Aajibaicha Batwa in Marathi Language
Ayurvedic Vanaspati Information in Marathi
आजीबाईचा बटवा हा एक जुन्या पद्धतीच्या घरगुती उपायांचा खजिना आहे. पूर्वीच्या काळात डॉक्टर नव्हते, त्यावेळी आजीबाईचा बटवा हाच उपाय सर्व-सामान्यांसाठी उपलब्ध होता. आता आपण घरगुती उपाय करण्यात वेळ घालवत नाही, सरळ डॉक्टरकडे जातो. बरेच लोक घरगुती उपायांवर विश्वास ठेवत नाहीत. घरगुती उपायाचा फरक पडण्यास वेळ जातो म्हणून आताच्या तेजीच्या युगात आपण केमिकल गोळ्यांचा वापर जास्त प्रमाणात करतो. कारण आपल्याला त्याचा फरक लगेच जाणवतो. पण ह्या केमिकलच्या गोळ्या जास्त प्रमाणात घेतल्या तर कधी कधी आपल्या शरीलाला अपायकारक ठरतात. त्यापेक्षा आपण आजीबाईच्या बटव्याचा म्हणजेच घरगुती उपायांचा वापर केला तर जास्त फायद्याचे ठरते. केमिकल गोळ्या खूप महाग असतात. त्या उलट घरगुती उपाय त्याच्या तुलनेत स्वस्त असतात कारण घरगुती उपाय करण्यासाठी लागणारे साहित्य आपल्याला घरातच उपलब्ध असते.
पूर्वीच्या काळी म्हाताऱ्या किंवा जाणकार लोकांकडे छोटीशी पिशवी असायची ज्यामध्ये वनौषधी ठेवलेल्या असायच्या. गावातील कोणालाही काही आजार झाला की लोक अशा व्यक्तींकडे जात. मग या व्यक्ती त्यांच्या छोट्याश्या बटव्यातून औषधे बाहेर काढत आणि आजारी व्यक्तीला देत असत. म्हणूनच त्या पिशवीला आजीबाईचा बटवा हे नाव प्राप्त झाले. काळानुसार आपण तब्येतीच्या छोट्या-मोठ्या तक्रारींसाठी डॉक्टरकडे जाणे सुरु केले आणि हा बटवा मागे पडू लागला. पण आपल्याला हे लक्षात घेतले पाहिजे की या घरगुती उपचारांचा दुष्परिणाम होत नाहीत आणि म्हणूनच हे उपाय लहान बाळांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांवर केले जाऊ शकतात.
आजीबाईच्या बटव्यातील काही उपाय खालील प्रमाणे :
१. तोंड आले असेल तर ओल्या खोबऱ्याच्या बारीक फोडी चावून-चावून खाव्यात. किंवा दोन तीन लाल तोंडली खावीत.
२. त्वचा भाजली असेल तर त्यावर थोडेसे तूप किंवा मीठ लावावे.
३. बाळाला जर सर्दी व कफ झाला असेल तर ज्येष्ठमध उगाळून द्यावा.
४. पित्त झाले असेल, आंबट ढेकर येत असतील किंवा अजीर्णामुळे छातीत जळजळ होत असेल तर एक ग्लास थंड दुध हळूहळू प्यावे.
५. आवाज बसला असेल किंवा घशाला त्रास होत असेल तर शेवग्याच्या शेंगात पाणी व मीठ टाकून उकळून त्याचे गरम पाणी प्यायल्यास आराम पडतो.
६. बाळाला खोकला झाला असेल तर त्याला मधाचे बोट चाखवावे किंवा थोडीशी खडीसाखर चघळायला द्यावी.
७. अपचनाचा त्रास होत असेल तर लिंबाचा रस किंवा ओवा खाल्ला तर त्रास कमी होऊ शकतो.
८. लहान बाळाला अपचन झाले असल्यास, गॅसमुळे पोट फुगले असल्यास ओवा चावून त्याचा चोथा बेंबीच्या सभोवती लावावा आणि ओवा चावून बाळाच्या तोंडात फुंकर मारावी. ओव्याच्या वासाने बाळाला बरे वाटते.
९. जुलाब होत असतील तर लिंबू, साखर व मीठ पाण्यात टाकून प्यावे. अशक्तपणा येत नाही.
१०. कावीळ झाल्यावर आठवडाभर उसाचा रस प्यावा किंवा उस चावून खाल्यास अधिक उत्तम असते.
११. लघवी करताना त्रास होत असेल तर धणे भरडून, पाण्यात उकळून घ्यावे. हे गाळलेले, थंड पाणी प्यायल्यास लघवी करताना जळजळ होण्याचा त्रास कमी होऊ शकतो.
१२. अजीर्ण झाल्यावर आल्याचे छोटे-छोटे तुकडे घेऊन त्यावर लिंबू पिळावे. त्यावर थोडे मीठ टाकून हळूहळू चघळत चावून खावे. त्याने आपल्या पोटाची पचन शक्ती वाढते व आपल्या पचन प्रक्रियेत फरक जाणवतो.
१३. दोन लवंग आणि पाव चमचा जिऱ्याची पावडर एक चमचा मधात एकत्र करून प्यायल्याने आपल्याला अजीर्ण पासून आराम मिळू शकतो.
१४. तसेच अजीर्ण वरचेवर होत असल्यास अर्धा कप गाजराच्या रसात थोडेसे सैंधव मीठ टाकून रोज सकाळी प्यावे.
१५. अजीर्ण झाल्यास तुळशीच्या पानांचा रस काढून पिल्याने देखील फार आराम मिळतो. किंवा गावरान गाईच्या दुधापासून बनवलेल्या ताकात जिऱ्याची व मिरीची फोडणी देऊन प्यावे.
१६. अजीर्ण होऊ नये म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेवण वेळेवर करावे व पोट पूर्ण भरेपर्यंत जेवू नये. नेहमी दोन घास कमी खाणे हे सर्वांसाठी उत्तम असते.
१७. अजीर्ण आणि आम्लपित्त यापासून सुटका पाहिजे असल्यास एक चमचा जिरे व एक चमचा ओवा भाजावे आणि भरडावे. ही पूड एक पेला पाण्यात उकळावी. पाणी आटून अर्धा पेला झाले की ते गाळून घ्यावे व साखर टाकून प्यावे.
१८. खोकला झाला असल्यास तुळसीच्या पानांचा रस, मधासोबत चाटून घ्यावा.
१९. लहान बाळांना सर्दी झाल्यास ओवा भाजून एका रुमालात बांधून, बाळाच्या छातीला आणि कपाळाला शेक द्यावा.
२०. दाढ दुखत असल्यास त्या दाढेखाली एखादी लवंग ठेवावी आणि दोन्ही वरच्या आणि खालच्या दातांमध्ये दाबून धरावी किंवा कापुराची वडी कापसात गुंडाळून दाढेखाली धरावी.
२१. ब्रश करून देखील तोंडाला दुर्गंधी येत असल्यास पुदिन्याची पाने, वेलची किंवा लवंग चघळावे.
२२. दात पिवळे असल्यास टूथपेस्ट मध्ये बेकिंग सोडा मिसळावा आणि ब्रश करावे. दात सफेद आणि चमकदार होतील.
२३. जुलाब होत असल्यास काळ्या चहात किंवा कॉफी मध्ये लिंबाचा रस मिसळून प्यावे, दुध घालू नये, साखर घातली तरी चालेल.
२४. घसा बसला असेल तर चहा मध्ये आल्याचा कीस टाकून, उकळून, चहा बनवावी. आल्याच्या चहाने घश्याला खूप आराम मिळतो.