Agra Fort Information in Marathi
आग्रा किल्ल्याची माहिती :
- आग्र्याचा किल्ला हि एक अशी ऐतिहासिक वास्तू आहे की तिने भारताच्या इतिहासात काय काय घडले ते सर्व मूकपणे पाहिले आहे, सोसले आहे.
- १५ व्या शतकापासून अनेक आक्रमणे आणि राजवटींना तोंड देत ऊन, वारा, पाऊस, पडझड सोसत ताठपणे यमुनेच्या काठावर उभा आहे. काय काय नाही पहिले त्याने? अकबराचा सुवर्ण काळ पाहिला, जहांगीरचा न्याय पहिला, औरंगजेबाचा स्वत:च्या पित्यावरचा अत्याचार पाहिला, कैदेत बसून राणीच्या ताजमहालाकडे पहात पहात प्राण सोडणारा शहाजहान पाहिला.
- सह्याद्रीच्या सिंहाला दगाबाजीने बोलावून अपमान केल्यावर गरजणाऱ्या, बादशहाची तमा न बाळगता भर दरबारातून ताडताड जाणारा सिंह शिवाजी राजा पाहिला आणि काही वर्षानंतर त्याच मराठ्यांनी त्याच्यावर राज्य केलेले पाहिले आणि शेवटी आपली ब्रिटिशांची गुलामगिरी पाहिली.
- म्हणूनच ह्या किल्ल्याला १९८३ चे युनेस्को (UNESCO) चे जागतिक ऐतिहासिक वारशाचा किताब मिळाला आहे (World Heritage site)
किल्ल्याचा इतिहास :
- १५ व्या शतकापूर्वी हा किल्ला बादलगड नावाने प्रसिद्ध होता. १४८७ ते १५१७ ह्यावर लोधी घराण्याचे राज्य होते. सिकंदर लोधी ने राजधानी दिल्लीहून आग्र्याला आणली होती.
- १५२६ ला पहिली पानिपतची लढाई झाली, त्यात इब्राहीम लोधीचा मुघल बादशाह बाबरने पराभव केला आणि आग्रा किल्ला जिंकला.
- त्यानेच प्रथम तिथे बावडी म्हणजे पायऱ्यांची पाण्याची विहीर बांधली. बाबरच्या मुलाचा म्हणजेच हुमायूनचा शेर शाह सुरीने पराभव केला आणि तेथून सुरी घराण्याचे राज्य सुरु झाले.
- १५५५ नंतर हेमूचा हुमायून ने परत पराभव केला आणि बाबरच्या वंशाचा म्हणजे मुघल साम्राज्याचा उदय भारतात झाला आणि उत्तर भारत सर्व मुघलांच्या अधिपात्याखाली आला.
- तेंव्हा भारतावर कायम अफगाणिस्तान व उत्तर पश्चिमीय देशांकडून आक्रमणे होत होती. आणि आग्र्याच्या किल्ल्यातून मुघल राजे उत्तर भारत म्हणजे त्यांच्या दृष्टीने सर्व भारतावर राज्य करीत होते.
- अकबराच्या राजवटीत ह्या किल्ल्याने सुवर्ण काळ पहिला. अकबराने संपूर्ण किल्ल्याचे नुतनीकरण केले. त्यासाठी राजस्थानातील धौलपूर येथू लाल विटा आणल्या. सॅन्डस्टोन (sandstone) आणि जवळ जवळ ५०० घरे किल्ल्याच्य आत बांधली.
- अकबराच्या काळात राज्याचा पण खूप विस्तार झाला. उत्तरेकडे बलुचिस्तान पर्यंत तर दक्षिणेकडे राजस्थान, गुजरात आणि बंगाल पर्यंत मुघल साम्राज्य पसरले.
- अकबराने हिंदू आणि मुस्लीम दोघांना न्याय दिला. त्यामुळे त्याच्या दिन-ए-इलाही धर्माचे पण ह्या किल्ल्यात अवशेष सापडतात. अकबर नंतर जहांगीर ह्याने पण राज्य चांगले वाढवले. तो न्यायी राजा म्हणून प्रसिद्ध होता.
