Edmond Halley Information in Marathi
एडमंड हेली – एक महान खगोलशास्त्रज्ञ
- खगोलशास्त्र हा जितका मनोरंजक विषय आहे तितकाच सखोल आणि गूढ सुद्धा. पूर्वीपासून विश्वाचे कोडे उलगडण्यासाठी शास्त्रज्ञ वर्षानुवर्षे जीवाचे रान करीत आहेत. ज्यांनी अथक प्रयत्न करून विश्वातील चमत्कारांचा शोध लावला ते त्या ग्रह, तारे, आणि धुमकेतूच्या नावाच्या रूपाने अजरामर झाले.
- हेलीने सांगितल्याप्रमाणे तो धुमकेतू बरोबर तितक्याच वर्षांनी दिसला. ह्या त्याच्या अभ्यासासाठी सन्मान म्हणून त्या धूमकेतूला हेलीचे नाव दिले.
- अशाच ह्या धूमकेतूचा शोध लावणाऱ्या एडमंड हेलीचे जीवन जरी खगोलशास्त्राला वाहिलेले होते तरी तो भोगौलिक शास्त्र, गणित, पदार्थविज्ञान आणि हस्तलिखितशास्त्र ह्यामध्ये पण हुशार होता.
जन्म आणि बालपण
- हेलीचा जन्म ८ नोव्हेंबर १६५६ ला हेगरस्टोन, लंडन येथे झाला. त्याच्या वडिलांचे पण नाव एडमंड हेली सिनियर असे होते.
- एडमंडचे बालपण अत्यंत सुखात आणि श्रीमंतीत गेले, ह्याचे मुख्य कारण त्याचे वडील साबणाचे मोठे व्यापारी होते. पण व्यापारापेक्षा एडमंडला गणिताची खूप आवड होती.
शिक्षण
- एडमंडचे शिक्षण St. Paul school येथे आणि कॉलेज The Queen’s College, Oxford येथे झाले. जेंव्हा त्याने रॉयल खगोलशास्त्रज्ञ जॉन फ्लामस्तीड ह्याचे भाषण ऐकले तेंव्हा एडमंडला खगोलशास्त्रात रुची निर्माण झाली आणि प्रगती करीत तो रॉयल ऍस्ट्रोनॉमर ह्या पदापर्यंत पोहोचला. तो फ्लामस्तीडनंतर दुसरा रॉयल खगोलशास्त्रज्ञ बनला.
खगोलशास्त्रात प्रगती
- फ्लामस्तीडमुळे एडमंडला खगोलशास्त्राची एव्हडी गोडी लागली की त्याने १६७३ मध्ये कॉलेज शिक्षण पूर्ण होण्या अगोदर ‘Solar System and Sunspot‘ ह्या विषयावर पेपर संपादित केला.
- फ्लामस्तीडने उत्तर गोलार्धातील ताऱ्यांची नोंदणी केली होती त्या धर्तीवर त्याने दक्षिण गोलार्धातील ताऱ्यांची नोंदणी करण्याचे ठरवले. त्यासाठी दक्षिण अटलांटिक समुद्रात सेंट हेलेना नावाच्या बेटावर वेध शाळा उभी केली. त्यासाठी एडमंडच्या वडिलांनी बरीच आर्थिक मदत केली.
- वेधशाळेत हेलीने २४-फुट लांब दुर्बिणीतून निरीक्षणे केली. दक्षिण गोलार्धात ३४१ ताऱ्यांची नोंद केली. हि निरीक्षणे त्याने Catalogus Stellarum Australium लिहिली. त्याच्या Star Map मुळे त्याची टायको ब्राहे ह्या शास्त्रज्ञाशी तुलना झाली आणि फ्लामस्तीडने त्याला ‘दक्षिणेकडील टायको‘ असा किताब दिला.
- आपल्या खगोलशास्त्राच्या कामामुळे हेलीला ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीने M.A. ची डिग्री दिली आणि वयाच्या केवळ २२ व्या वर्षी ‘फेलो ऑफ रॉयल सोसायटी‘ चा मेंबर केले.
