Donald Trump Information in Marathi, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
बदलत्या अमेरिकेचा बिनधास्त डोनाल्ड ट्रम्प :
अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाचा अध्यक्ष कोण होणार याकडे सगळ्या जगाचे लक्ष लागलेले असते. त्यातून त्या उमेदवाराला प्रत्येक नागरिकाकडून पसंती मिळवावी लागते. सगळी अमेरिका ह्या कार्यक्रमात उत्साहाने भाग घेते. निवडणूकीची सुटी सहलीत घालवित नाहीत. लोकशाहीचे खऱ्या अर्थाने पालन होते आणि तावून सुलाखून अध्यक्ष निवडला जातो. त्यातून 2016ची निवडणूक तर फारच गाजली कारण आमने सामने होते दोन दिग्गज व्यक्तिमत्व. एका बाजूला होत्या राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन ह्यांची पत्नी आणि स्वत: एक लोकप्रिय नेत्या हिलरी क्लिंटन आणि दुसऱ्या बाजूला होते एक यशस्वी व प्रचंड श्रीमंत उद्योजक तसेच टीव्हीतील व्यक्ती डोनाल्ड ट्रम्प! अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच एक स्त्री उमेदवार राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती आणि त्यांना खूप पाठिंबा पण मिळत होता. अशावेळी साम, दाम, दंड भेद अशा सर्व हत्यारांसहित उत्तम व्यूह रचना करून ट्रम्प यांची सरशी झाली.
एक उद्योगपती, टीव्ही व्यक्तिमत्व, विश्वसुंदरी स्पर्धेचे आयोजक काही पुस्तकांचे लेखक असे प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या व्यक्तीला अचानक राजकारणात का प्रवेश करावासा वाटला? आणि तेथेही त्यांनी यशच मिळवले. गंमत म्हणजे ट्रम्प यांचे पूर्वज मुळचे जर्मन असलेले. पण डोनाल्ड जन्मापासून न्यूयॉर्कमधे वाढलेले असल्याने सच्चे अमेरिकन झाले आणि त्यांनी मूळ अमेरिकन लोकांची बरोबर नस ओळखली आहे हेच त्यांच्या यशाचे गमक आहे.
अमेरिका फर्स्ट :- घरे, उत्तुंग इमारती, हॉटेल बांधताना आलेल्या अनुभवावरून डोनाल्ड ट्रम्पने नवीन अमेरिका बांधण्याचे आव्हान स्वीकारले ते त्यांच्या सच्चे अमेरिकापणामुळे. ते वडीलांकडून जर्मन आणि आईकडून स्कॉटिश आहेत तरीही त्यांना त्यांच्या अमेरिकन असल्याचा अभिमान आहे. त्यांचा जन्म 14 जून 1946 ला न्यूयॉर्क मध्ये झाला. म्हणजे ते आतापर्यंत झालेल्या राष्ट्राध्यक्ष्यांमध्ये सर्वात वयस्कर आणि सर्वात श्रीमंत आहेत. तसेच ते एकमेव असे अध्यक्ष आहेत ज्यांना सरकारी किंवा लष्करी पूर्वपीठिका नाही आहे. कारण कॉलेजमध्ये असताना त्यांना पायामुळे लष्करी सेवा जास्त वेळ पूर्ण करता आली नाही. त्यांनी व्हार्टन स्कूलमधून इकोनॉमिक्स मध्ये बीएससी केले. ह्या आणि बांधकामाच्या अनुभवाने त्यांना अमेरिकेच्या अर्थकारण आणि प्राधान्याची कल्पना आली.
पण त्याआधीच त्यांनी घराच्या इ.ट्रम्प & सन्स ह्या कंपनीत काम सुरु केले होते. 1973 मध्ये त्यांना कंपनीचे अध्यक्ष केले गेले. त्यांनी मॅनहॅटन येथे ग्रॅण्ड हयात हॉटेलचे सुशोभीकरण आणि पुनर्निर्माण केले तसेच उत्तुंग असे ट्रम्प टॉवर बांधले. अशा तर्हेने बांधकामात त्यांनी नवीनीकरण आणि आधुनिकतेचे तंत्र वापरून चांगले यश मिळविले. त्यांनी पाम बीच, फ्लोरिडा, येथे खाजगी क्लब बांधला तसेच अटलांटिक सिटी येथे ट्रम्प ताज महाल हा कॅसिनो, ट्रम्प हॉटेल्स, रीसॉर्ट,गोल्फ कोर्सेस अशा मालमत्तेत भांडवल वाढवून धंदा उत्कर्षाला नेला. त्यांचे सर्वात उंच बिल्डींग एम्पायर स्टेट मध्येही ५०% भांडवल होते. त्यांनी हॉटेल आणि टॉवर फक्त अमेरिकेतच नाही तर जगातील मोठ्या शहरांमध्येही बांधले जसे, शिकागो, टोरोंटो, दुबई होनोलुलू, इस्तंबूल, मनीला, मुंबई आणि इंडोनेशिया. ह्या सर्व उद्योगातून त्यांना आर्थिक घडामोडींचे ज्ञान झाले. तसेच निर्णय क्षमता आणि धंद्यातील जोखीम ह्या बाबतीत ही ते निपुण झाले. 1990मध्ये दिवाळखोरीचा सामना करावा लागून आणि त्यात सर्व इमारतींवर कर्ज होऊनही त्यावर त्यांनी मात केली
बांधकामाबरोबरच त्यांनी इतर उद्योगांमध्येही यश मिळविले. 1983 मध्ये फुटबॉल सामन्यात एक टिम विकत घेतली आणि अनेक ठिकाणी गोल्फ क्लब चालू केले. 1996 ते 2015 पर्यंत म्हणजे अध्यक्षीय निवडणुकी पर्यंत त्यांनी सौंदर्य स्पर्धांचे पण आयोजन केले. त्यामध्ये त्यांना मीडियाची ताकद चांगली समजली जी त्यांनी अध्यक्षीय निवडणुकीत वापरली. जेथून पैसे मिळवता येतील असे सर्व मार्ग त्यांनी चोखाळले. शैक्षणिक क्षेत्रात ही त्यांनी रियल इस्टेट चे क्लास काढले. ट्रम्प-आर्ट ऑफ डील ह्या पुस्तकाच्या हक्काचे वितरण करून फौंडेशनची स्थापना करून देणग्या मिळविल्या आणि ह्याचे पैसे आरोग्यासाठी असलेल्या संस्थांना दिले. टीव्ही शो “द अप्रेंटीस” पण केला. अभिनय पण केला. त्यांनी काय केले नाही अशी कुठलीच गोष्ट नव्हती. इतके यश मिळवूनही अध्यक्षीय निवडणुकीत त्यांना हिलरीपेक्षा कमी पसंती मिळाली.
