श्रीमंत बाजीराव पेशवे
झाले बहु होतील बहु परंतु या सम हा! सगळ्या पेशव्यांमध्ये उजवा आणि एकही युद्ध न हरलेला उत्तम सेनांनी. शिवाजी महाराजांचे नातू शाहु यांचा सेनापती. बालाजी विश्वनाथ बल्लाळ यांचा चिरंजीव. शाहू महाराजांनी त्यांना बालाजी विश्वनाथाच्या मृत्यूनंतर पेशवा म्हणून घोषित केले तेंव्हा ते फक्त वीस वर्षांचे होते. पण अतिशय समर्थपणे त्यांनी मराठा साम्राज्याची धुरा आपल्या मजबूत खांद्यांवर पेलली, इतकेच नव्हे तर शाहू महाराजांना काहीच चिंता राहिली नाही. उलट साम्राज्य उत्तर आणि दक्षिणे कडे फैलावले. त्यांच्या हुकमतीखाली सर्व भारत भर मराठ्यांना जय मिळत गेला आणि मोगल शत्रू त्यांच्या नावानेच चळचळा कापू लागले.
शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी :
बाजीराव पेशव्यांचा जन्म 18 ऑगस्ट 1700 साली झाला. वडील बालाजी विश्वनाथ आणि आई राधा बाई. त्यांना चिमाजी नावाचा धाकटा भाऊ होता. त्यांना थोरले बाजीराव, श्रीमंत, राउ असे म्हणून पण संबोधित. लहानपणापासून वडीलांबरोबर फिरून त्यांनी राजनीति, रणनीती आणि कूटनीती चांगलीच जाणून घेतली. अवघ्या विसाव्या वर्षी शाहू महाराजांनी त्यांना पेशवा केले त्या अर्थी नक्कीच शाहू महाराजांनी त्यांचे गुण हेरले असतील.
बाजीराव पेशव्यांना जेव्हा पद मिळाले तेंव्हा मोगल साम्राज्य औरंगजेबाच्या मृत्यूनंतर खिळखिळे झाले होते. सगळीकडे अनागोंदी होती. हा मोका साधून बाजीरावांनी शाहू महाराजांना विचारले कि ह्या वृक्षाच्या एक एक फांद्या तोडत बसण्यापेक्षा मुळावरच घाव घातला तर आपण उत्तरेकडे आपल्या राज्याचा विस्तार करू शकू. शाहू महाराजांना विचार पटला आणि ते म्हणाले “तुम्ही हे नक्कीच करू शकाल” त्यानंतर बाजीरावांची अखंड मोहीम सुरु झाली.
शौर्याचा झंझावात :
सगळ्यात आधी त्यांनी मराठ्यांसाठी डोकेदुखी असलेल्या निजामाचा पालखेड येथे पराभव करून त्याच्याकडून महाराजांसाठी चौथाई आणि सरदेशमुखी कबुल करून घेतली. निजाम मराठी सरदारांच्या दुहीचा फायदा घेऊन त्यांच्यात फूट पाडीत असे. बाजीरावांनी त्याचे तोंड बंद केले. मराठी गादीचा दुसरा वारसदार दुसरे शंभू महाराज हे त्र्यंबकराव दाभाडे ह्यांना मिळाले. त्र्यंबकराव दाभाडे बाजीरावांचा द्वेष करीत होते. बाजीरावाने त्यांना बडोद्याजवळ लढाईत हरविले आता त्यांना महाराष्ट्रात कोणी शत्रू नव्हता. पण ते स्वस्थ बसणाऱ्यांपैकी नव्हते. त्यांनी आपला मोर्चा गुजरात आणि माळवा प्रांताकडे वळविला. त्या पाठोपाठ बुंदेलखंड वर विजय मिळवला. राजा छत्रसालला मदत करून त्याचे राज्य मिळवून दिले.
