सी. व्ही. रामन माहिती
भारताने आतापर्यंत जगाला अनेक वैज्ञानिक, खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ दिले आहेत. भारताचे नाव संपूर्ण जगात अभिमानाने उंचावणाऱ्या अनेक महान व्यक्तींपैकी एक आहेत चंद्रशेखर वेंकटरामन. नोबेल पुरस्कार, भारतरत्न पुरस्कार, लेनिन शांती पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांचे मानकरी आहेत चंद्रशेखर वेंकटरामन. प्रकाश प्रकीर्णन आणि रामन प्रभाव असे अनेक शोध लावून रामन भौतिक शास्त्रात मोठ्या स्थानी पोहचले आहेत.
चंद्रशेखर वेंकटरामन यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८८८ रोजी झाला होता. त्यांचे वडील चंद्रशेखर अय्यर आणि माता पार्वती अम्मल तामिळनाडू येथील तिरुचिरापल्ली या गावी रहात. त्यांचे वडील एस. पी. जी. कॉलेजमध्ये भौतिक शास्त्राचे प्राध्यापक होते तसेच त्यांच्या माता सुद्धा सुशिक्षित घराण्याच्या होत्या. १८९२ मध्ये त्यांच्या वडिलांना विशाखापट्टणमच्या श्रीमती ए. व्ही. एन. कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांचे प्राध्यापक म्हणून नेमण्यात आले. चार वर्षाचे असताना त्यांचे पूर्ण कुटुंब विशाखापट्टणमला राहायला गेले आणि चंद्रशेखर रामन यांचे प्राथमिक शिक्षण विशाखापट्टणम येथेच झाले. विशाखापट्टणमच्या नैसर्गिक सौंदर्याची आणि तेथील विद्वान लोकांच्या बुद्धिमत्तेची त्याना लवकरच भुरळ पडली.
चंद्रशेखर रामन लहानपणापासूनच अतिशय हुशार होते. त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी मेट्रिकची परीक्षा पास केली होती. तेव्हाच त्यांनी एनी बेसेंट यांचे भाषण ऐकले त्यांचे लेख वाचले. तसेच रामायण, महाभारत हे ग्रंथ सुद्धा वाचले. त्यांच्या वडिलांना चंद्रशेखर यांना उच्च शिक्षणासाठी विदेशी पाठवायची इच्छा होती परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे त्यांना विदेशी जाता आले नाही. त्यांना त्यांचे शिक्षण भारतातच पूर्ण करावे लागले पण याचा त्यांच्या उपलब्धींवर फारसा नकारात्मक प्रभाव पडला नाही. १९०३ मध्ये त्यांनी चेन्नईच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांची योग्यता पाहून अनेक प्राध्यापकांनी त्यांना गैरहजर राहण्याची सूट दिली होती. बी.ए. च्या परीक्षेत ते एकटेच प्रथम श्रेणीत पास झाले होते. तसेच त्यांना भौतिकशास्त्रात सुवर्णपदक देखील मिळाले होते. १९०७ मध्ये त्यांनी मद्रास विश्वविद्यालयातून गणित या विषयात एम.ए. पूर्ण केले. या खेपेस देखील ते प्रथम श्रेणीत पास झाले होते आणि त्यांच्या एवढे गुण त्या वेळपर्यंत कोणालाच मिळाले नव्हते.
विद्यार्थी म्हणून शिकत असतानाच त्यांचे अनेक विषयावर संशोधन चालू होते. १९०६ मध्ये त्यांनी प्रकाश विवर्तन या विषयावर प्रबंध लिहिला होता जो लंडनच्या फिलोसॉफीकल पेपर मध्ये प्रकाशित करण्यात आला. त्या काळात अलौकिक बुद्धिमत्ता असणाऱ्या चंद्रशेखर यांना वैज्ञानिक बनवू शकणाऱ्या सुविधा सहजपणे उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे त्यांनी भारत सरकारच्या वित्त विभागाची स्पर्धा परीक्षा दिली आणि जून १९०७ मध्ये ते असिस्टंट अकाऊंट जनरल म्हणून कलकत्ता येथे रुजू झाले. एवढ्या उच्च पदाची सरकारी नोकरी मिळवणारे ते पहिले भारतीय होते.