अमेरिकेत अध्यक्ष पदासाठी उभे असलेल्या उमेदवाराला सार्वमताला सामोरे जावे लागते. त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे त्यांना फक्त २२% विश्वास दर्शक मते मिळाली जेथे त्यांच्या आधीच्या अध्यक्ष ओबामांना 64 % मते मिळाली होती. तरीही न डगमगता मिडीयाचा कुशलतेने वापर करून, अमेरिकी तरुणांना बेरोजगारी दूर करण्याचे, निर्वासितांना हाकलण्याचे आणि 9/11च्या दुखऱ्या जागी बोट ठेवून त्यांनी निवडणूक जिंकली. आणि ताबडतोब एक एक धाडशी निर्णय घेण्यास व त्यांची अंमल बजावणी करण्यास सुरुवात केली.
निवडणुकीच्या अजेंड्या मध्येच त्यांनी सांगीतले होते की मेक्सिको मधून येणारे लोंढे अमेरिका आणि मेक्सिकोत भिंत बांधून थोपविन. तसेच त्यांनी केले. त्यावर खूप टीका झाली पण ते ठाम राहिले. इथे त्यांनी अमेरिकन प्रतिगामी लोकांचे मन जिंकले. कुठल्याही समृद्ध देशाला निर्वासितांचे लोंढे ही डोकेदुखी असते. ते लोक येऊन गुन्हेगारी करतात, स्थानिकांच्या हक्कावर गदा आणतात. त्यांच्या नोकरीच्या संधी घालवितात. आणि मानवतेच्या साठी त्यांना आश्रय द्यावाच लागतो. पण ट्रम्प यांनी कुठल्याही देशांची पर्वा न करता मुस्लिम बहुल देशातील लोकांना येण्यास बंदी केली. नंतर फक्त ग्रीन कार्ड धारकांना परवानगी दिली. दुसरा धाडसी आणि योग्य निर्णय म्हणजे पाकिस्तानला दहशतवादी लोकांना मदत करतो म्हणून उघडपणे खडसावले आणि त्याचे अनुदान बंद केले. नंतर नोकरीसाठी येणार्या लोकांना ठामपणे ठणकावले की जे अमेरिकेच्या आर्थिक बाबीत हातभार लावतील त्यांनीच तेथे नोकर्या कराव्या. H1B व्हिसा सुद्धा कडक करून केवळ लग्नाने अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्यावर अंकुश ठेवला. ह्या सगळ्यातून त्यांचे अमेरिकेची आर्थिक स्थिती बळकट करून अमेरिकेला बलाढ्य बनविण्याचे स्वप्न आहे हे दिसून येते. आणि आजच्या जगातील अमेरिका किंवा सगळेच तरुण हे बघतात की मार्ग कुठलाही असो “Nothing succeeds like success” ह्यावरच विश्वास ठेवतात. त्यामुळे ट्रम्प आता लोकप्रिय झाले आहेत.
आणि त्यांचे “अमेरिका फर्स्ट (आधी अमेरिका)” हि घोषणा आता मुळ धरू लागली आहे. हात घालीन तेथे यश हाच फंडा असलेले आणि जगाची पर्वा न करणारे अध्यक्ष आता अमेरिकेला मिळाले आहेत. त्यांचा निधडेपणा त्यांनी घेतलेले निर्णय पॅरीस करार, ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिप आणि इराण न्युक्लीयर डील ह्यांनी दाखवून दिला आहे. त्याबरोबरच चीनलाही व्यापारात अंकुश लावला आहे आणि त्याला शह देण्यासाठी भारत आणि कोरियाशी समझोता करून आणखी मुत्सद्दी खेळी खेळली आहे. येणारे वर्ष अमेरिका जागतिक राजकारणात एकटी पडते की सर्वांना दिशा दाखवते हे पुढची अध्यक्षीय निवडणूक ठरवेल, कारण भारतासारखे अमेरिकेत तेच अध्यक्ष वर्षानुवर्षे असत नाही. तो पर्यंत त्यांचे नाव एक बदलत्या अमेरिकेचा चेहरा म्हणून निश्चित घेतले जाईल.