साहस शौर्य आणि धोरणीपण :
अशा तऱ्हेने ते सतत मोहिमेवर जात राहिले आणि साऱ्या भारत भर मराठ्यांची कीर्ति पसरत राहिली. असे म्हणत की, ते चालत्या घोड्यावर सैनिकां बरोबर शेतात हुरडा खाऊन पुढे लढाईवर निघत होते. असा सेनांनी असल्यावर सैनिकांना पण हुरूप आला नसेल तरच नवल! म्हणूनच असे म्हणतात की 41 लढाया करून कुठलीही लढाई न हरलेला एकमेव सेनापति म्हणजे बाजीराव पेशवा. छत्रपतींपेक्षा बाजीरावच आता सर्व कारभार पाहत होते. साहजिकच त्यांना अंतर्गत विरोधाचा पण सामना करावा लागला. त्यावर त्यांनी असा उपाय काढला की जुने सर्व अडचणीची माणसे काढून नवीन शूर सरदार निवडले आणि त्यांना एक एक मुलुख सांभाळण्यास दिला. जसे नागपूरचे भोसले, बडोद्याचे गायकवाड, ग्वाल्हेरचे शिंदे, इंदूरचे होळकर इत्यादि. हे पण खूप शूर होते. त्यांनी बाजीराव होते तो पर्यंत मराठी साम्राज्याचा विस्तार केला.
जसे मोगल साम्राज्य लयाला जायला लागले तसे ब्रिटिश आणि पोर्तुगीज डोके वर काढू लागले. त्यांचा धोका आधीच ओळखून आणि शिवाजी महाराजांचा समुद्री क्षेत्र वाढविण्याचा धोरणीपणा अंगिकारून त्यांनी चिमाजी ह्या धाकट्या भावाला वसई आणि जंजिरा जिंकायला पाठवले आणि त्यांनी ते जिंकून शिवाजी महाराजांचे स्वप्न पुरे केले.
धर्माचे रक्षण :
ब्रिटिश आणि पोर्तुगीज लोक अतिशय जुलूम करीत होते. ते बायका मुलांना त्रास देत,लोकांना सक्तीने धर्मांतर करायला लावीत. बाजीराव पेशव्यांनी हिंदू धर्माचे रक्षण केले. शूर, साहसी आणि धर्माचा रक्षक म्हणून त्यांची कीर्ति दिगंत पसरली. त्यांच्यात असलेल्या अद्भुत रण कौशल्य, साहस, नेतृत्व या गुणांमुळे ते लोकप्रिय झाले. त्यांच्या कारकिर्दीत मराठे साम्राज्याचा विस्तार झाला, जे मराठे पूर्वी फक्त बचाव करीत होते ते आता आक्रमण पण करू लागले. उत्तरेकडे त्यांना लढाईत मदत करायला राजे याचना करायला लागले. दक्षिणे कडे पण कर्नाटक जिंकून तेथे मराठी अमल सुरू केला.
बाजीराव उत्तम लढवय्या होते, तसेच ते शिवाजी महाराज यांच्या सारखे उत्तम घोडेस्वार होते. घोड्यावरून भालेफेक ते अतिशय लीलया करीत.पण सूर्याला ग्रहण लागते तसे त्यांना पण अंतर्गत कलहामुळे खूप लवकर मरण आले. केवळ चाळीस वर्षांचे असताना 28 एप्रिल 1740 ला मध्यप्रदेशात खरगाव येथे त्यांचा आजाराने रणभूमीवरच मृत्यू झाला. ते जर आणखी जगले असते तर आज आपल्याला दिल्लीवर मराठ्यांचे राज्य बघायला मिळाले असते. त्यांनी मनात आणले असते तर ते स्वत: राजा झाले असते पण छत्रपतींबद्दल निष्ठा इतकी होती की जिंकलेला मुलुख आणि खंडणी सगळी ते छत्रपतींच्या पायावर ठेवीत. हा पण त्यांचा स्वामी भक्तीचा आदर्श आहे. महाराष्ट्राच्या सुपुत्रांपैकी सर्वात धडाडीचा हा सुपुत्र होता. म्हणूनच म्हणतात की पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. हे त्यांच्या बाबतीत खरे होते.
I want details about the second Bajirav Peshva and his full family.