एके दिवशी रामन यांनी एका मुलीला वीणा वाजवताना पहिले. वीणेच्या मधुर स्वरांनी ते भारावून गेले आणि त्या मुलीशी लग्न करण्याचा त्यांनी निश्चय केला. तिचे नाव होते लोकसुंदरी. रामन चांगल्या हुद्द्यावर आणि सरकारी नोकरीत असल्याने लोकसुंदरीच्या आई – वडिलांनी लगेचच होकार दिला. त्यांचे लग्न मोठ्या थाटामाटात झाले. काही काळाने त्यांना दोन मुले देखील झाली. सर्वांना वाटत होते कि त्यांच्या जीवनात आता स्थिरता आली आहे. चांगला पगार, मनासारखी बायको, म्हातारपणी पेन्शन अजून काय पाहिजे माणसाला सुखी होण्यासाठी? परंतु रामन यांचे मन नोकरीत लागत नव्हते. त्यांना विज्ञान विषयात काहीतरी करून दाखवायचे होते आणि एके दिवशी योगायोगाने त्यांनी एक बोर्ड पहिला. ‘द इंडियन एसोसिएशन फॉर द कल्टीवेशन ऑफ सायन्स’ या संस्थेचा. त्यांनी तिथे आपली ओळख सांगितली आणि संस्थेच्या प्रयोगशाळेत प्रयोग करण्याची अनुमती मिळवली. पण काही दिवसांनी त्यांची बदली रंगून आणि नंतर नागपूर येथे झाली. मग त्यांनी आपल्या घरातच प्रयोगशाळा तयार केली आणि अध्ययनात बुडून गेले. १९११ मध्ये त्यांची बदली परत कलकत्त्याला झाली आणि त्यांनी पुन्हा संस्थेच्या प्रयोगशाळेत प्रयोग करायला सुरु केले. असे १९१७ पर्यंत सुरु राहिले. दरम्यान ते ध्वनी लहरींचे कंपन आणि कार्य यावर संशोधन करत होते. वाद्यांच्या भौतिकशास्त्राविषयी त्यांचे सखोल ज्ञान पाहून, १९२७ मध्ये जर्मनीच्या भौतिकशास्त्र विश्वकोशासाठी त्यांच्या कडून वाद्यांच्या भौतिकशास्त्राविषयी एक लेख लिहून घेतला गेला. या कोशात लेख लिहिणारे ते एकमेव व्यक्ती होते जे जर्मन नव्हते.
१९१७ मध्ये कलकत्ता विश्वविद्यालयात भौतिकशास्त्र प्राध्यापक पद निर्माण झाले तेव्हा विद्यापीठाचे कुलगुरू आशुतोष मुखर्जी यांनी त्यांना आमंत्रित केले. रामन यांनी मागचापुढचा विचार न करता उच्च पदाचा त्याग केला आणि प्राध्यापक पद स्वीकारले. १९२२ मध्ये त्यांनी ‘प्रकाशाचे आण्विक विकरण’ नावाचा मोनोग्राफ प्रकाशित केला. २८ फेब्रुवारी १९२८ रोजी अनेक वर्षांच्या परिश्रमानंतर त्यांनी ‘रामन प्रभाव’ याचे संशोधन पूर्ण केले.
त्यांचे भौतिकशास्त्रातील योगदान पहाता १९३० मध्ये त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले. जे. एन. टाटा यांनी सुरु केलेल्या भारतीय विज्ञान संस्थेचे १९३० मध्ये रामन निर्देशक झाले. ते पहिले भारतीय होते जे या उच्च पदावर काम करत होते. या संस्थेला उच्च मान मिळवून देण्यासाठी त्यांनी बरेच बदलाव केले. अनेक विदेशी वैद्यानिकांना भारतात आणण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. भारतातील वैद्यानिकांना देखील खूप प्रोत्साहन दिले. त्यांच्या मुळेच भारताला विक्रम साराभाई, होमी जहांगीर भाभा, के. आर. रामनाथन यासारखे महान वैद्यानिक लाभले.
१९५२ मध्ये त्यांना उपराष्ट्रपती बनण्यासाठी आमंत्रण मिळाले होते परंतु रामन यांना राजकारणात अजिबात रुची नसल्यामुळे त्यांनी नकार कळवला. १९५४ मध्ये भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा किताब दिला. तसेच १९५७ मधील लेनिन शांती पुरस्काराचे सुद्धा ते मानकरी ठरले. रामन ८२ वर्षाचे असताना २१ नोव्हेंबर, १९७० रोजी चैतन्यात विलीन झाले. परंतु जगाचा निरोप घेण्याआधी त्यांनी आपल्या संशोधनाचा बहुमुल्य ठेवा आपल्याला देऊन गेले. त्यांच्या स्मरणार्थ, रामन प्रभावाचा शोध लावणाऱ्या दिवशी म्हणजेच २८ फेब्रुवारीला भारतात ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ साजरा केला जातो.
Very nice information
Nice information
Hi
Guys
Nice info
Helpful