- ह्या किल्ल्यात त्याची ८ टन वजनाची संपूर्ण सोन्याची घंटा साखळीला बांधून बाहेर ठेवलेली होती. कुणालाही न्याय मिळाला नाही तर तो कुणीही, कुठल्यहि धर्माचा, पुरुष अथवा स्त्री ही घंटा वाजवून न्याय मिळवीत असे.
- जहांगीर नंतर शहाजहान ने ह्या किल्ल्याला आणखी सजवले. त्याला लाल दगडापेक्षा संगमरवर खूप आवडत असे. म्हणून त्याने आपला महाल पूर्ण संगमरवराचा केला. त्यासाठी त्याने बरीच घरे तोडली.
- तसेच आग्र्यातच आपल्या राणीसाठी ताजमहाल बांधला. त्यासाठी सुद्धा बऱ्याच घरांची मोडतोड झाली. पण तरीही ह्या दोन्हीही वास्तू त्याकाळच्या मुघल शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून प्रसिद्ध झाल्या.
- मुघल वास्तुकलेतील कमानी, भव्य बुरुज, नक्षीदार जाळ्या आणि छताला आरशांची नक्षी हे सर्व त्यावेळच्या वैभवाची साक्ष देतात.
- शहाजहान च्या चार मुलांपैकी औरंगजेब कुकर्मी निघाला. त्याने इतर मुलांना मारून आणि शहाजहानला त्याच्या महालात कैदेत टाकून तख्त बळकाविले.
- ह्याच किल्ल्यात बसून त्याने संपूर्ण हिदुस्थानात साम्राज्य पसरविण्याचा मनसुबा केला. त्याने दक्षिणेकडे नजर वळविली. पण शिवाजी महाराजांनी त्याला तेथेच रोखले. बरीच वर्षे महाराष्ट्राने त्याला रोखले. शेवटी प्रचंड मोठी फौज पाठवून त्याने शिवाजी महाराजांना तह करण्यास भाग पाडले.
- त्यासाठी त्याने मिर्झाराजे जयसिंग ह्या हिंदू सरदाराचा उपयोग करून घेतला आणि राजांना आग्र्याला बोलाविले. दिवान-इ-खास मध्ये त्याने मुद्दाम राजांना पंच हजारी मनसबदारांमध्ये उभे केले.
- राजांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी मिर्झाराजांना विचारले की “जे सरदार आम्हाला पाठ दाखवून पळून गेले त्यांना आमच्याबरोबर कसे उभे केले?” आणि ते भर दरबारातून निघून गेले.
- औरंगजेबाने त्यांना मिर्झाराजांच्या घरात नजरकैदेत ठेवले आणि कपटाने मारायची योजना आखली. पण शिवाजी महाराजांनी आजाराचे सोंग घेतले आणि ते पेटाऱ्यात बसून महाराष्ट्रात पळून गेले आणि परत युद्ध सुरु केले.
- औरंजेबाने जरी प्रयत्न केले तरी त्याला दक्षिणेकडे राज्य नाही वाढवता आले. त्याचे पुढचे पातशहा दुबळे निघाले. नंतर 13 वर्षे जाट लोकांनी येथे राज्य केले.
- त्यावेळी दक्षिणेत पराक्रमी पेशव्यांचा उदय झाला होता आणि १७८५ मध्ये त्यांचे सरदार महादजी शिंदे ह्यांनी आग्रा जिंकला. ते पाताशाहाचे सेनापती म्हणून काम करीत होते.
- त्याचवेळी अहमदशहा अब्दालीने भारतावर आक्रमण केले आणि तिसऱ्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला.
- नंतर महादजी शिंदेंनी परत आग्रा जिंकला आणि १७८५ ते १८०३ पर्यंत राज्य केले. पण ते ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीकडून हरले आणि मग ह्या किल्ल्यावर ब्रिटीशांचे राज्य सुरु झाले.
- ब्रिटिशांनी किल्ल्याची सर्व धन संपत्ती, मयूर सिंहासन, कोहिनूर इत्यादी सगळे हडप केले.
