बरेच दिवस पाण्यामध्ये ताजे राहू शकते. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे या फुलाला कोणताही विशिष्ठ असा सुगंध नाही तरी देखील हे एक अत्यंत लोकप्रिय फुल आहे.
- या फुलाच्या अनेक प्रजाती आहेत त्यामध्ये फुलांचे आकार बऱ्याचदा लहान मोठे असू शकतात तसेच त्यांच्या रंगामध्ये विविधता असू शकते.
- एकाच झाडामध्ये २ रंगाची फुले किंवा दोन रंगाच्या पाकळ्या असणारे एकच फुल असे देखील पाहावयास मिळते. बाजारामध्ये हि फुलं नगावर उपलब्ध आहेत.
Agriculture and Cultivation / शेती आणि लागवड :
- जरबेरा संपूर्ण जगामध्ये वापरले जाणारे अतिशय लोकप्रिय असे फुल आहे, परंतु असे असून देखील लोकप्रियतेमध्ये याचा क्रमांक हा ५ वा आहे. ट्युलिप, गुलाब यांच्या नंतर जरबेराचा क्रमांक येतो.
- व्यावसायिक दृष्ट्या ही फुलं एक अत्यंत महत्वाचे उत्पादन आहे. जगात अनेक ठिकाणी याची शेती केली जाते आणि मागणीनुसार पुरवठा केला जातो.
- हे एक बहुवार्षिक झाड आहे आणि याला संपूर्ण वर्षभरात फुले येत असतात.
- महाराष्ट्रामध्ये नाशिक, सांगली, नगर, कोल्हापूर, सातारा अशा अनेक परिसरामध्ये जरबेराचे उत्पादन केले जाते. या पिकासाठी उष्ण व कोरडे हवामान आवश्यक असते. अनेक ठिकाणी जरी जरबेराची लागवड केली जात असली तरी देखील त्याच्या लागवडीसाठी आणि तापमान नियंत्रणासाठी पॉलीहाऊसचा वापर केला जातो आणि त्यामध्ये या रोपांची लागवड केली जाते.
- घरामध्ये जर आपल्याला या झाडाची लागवड करायची असेल तर त्यासाठी १५ सेमी ते २० सेमी व्यासाच्या कुंड्या वापरल्यास उत्तम आणि हि रोपे नर्सरी मध्ये ३० ते ५० रुपयांमध्ये विविध रंगामध्ये सहज उपलब्ध असतात.