Umbrella / Chatri chi Atmakatha in Marathi Language
छत्रीचे आत्मवृत्त / छत्रीची आत्मकथा
हाय, कसे आहात..? मी छत्री, तुमचे ऊन, पाऊस हयांपासून रक्षण करणारी तुमची सखी ! ओळखले ना ? कितीही काळ बदलला तरी माझे तुमचे नाते संपत नाही न? उलट संपन्नतेच्या बरोबर ते वाढतच जात आहे…बरोबर ना? मी वेगवेगळ्या स्वरुपात, वेगवेगळ्या आकारात, रंगात आणि डिझाइन मध्ये तुमची सेवा करीत आहे. राजापासून रंकापर्यंत आणि आजोबा पासून नातवापर्यंत, म्हातारीपासून रूपगर्विता तरुणी पर्यंत मी सगळ्यांच्या डोक्यावर छत्र धरीत आहे. पण माझा जन्म अगदी पुरातन काळाचा आहे, तेंव्हा माझे हे रूप नव्हते. कालानुरूप जसे संस्कृतीत स्थानात बदल झाले तसे माझ्यात पण बदल झाले. ऐका माझी कहाणी.
आदि मानवाला माझा शोध असा लागला की प्रकाश आणि ऊन सहन होईना म्हणून त्याने पाम (नारळी सारखे दिसणारे एक विशिष्ट झाड) चे मोठे पान डोक्यावर धरले. हे माझे पहिले रूप. नंतर इजिप्त मध्ये राजे, अमीर उमराव ह्यांच्या डोक्यावर जे छत्र धरले जाऊ लागले ते माझे खरे रूप! ४००० वर्षापूर्वी इजिप्तच्या राजांच्या रथावर पाम च्या पानांच्या आकाराचे मोठे छत्र असे. पण हे त्यांचे मोठेपण आणि वैभवाचे प्रतिक मानले जायचे!
चीन मध्ये माझा जोड साधून खरा आकार आला. तसेच माझ्यावर कलाकुसर पण चितारली गेली. माझे रूप अजून मनमोहक झाले. माझा पसारा कमी होऊन माझी घडी घालता येऊ लागली. तोपर्यंत मी फक्त उन्हापासून रक्षण करू शकत होते पण तेलकट साज चढवल्यामुळे मी पावसापासून पण रक्षण करू शकले हे श्रेय जाते चिनी कारागीरांना -वांग मांग आणि फु क़िअन ह्यांना.
हळू हळू माझा उपयोग पर्शिया, ग्रीस, रोम आणि प्राचीन भारतामध्ये होऊ लागला. गुप्तकालीन चित्रांमध्ये स्त्रीच्या हातात छत्री असल्याचे चित्र आहे न? बऱ्याच राजांना छत्र घेऊन बाजूला उभे असलेले भालदार चोपदार असायचे. भारतात मग राजांना छत्रपती असा किताब असायचा. बहुतेक राजे हे मला फक्त मोठ्या समारंभात घेऊन मिरवायचे. आणि मी फक्त राजांची अमानत असायची.
१७ व्या शतकात चीन मधून युरोप मध्ये माझा प्रवेश झाला. युरोपात मला पॅरासोल किंवा कॅनोपी म्हणायचे. पण माझा वापर फक्त बायका त्यांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी करायच्या. आणि बायकांसाठी मला सुंदर सुंदर रंग आकार असायचे. त्यांच्या नाजूक हातांसाठी माझे वजन पण कमी केले गेले. त्यातून मजेची गोष्ट म्हणजे मला भाडे देऊन पण उपलब्ध केले जाऊ लागले.जोनास हांवे जो “माग्दलेन” हॉस्पिटलचा प्रणेता होता त्याने खऱ्या अर्थाने सामान्य पुरुष पण छत्री वापरू शकतात ह्याची सुरुवात केली आणि ते व्रत ३० वर्षे पाळले. त्याची खूप थट्टा पण झाली पण त्यानंतर सर्व पुरुष पण ऊन पावसापासून रक्षण करण्यासाठी माझा वापर करू लागले.
१७८८ मध्ये बोजड डोलारा बाजूला सारून सुटसुटीत “पोकेट अम्ब्रेल्ला” म्हणजे खिशात मावेल एव्हडी छत्री असे रूप मला मिळाले. चिनी लोकांनी सिल्कच्या ऐवजी पेपरला मेण आणि लाकर वापरून “वॉटरप्रूफ” केले आणि माझी किंमत कमी झाली. आता सामान्य माणूस पण माझा उपयोग करू शकत होता. मला नीट आकारात राहण्यासाठी लाकडी काठ्या किंवा लोखंडी तारा जोडण्यात आल्या.