- १८५७ला शिपायांच्या बंडात सर्व भारतातील राजांनी लढाई करून शेवटचा पातशहा, बहादुरशाह जाफर ह्याला पातशहा केले. पण ब्रिटिशांनी बंदुकींच्या बळावर ते बंड मोडून काढले, आणि इस्ट इंडिया कंपनी ऐवजी हिंदुस्थानावर ब्रिटिश राणीचा अंमल सुरु झाला.
- शेवटचा पातशहा गझल लिहित ब्रहमदेशात तुरुंगात मरण पावला. अशी ही ह्या किल्ल्याची कहाणी.
रचना :
- हा भव्य किल्ला त्याच्या भव्यतेबरोबर अनेक चमत्कृतीनी भरलेला आहे. हा किल्ला 94 एकर जागेत पसरलेला आहे आणि ह्याचे बांधकाम अर्धवर्तुळाकार असून ते यमुना नदीला समांतर आहे.
- ह्याच्या तटाची उंची 70 फुट असून त्याला चार दरवाजे आहेत. त्यांपैकी दोन महत्वाचे दरवाजे आहेत, दिल्ली गेट आणि लाहोर गेट. लाहोर गेट ला अमरसिंग राठोड चे नाव दिले आहे.
- हा शहाजहानच्या दरबारात एक शूर राजपूत सरदार होता. तो मेवाड घराण्यातील असल्याने खूप शूर होता. त्याला नागपूरची जहागिरी देण्यात आली होती.
- दिल्ली गेट हा अकबराने बनवलेला मास्टर पीस आहे. ह्याला संगमरवरी बाहेरचा दरवाजा आणि आत दोन मोठे हत्तींचे पुतळे आहेत. ते सुरक्षिततेसाठी ठेवले आहेत. दरवाजाची रचना सहजा सहजी शत्रूला आत येऊ न देण्याकरिता केली आहे. सर्व जनता फक्त लाहोर गेट ने आत जाऊ शकते. दिल्ली गेट भारतीय सेनेकडे आहे.
- आतमध्ये जहांगीर हौज (हौद) आहे. तो सुद्धा वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. तसेच मीनाबाजार, शहाजहान महाल, दिवाण इ खास,दिवाण इ आम असे भव्य दरबार आहेत.
- भव्यता हा मुघल वास्तुकलेचा आत्मा आहे. दिवान इ आम मध्ये सिंहासनावर बसलेल्या राजाला दूरवर समोरच्या भागात उभ्या असलेला दरबारी कुजबुजत जरी असला तरी ऐकू येत होते अशी रचना केली आहे.
- शहाजहान महाल भव्य कमानी आणि संगमरवरी दालन, तसेच काचेच्या नक्षी ह्याने भरलेला आहे. येथील खांब पोकळ असून त्यात यमुनेचे पाणी खेळविण्यात येते. त्याने महाल थंड रहात असे.
- शीशमहाल म्हणून एक महाल पण ह्या किल्ल्यात आहे. ह्या महालात सर्व आरसे लावलेले आहेत. छताला आणि भितींवर ग्लास मोझाईक डिझाईन आहे. हि सर्व सिरीयातील हळेब येथून आणलेले उच्च प्रतीचे आरसे आहेत.
विशेष गुण :
- शहाजहानच्या महालातील छज्जातील एका झरोक्यातून ताजमहाल दिसतो. येथुनच ताजमहालाकडे बघत त्याने प्राण सोडले. अकबराने त्याच्या महालातून पूर्वेकडे एक झरोका ठेवला होता. तेथून तो सूर्योपासना करीत असे. जहांगीर पण करीत असे.
- ह्या किल्ल्यात आणखी विशेष म्हणजे किल्ल्याखालुन भुयारी रस्ते आहेत ते सर्व किल्ल्यामध्ये जोडले आहेत आणि ते यमुना नदीच्या किनाऱ्यावर उघडतात.
- ह्या किल्ल्याला २००४ मध्ये वास्तुकलेचे बक्षीस मिळाले. तसेच शेरलॉक होम्सच्या फिल्मचे, The sign of the four चे येथे शुटींग झाले आहे. जरी आता तिरंगा दिल्लीच्या लाल किल्ल्यात फडकत असला तरी खरे साम्राज्य आणि शक्तीचे चिन्ह (symbol of power) म्हणून ह्याच किल्ल्याकडे पहिले जाते.