Indian Airforce Information in Marathi
भारतीय वायुदल
कोणत्याही देशाचे रक्षण करण्यासाठी त्या देशाचे सैन्य अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असते. परकीय आक्रमणांपासून आपल्या देशाचे रक्षण करणे, देशाच्या सर्व सीमारेषा शत्रूपासून सुरक्षित ठेवणे तसेच आंतरिक समस्यांमध्ये देशातील नागरिकांचे रक्षण करणे, नैसर्गिक आपत्तीमध्ये लोकांना वाचवणे असे एक ना अनेक कामे हे आपले सैन्य करत असते. सैन्याचे मुख्यत्वे ३ प्रकार पडतात भूदल म्हणजे आर्मी, वायुदल म्हणजे एअर फोर्स आणि नौदल म्हणजे नेव्ही. जमीन, आकाश आणि पाणी या तिन्ही क्षेत्रात आपल्या सीमेचे रक्षण करणे हेच यांचे मुख्य ध्येय असते. आज आपण बघणार आहोत भारताच्या हवाई सीमेचे रक्षण करणाऱ्या भारतीय वायूदलाबद्दल.
भारतीय वायुदलाचे ब्रीदवाक्य :
- नभःस्पृशं दीप्तम् हे आपल्या भारतीय वायुदलाचे ब्रीदवाक्य आहे. ज्याचा अर्थ आहे तुमचे दैदिप्यमान रूप आकाशातदेखील चमकत आहे.
- भारतीय वायुसेनेच्या जवानांनी हे ब्रिदवाक्य आपल्या नसानसात भिनवलेले आहे. आजपर्यंतच्या त्यांच्या उत्तम कामगिरीने त्यांनी आकाशाला नक्कीच स्पर्श केलेला आहे. भारताचे पूर्व राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी हे ब्रीदवाक्य आपल्या वायुदलासाठी सुचवलेले आहे.
- एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंग भदोरिया यांनी सप्टेंबर २०१९ मध्ये भारताचे सध्याचे हवाईदलप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे.
इतिहास :
- भारतीय वायुदलाची अधिकृत स्थापना ८ औक्टोम्बर १९३२ मध्ये म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व काळात करण्यात आली होती. वायुदलाला ८८ वर्षे झाली आहेत. स्वातंत्र्यापर्यंत भारतीय वायुसेनेचे नाव रॉयल एअरफोर्स असे होते, भारताच्या स्वातंत्र्या नंतर रॉयल हा शब्द काढून टाकण्यात आला आणि वायुदलाचे नाव इंडियन एअरफोर्स असे करण्यात आले. सुब्रतो मुखर्जी हे भारताचे पहिले वायुसेना प्रमुख होते.
- दुसऱ्या महायुद्धात इंडियन एअरफोर्सने ब्रिटिशांकडून मोठी कामगिरी बजावली होती.
सामर्थ्य :
- एल तेजस – तेजस हे त्याच्या समकालीन समवर्गातील सर्वात लहान आणि सर्वात गतिमान लढाऊ विमान आहे. हे मेक इन इंडिया अंतर्गत डीझाइन केलेले आहे. हे एक मल्टि रोल, सिंगल सीट सिंगल जेट लढाऊ विमान आहे.
- मिग २७ – हे मूळचे रशियन बनावटीचे सिंगल इंजिन सिंगल सीटर स्ट्राइक लढाऊ विमान आहे, याचा वेग १७०० किमी/ ताशी एवढा आहे.
- मिराज २००० – मूळ फ्रेंच बनावटीचे असलेले हे एअरक्राफ्ट सिंगल सीटर सिंगल इंजिन असलेले एक लढाऊ विमान आहे. याचा वेग ताशी २४९५ किमी एवढा प्रचंड आहे. यामध्ये लढाऊ क्षेपणास्त्र क्षमता देखील आहे.
- मिग २१ बाइसन – मूळ रशियन बनावटीचे हे सिंगल सीटर सिंगल इंजिन ग्राउंड अटॅक लढाऊ विमान आहे. याचा वेग ताशी २२३० किमी एवढा आहे. यामध्ये एक दुहेरी बॅरल तोफ देखील आहे.
- आपल्या सर्वानाच उत्कंठा असलेला राफेल या बहुचर्चित आणि सर्वशक्तिमान लढाऊ विमान ताफ्याचा लवकरच भारतीय वायुदलात समावेश होणार आहे.
हवाईदलाच्या कामगिरी :
- २०१६ मध्ये उरी येथे लष्करी तळावर हल्ला झाला. यामध्ये भारताचे १९ जवान शहिद झाले. ये नया हिंदुस्थान है, ये घर मे घुसेगा भी और मारेगा भी असे म्हणत या हल्ल्याचा बदला घेतला गेला. भारतीय लष्कराने पाकिस्तानात घुसून अतिरेक्यांचा खात्मा केला. या मोहिमेत भारतीय वायुदलाने मोठी कामगिरी केली होती.
- भारतीय हवाई सीमेचे रक्षण करणे असो किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये सामान्य नागरिकांचे रक्षण करणे असो भारतीय वायुदल नेहमीच अग्रेसर असते. २०१३ साली उत्तराखंड मध्ये आलेल्या प्रचंड महाकाय महापुरात भारतीय वायुसेनेने केलेली कामगिरी अविस्मरणीय आहे. अनेक धोके पत्करून त्यांनी महापुरात अडकलेल्या अनेक नागरिकांचे प्राण वाचवलेले आहेत. खराब हवामान, सतत कोसळणारा पाऊस यांची पर्वा न करता त्यांनी आपले कार्य अविरत चालू ठेवले आणि अनेकांना या संकटातून वाचवले. त्यांचे सुरक्षित स्थलांतर करून अन्नपुरवठा करण्याचे अत्यंत मोठे काम वायुदलाने अतिशय समर्थपणे पार पाडले.