१८५२ मध्ये सामुअल फॉक्स ह्याने स्टील च्या काड्या जोडून मला सुंदर गोलाकार रूप दिले. मला नंतर एकदा मुडपण्याच्या च्या ऐवजी माझे दोन फोल्ड केले आणि मी “फोल्डिंग छत्री” म्हणून प्रसिद्ध झाले. अगदी भारतातील नोकरी करणाऱ्या बायकांची ह्यामुळे खूप सोय झाली. कुठेही मी त्यांच्या पर्स मध्ये आरामशीर मावू शकले.
आता मला बनविण्याची कारखान्यांमध्ये चढाओढ लागली. माझ्या डिझाइन साठी अमेरिकेन पेटंट चे एक मोठे कार्यालय व्यस्त झाले. तरीही मला बनवण्यात चीनच अग्रेसर आहे. सगळ्या जगात जास्तीत जास्त छत्रीचे कारखाने चीन मध्ये आहेत. शांघाई शहरात १००० पेक्षा जास्त कारखाने आहेत. तसेच अमेरिकेत पण दरवर्षी आमच्या ३३ मिलियन च्या संख्येने उत्पादन होते. माझ्यात तर्हेतर्हेचे आकार आहेत, अगदी लहान डोक्यावर बसणारी छोटीशी माझी मूर्ती लहान मुलीना खूप आवडते. तर प्रचंड मोठी मूर्ती एखाद्या सार्वजनिक ठिकाणी प्रकाश देते, समुद्र तटावर ऊन खात पहुडलेल्या पर्यटकांना थंडावा देते तर तीच मूर्ती फळवाले किंवा पाणीपुरीवाल्याचे दुकान सजवते. कधी फोटो स्टुडीओत प्रकाश परावर्तीत करून काळ्या माणसाचा गोरा फोटो काढते, तर कधी नवरा नवरीच्या डोक्यावर छत्र करून त्यांना औट घटकेचे राजा राणी बनवते. कधी जपानी सुंदरीच्या हाताची शोभा वाढवते तर कधी पोटासाठी कामावर जाणाऱ्या महिलेचे पावसापासून रक्षण करते. मला अभिमान आहे की माझी खापर पणजी आपल्या पूज्य राजे शिवाजी महाराजांच्या डोक्यावर राज्याभिषेकाच्या वेळेला विराजमान होती.
मी इतक्या लोकांच्या हातात शोभले आहे की त्यांचे व्यक्तिमत्व माझ्या शिवाय अपुरे आहे. उदा.ख्रिश्चन पोप ह्यांच्या पद ग्रहणाच्या वेळेला माझे विशेष महत्व असते. मला आदराचे स्थान म्हणून चर्च मध्ये सुद्धा वापरले जाते. ७व्या शतकातल्या प्रसिद्ध चिनी पर्यटक ‘ह्यु एन त्संग’ चे पण माझ्याबरोबर चित्र आहे जेंव्हा त्याने भारताला भेट दिली होती. बुद्ध भिक्कू आणि त्यांचे महंत पण माझा उपयोग करतात.
राज कपूर ने त्याच्या १९५५च्या “श्री ४२०” या चित्रपटात मध्ये माझ्यावर एक सुंदर गाणे चित्रित केले ते आज पण लोकप्रिय आहे. सुप्रसिद्ध चार्ली चाप्लीन ने तर त्याच्या ट्रॅम्पच्या लोकप्रिय वेषात मला स्थान दिले आहे. आणि मला गरगर फिरवत फेंगड्या पायाने चालणारी त्याची मूर्ती अजरामर झाली आहे.
माझे ऊन पावसापासून रक्षण करण्या व्यतिरिक्त अजून ही बरेच फायदे आहेत जसे वर सांगितले, मान सन्मानासाठी, लग्न समारंभासाठी, शोभेसाठी आणि हो, एक मोठ्ठा फायदा म्हणजे शोभा होऊ नये यासाठी सुद्धा. म्हणजे जर तुमच्या मागे सावकार, किंवा कोणाकडून तुम्ही कर्ज घेतले असेल आणि तो समोरून येत असला तसेच एखादा किंवा एखादी तुम्हाला मारायला येत असेल तर तोंड लपवायला माझा चांगला उपयोग करतात तसेच एकट्या मुलीला कोणी छळत असेल तर ती माझा दणका देऊन आपले गुंडांपासून पण रक्षण करते.
आता सांगा बरे माझ्याशिवाय कोण तुमची एव्हडी काळजी घेईल ?? म्हणूनच माझी नीट काळजी घ्या आणि मला बस किंवा रिक्षामध्ये विसरू नका!
Click Here for the Full List of Essays on Marathi.TV
Very nice and brilliant
It is a very good website