लग्न
- हेलीचे १६८२ मध्ये मेरी टूक हिच्याशी लग्न झाले आणि त्यांना दोन मुली आणि एक मुलगा झाला. त्याचे आई वडील नंतर विभक्त झाले त्यामुळे त्याला पैसे कमविण्यासाठी नोकरी करावी लागली.
शोधांची शृंखला
- एकदा गोडी लागल्यावर एडमंडने मागे वळून पहिले नाही. १६८२ साली त्याने धूमकेतूचा शोध लावला आणि १७०५ मध्ये गणिताने हे सिद्ध केले की १४५६, १५३१ आणि १६०८ मध्ये दिसलेले धुमकेतू हा एकच आहे आणि १७५८ मध्ये तो परत दिसणार आहे. त्याप्रमाणे तो दिसला आणि म्हणून त्याला हेलीचा धुमकेतू हे नाव दिले. पण १७५८ मध्ये आलेला धुमकेतू पाहायला तो राहिला नाही. त्याने सांगितल्याप्रमाणे दर ७५ वर्षांनी, १९१० आणि १९८६, मध्ये खरोखर तो धुमकेतू दिसला. आणि आता २०६१ मध्ये परत दिसेल.
- धूमकेतू सोबतच बुध ग्रहाचे सूर्यावरून एडमंडने भ्रमण पाहिले आणि त्याला वाटले की शुक्राच्या भ्रमणाचे निरीक्षण केले तर सूर्यमालेच्या आकारमानाची बरोबर कल्पना येईल.
- १६८६ मध्ये त्याने व्यापारी वारे आणि मोसमी वारे ह्यावर पेपर संपादित केला. त्यात त्याने वाऱ्याच्या मार्गक्रमणासाठी जी चिन्हे वापरली ती आजही हवामान खाते वापरते. तसेच सूर्याच्या उष्णतेने वातावरणात बदल होतो ह्याचा त्याने शोध लावला.
- त्याबरोबरच हवेचा दाब आणि समुद्र सपाटीपासून जमिनीची उंची ह्याचा संबंध असतो हे पण त्याने शोधले जे बॅरोमीटरचे मुख्य तत्व आहे. त्याचे तक्ते हे माहितीच्या सादरीकरणाचा नमुना होता.
- त्याला केप्लरच्या ग्रहांच्या भ्रमणामध्ये रुची निर्माण झाली आणि त्याने ऑक्सफोर्डला जाऊन न्यूटन ची भेट घेतली. एडमंडने न्यूटनशी चर्चा करून त्याने केलेली गणिते पुन्हा मिळवली. आणि न्यूटनला प्रोत्साहन देऊन त्याच्या Philosophie Naturalis’s Principia Mathematica ह्या पुस्तकाचे स्वखर्चाने प्रकाशन केले.
काही मजेदार किस्से
- त्या काळात ऑक्सफोर्ड विद्यापीठ मध्ये खूप विद्वान शास्त्रज्ञ होते आणि ते कॉफी शॉप मध्ये तासन तास विज्ञानावर चर्चा करीत बसत आणि डिश मध्ये बोटांनी आकृत्या काढीत. ह्या शास्त्रज्ञ मंडळी मध्ये अघोषित स्पर्धा होती आणि म्हणूनच आपला शोध आधी लागला पाहिजे यासाठी ती लोकं प्रयत्न करीत. ह्यातच जॉन हेव्हेलीयास आणि रोबर्ट कूक ह्याच्या मध्ये मतभेद झाले. कारण हेव्हेलीयास हा दुर्बीण न वापरता शोध लावीत असे. म्हणून ते चूक आहे असे रोबर्ट हूक म्हणाला. आणि रॉयल सोसायटीकडून एडमंडला मध्यस्थी करायला सांगितले. त्याने ती गणिते करून हेव्हेलीयास बरोबर आहे हे सिद्ध केले.
- १६९० मध्ये एडमंडने पाण्याखाली ४ तास राहण्याचा विक्रम केला. त्याने एक डायव्हिंग बेल पण तयार केली होती. त्याच वर्षी त्याने कामचलाऊ होकायंत्राचा शोध लावला. त्यात द्राव भरलेला होता आणि त्यावर चुंबकाच्या सुया तरंगत होत्या.