वायुसेनेची पदके :
- भारत सरकारकडून दिल्या जाणाऱ्या अनेक पदकांवरती वायुसेनेने आपली मोहोर लावलेली आहे. त्यांच्या अविस्मरणीय कामगिरीची ओळख करून देणारी अनेक पदके आज वायुसेनेच्या नावावर आहेत. मग ते वीरचक्र असो कि महावीरचक्र ते मिळवण्यात वायुसेना आघाडीवर आहे. आकाशाचा निळा रंग परिधान करून भारत मातेच्या रक्षणासाठी आणि सेवेसाठी हे वीर नेहमी तत्पर असतात. लढाऊ विमानात बसून जेव्हा अवकाशाला गवसणी घालतात तेव्हा क्वचित राष्ट्रसेवा सोडून दुसरा विचार त्यांच्या मनात येत असेल. जमिनीच्या हजारो किलोमीटर वरती सुद्धा आपल्या हवाई सीमेचे रक्षण करताना त्याच्या चेहऱ्यावर असणारे तेज हे कोणत्याही मेडल पेक्षा कमी नसेल.
वायुसेनेचे वीर जवान :
- भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान याना ओळखत नाही असे भारतात आज कुणी नाही.
- लहान मुलांपासून ते जेष्ठांपर्यंत सर्वाना त्यांचा अभिमान आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये पाकिस्तानी विमानाची घुसखोरी रोखण्यासाठी विंग कमांडर अभिनंदन यांनी मिग २१ या लढाऊ विमानातून उड्डाण केले. पाठलाग करत असताना ते पाकिस्तानी हद्दीत शिरले आणि डॉगफाईट मध्ये त्यांची क्षेपणास्त्रासोबत धडक झाली आणि नियंत्रण रेषेपासून सुमारे ७ किलोमीटर अंतरावर त्यांचे विमान कोसळले.
- परंतु विमान कोसळण्यापूर्वी त्यांनी मिग २१ च्या मदतीने लोकहिड मार्टिन एफ – १ हाणून पाडले होते. त्यांचे विमान कोसळल्यानंतर पाकिस्तानी सैन्यांनी त्यांना ६० तास बंदी करून ठेवले होते. त्यांची अत्यंत कडक चौकशी करण्यात अली होती आणि नंतर भारताकडे सुपूर्त केले होते. अशा या वीराला २०१९ मध्ये वीरचक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते.
भारतीय वायुदल प्रशिक्षण :
- सैन्याचा एक भाग होण्यासाठी आणि एक जवान बनण्यासाठी सर्वात महत्वाचे असते ते म्हणजे प्रशिक्षण. योग्य प्रशिक्षण एका सामान्य माणसाला असामान्य शक्ती असलेला जवान बनवते. भारतीय वायुदलात रुजू होण्यासाठी देखील अत्यंत कठीण आणि मुश्किल प्रशिक्षणाला सामोरे जावे लागते. भारतीय वायुदलात फक्त पायलट नसतात तर हवाई ट्रॅफिक नियंत्रण ऑफिसर, ग्राउंड ड्युटी स्टाफ असे अजूनही अधिकारी असतात.
- त्या सर्वानाच वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण घ्यावे लागत असते. त्यांना मानसिक दृष्ट्या अतिशय सक्षम आणि शारीरिक दृष्ट्या बळकट बनवले जाते. कोणत्याही कठीण प्रसंगी कसे निर्णय घ्यावे याचे हि प्रशिक्षण दिले जाते.
वायुदलातही स्त्रिया अग्रेसर :
- भारतीय वायुदल स्त्रियांनाही पुरुषांच्या बरोबरीने देशसेवेचे अधिकार देते. आज भारतीय वायू दलातील महिलांची संख्या इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त आहे. भारतीय हवाईदल महिलांना लढाई आणि समर्थन अशा सर्व क्षेत्रांमध्ये समाविष्ट करते. १९९४ पासून भारतीय वायुदलात महिलांची सहाय्यक पायलट म्हणून भरती करण्यास सुरवात झाली.
- फ्लाइट ऑफिसर गुंजन सक्सेना या कारगिल युद्धात युद्ध क्षेत्रा मध्ये उड्डाण करणाऱ्या प्रथम भारतीय महिला ठरल्या.
- महिलांना देखील पुरुषांसारखेच कठीण प्रशिक्षण दिले जाते. त्याना देखील सैन्यात रुजू होण्यासाठी सर्व परीक्षा आणि प्रशिक्षणाला तोंड द्यावे लागते.
वायुसेनेवरील सिनेमा :
- सामान्य नागरिकांना भारतीय सेनेबद्दल नेहमीच आपुलकी आणि तेवढेच आकर्षण वाटते. भारतीय वायुसेनेतील पायलट हा तर सर्वांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो भारतीय वायुदल पायलटचे आयुष्य उलगडणारे अनेक चित्रपट आतापर्यंत आलेले आहेत आणि आपण बघितलेले देखील आहेत. वारंवार ते चित्रपट बघून आपण नेहमीच त्यांचा हेवा करत असतो. विजेता, हिंदुस्थान कि कसम, रंग दे बसंती, मौसम असे अनेक चित्रपट आजपर्यंत झालेले आहेत. बॉर्डर या प्रसिद्ध चित्रपटात वायूदलाची कामगिरी अतिशय व्यवस्थितपणे मांडलेली आहे.