Diwali Information in Marathi दिवाळी सणाची माहिती
- दिवाळीला दीपावली हि म्हटले जाते. हा सण प्रामुख्याने भारतात हिंदू, तसेच दक्षिण आशिया व आग्नेय आशियातील इतर धर्मीय लोकात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
- विविध देशांमध्ये या सणाच्या वेळेस सार्वजनिक सरकारी सुट्ट्या दिल्या जातात. उदाहरणार्थ भारत, मलेशिया,गयाना,श्रीलंका,त्रिनिदाद व टोबॅगो, फिजी,म्यानमार, मॉरिशस, सिंगापूर व सुरिनाम.
- असे मानले जाते कि दिवाळी हा सण सुमारे तीन हजार वर्षे जुना आहे. पण त्या वेळी हा सण फार वेगळ्या स्वरूपाने साजरा केला जात होता.जुन्या काळात या उत्सवाला यक्षांचा उत्सव मानला जायचा. हेमचंद्राने असे लिहून ठेवलेले आहे कि दिवाळीच्या रात्रीला यक्ष रात्री म्हटले जात होते. असेच दिवाळीबद्दल वर्णन वात्स्यायनाच्या कामसूत्रातही नोंदलेले आहे. तसेच नील्मत पुराणात आताच्या दिवाळीस दीपमाला असे संबोधले आहे.
- दिव्याला अंधकार चिरून प्रकाश निर्माण करणारा मांगल्याचे प्रतीक मानला जातो.याच अनुशंघाने दीपावलीच्या प्रकाशाने लोकांच्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. निसर्गाने पावसाच्या पाणीरूपानी जे भरभरून दिलेले असते त्याच्या कृतज्ञतेचा,समृद्धीचा,आनंद उत्सवाचा हा सोहळा असतो. दिवाळीच्या दिवशी सायंकाळी घरासमोर रांगोळ्या काढून भरपूर पणत्या लाऊन लखलखाट केला जातो. घरांवर आकाशदिवे लावले जातात.महाराष्ट्र राज्यात लहान मुले या काळात मातीचा किल्ला तयार करतात.त्यावर मातीचे हत्ती घोडे इत्यादी खेळणी मांडतात. धान्य पेरून सुंदर देखावा तयार करतात.
- महाराष्ट्रात दिवाळी सण ५ ते १० दिवस साजरा केला जातो.या दिवसात वसुबारस,धनत्रयोदशी,नरक चतुर्दशी,लक्ष्मीपूजन असे दिवस साजरे केले जातात व त्या प्रमाणे पूजेचे आयोजन केले जाते.
Diwali Festival Information in Marathi : Importance
वसुबारस
गोवत्सद्वादशीस म्हणजेच आश्विन कृष्ण द्वादशीस, वसुबारस हा सण उत्साहाने साजरा केला जात असतो.वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी असा वसुबारस या दिवसाचा अर्थ आहे. या दिवसाचे गोवत्स द्वादशी असेही दुसरे नाव आहे.भारत एक कृषिप्रधान देश असल्यामुळे या दिवसाचे महत्व विशेष आहे.या दिवशी सायंकाळी गाईची तिच्या पाडसासह पूजा करतात. गायीची पूजा करून घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे अशी प्रार्थना केली जाते.
धनत्रयोदशी
धनत्रयोदशी हा सण आश्विन कृष्ण त्रयोदशीस साजरा केला जातो.या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथेत असलेल्या भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मरणार असतो. मरणा आधी आपल्या पुत्राने जीवनातील सर्व सुखे उपभोगावीत म्हणून हेमा राजा व राणी त्याचे लग्न लावून देतात. लग्नानंतरचा चवथा दिवस हा भविष्यवाणीप्रमाणे तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री काळजीने त्याची पत्नी त्यास झोपूच देत नाही. त्याच्या अवतीभवती भरपूर सोने चांदी हिरे जवाहर माणिक मोती ठेवले जातात. राजाच्या महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या चांदीने भरून सजविले जाते.
संपूर्ण राजमहालात मोठमोठ्या दिव्यांनी लख्ख प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून कसेबसे पत्नी त्याला जागे ठेवते. जेव्हा भविष्यवाणीप्रमाणे यम राजकुमाराच्या खोलीत सापाच्या रूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपूण जातात.या कारणास्तव यम राजकुमाराला आपल्या सोबत यमलोकात घेऊन जाऊ शकला नाही आणि यम आपल्या यमलोकात परततो. आणि राजकुमाराचे प्राण वाचतात.या कथेप्रमाणे या दिवसास यमदीपदान असेही म्हटले जाते. धनत्रयोदशी दिवशी संध्याकाळी घराच्या बाहेर दिवा लावून दिव्याच्या वातीचे टोक दक्षिणेस केले जाते आणि दिव्यास नमस्कार केला जातो जेणे करून अपमृत्यु टळतो असा जनमानसात समज आहे.
नरक चतुर्दशी
नरक चतुर्दशी हा सण आश्विन कृष्ण चतुर्दशीस साजरा केला जातो.या दिवशी पहाटे लक्ष्मीचे मर्दन करून स्वतःमधील नरकरूपी पापवासनांचा,अहंकाराचा समूळ उच्चाटन करायचे असते.नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करून देवाची पूजा केली जाते. चिवडा चकली बुंदी आदी गोड पदार्थाचे सेवन केले जाते.
लक्ष्मीपूजन
लक्ष्मीपूजन हा सण आश्विन अमावशेला साजरा केला जातो.
या दिवशी संध्याकाळी लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते.असा समज आहे कि लक्ष्मी ही फार चंचल असते.म्हणूनच नेहमी हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे स्थिर पाटावर केले जाते. त्यामुळे लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे.या दिवशी घरा घरातून श्रीसूक्तपठण केले जाते. व्यापारी लोक या दिवशी हिशोबाचे नवीन पुस्तक पूजा झाल्या नंतर वापरायला काढतात.हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू केले जाते. या दिवशी पण घरातील सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवले जातात. त्यावर तांब्या,वाटी किंवा तबक ठेवून त्यात सोने चांदीचे दागिने ठेवून त्यांची पूजा करून लक्ष्मी देवीची प्रार्थना केली जाते.
विशेषतः व्यापारी लोक हा दिवस फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी स्वच्छते साठी लागणारी नवी केरसुणी किंवा झाडू विकत घेतात.अशी प्रथा आहे कि त्या नवीन केरसुणीलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.