- त्यावेळी घरच्या अडचणीमुळे त्याने ऑक्सफोर्ड मध्ये सॅव्हिलियनप्रोफेसर ऑफ ऍस्ट्रॉनॉमी साठी अर्ज भरला. पण ज्या फ्लामस्तीडने त्याची प्रशंसा केली होती त्यानेच एडमंडवर नास्तिकपणाचा शिक्का मारून त्याला नोकरी मिळू दिली नाही. ह्यात त्यांना आर्चबिशप कॅनटरबॅरी आणि जॉन टिलॉटस्टोन ह्यांनी पाठींबा दिला आणि एडमंडची हातातली संधी गेली. तेथे डेव्हिड ग्रेगरी ह्या गणितज्ञाला नोकरी मिळाली. १७०३ मध्ये शेवटी त्याला साविलीयान प्रोफेसर ऑफ जोमेट्री हे पद मिळाले कारण त्याचे धार्मिक शत्रू निधन पावले होते.
अखंड संशोधन
- हेलीचे खगोलशास्त्राचे संशोधन चालूच होते. त्याचे खगोलशास्त्राचे ज्ञान बघून सरकारने त्याला नेव्हीचे ५२ फुटाचे जहाज Paramour Pink घेऊन सफरीवर जाऊन शोध लावायचे आदेश दिले. ही एक विशिष्ट वैज्ञानिक सफर होती. पण हाताखालच्या माणसांनी सहकार्य करण्यास नकार दिल्याने ते थांबले. पण सरकारकडे त्याचे खूप वजन असल्याने त्याला कॅप्टन म्हणून अस्थायी पद दिले आणि परत सफरीस पाठवले. त्याने ५२ उत्तर आणि ५२ दक्षिण गोलार्ध एव्हडा प्रवास करून होकायंत्राच्या फरकाची सारणी तयार केली आणि पृथ्वीच्या चुम्बक्त्वाचा अभ्यास केला.
- योगायोगाने एडमंडने इन्शुअरन्स कंपन्यांसाठी सुद्धा योगदान केले. Casper Neumann सोबत हेलीने मृत्यूसमयीचे वय काढण्याची पद्धत शोधून काढली. ज्यामुळे सरकारला लाइफ इन्शुअरन्स विकतांना ग्राहकाचे वय लक्षात घेऊन योग्य त्या भावात इन्शुअरन्स विकता येऊ लागला आणि आताचे अक्चूरीयल पद्धतीचा उगम झाला.
- १७०१ मध्ये त्याने अटलांटिक महासागराच्या चुम्बकत्वाचा चार्ट तयार केला आणि त्यावर वक्र रेषांनी अक्षांश रेखांश दाखविले. हे चार्ट त्याने स्वत:च्या निरीक्षणांनी बनविले होते.
- अतिशय हुशार एडमंडने काही काळातच अरेबिक शिकून अपोलोनियास कॉनिक्सह्या ऑक्सफोर्ड लायब्ररीत सापडलेल्या पुस्तकांचे भाषांतर लॅटिन मध्ये केले. तसेच ग्रेगरीने सुरु केलेल्या ग्रीक पुस्तकांचे पण भाषांतर केले.
- १७१६ मध्ये त्याने शुक्राच्या भ्रमणातून पृथ्वी आणि सूर्यामधील अंतर शोधले.त्यातही ग्रेगरीच्या ओप्तिका प्रमोटा ह्या पुस्तकात वर्णन केल्याप्रमाणे दुर्बीण आणि पद्धत वापरली. जरी ग्रेगरीमुळे त्याचा प्रोफेसर होण्याचा चान्स हुकला तरी शास्त्रज्ञ म्हणून त्याचे थोरपण त्याने मानले हा त्याचा पण मोठेपणा. १७१८ मध्ये त्याने स्थिर ताऱ्यांची गती शोधण्याची योग्य पद्धत शोधली.
- अखेर १७२० मध्ये त्याला ऍस्ट्रॉनॉमर रॉयल हे फ्लामस्तीड नंतरचे पद मिळाले आणि ते शेवट पर्यंत त्याचेच राहिले.
असा हा थोर शास्त्रज्ञ २५ जानेवारी १७४२ मध्ये मरण पावला. पण एका धुमकेतूच्या रूपाने आजही तो अजरामर आहे.