Sainikache Atmavrutta in Marathi
सैनिकाचे आत्मवृत्त
आज २६ जानेवारी – आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन! मी घरात आपली परेड पाहत आहे आणि माझ्या नजरेसमोर २५-३० वर्षापूर्वीची परेड तरळली. मी आमच्या शाळे तर्फे प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध सहभागी झालो होतो. माझ्या तुकडीचे मी नेतृत्व करीत होतो आणि माझे आईबाबा अभिमानाने बघत होते. त्या वेळेपासूनच सैन्यात जायचे नक्की केले आणि ते प्रत्यक्षात पण आणले. आज मी यशस्वीपणे माझी कारकीर्द संपवून शांत जीवन जगत आहे. पण हा प्रवास कसा होता हे आठवले की अंगावर रोमांच उभे राहतात.
आमच्या घरात आधीपासूनच राष्ट्रभक्तीचे वातावरण होते. माझे आजोबा आणि आजीपण फ्रीडम फायटर होते. स्वातंत्र्यासाठी त्यांनी कारावास पण भोगला होता. बाबा पोलीस खात्यात आणि आई अणुशास्त्रज्ञ. त्यामुळे मी सैन्यात जाण्याचा मनोदय जाहीर केल्यावर कोणालाच आश्चर्य वाटले नाही. मग मला सैनिकी स्कूल मध्ये टाकण्यात आले. घरापासून दूर एव्हड्या मुलांमध्ये मी प्रथम घाबरलो होतो पण तिथली शिस्त आणि एकमेकांबरोबर खेळीमेळीचे वातावरण बघून मी खुश झालो. लहानपणापासूनच आमच्या घरी खूप लोक यायचे म्हणून मी बाबा आणि आई मित्रांशी कसे वागतात हे बघतच मोठा झाल्याने मला मित्र जमवायला त्रास पडला नाही. लवकरच आमची घट्ट मैत्री झाली ती आजतागायत.
सैनिकी स्कूल मध्ये आम्हाला परेड, रोप क्लायंबिंग, पोहणे, गिर्यारोहण, हॉर्स रायडींग, शुटींग हे सर्व प्राथमिक सैनिकी शिक्षण दिले. तेथेच माझी एन.सी.सी मधून दिल्लीच्या परेड मध्ये निवड झाली. बारावी पर्यंत शिक्षण झाल्यावर मी एन.डी.ए. म्हणजे ‘नॅशनल डिफेन्स अकादमी’ ची परीक्षा दिली. हि परीक्षा अत्यंत अवघड असते. त्यामुळे मी अगदी थोड्या मार्कांनी ती गमावली. पण हरणे हा सैनिकाचा धर्मच नाही म्हणून मी बीए पदवी पदवी नंतर ‘कंबाइंड डिफेन्स सर्विसेस [CDS]’ ची परीक्षा दिली. ह्यावेळी मी प्रचंड तयारीने स्पर्धेत उतरलो आणि घवघवीत यश मिळवून मी कमिशन्ड ऑफिसर झालो!
जगात आपले सैन्य अव्वल का मानले जाते हे त्या प्रशिक्षणातून जातांना मला कळले. अगदी कठोर परिश्रम आणि मेंदूस चालना देणारे प्रश्न आणि आपत्ती व्यवस्थापन मी तेथे शिकलो. हे सर्व करतांना डोके शांत आणि विचार स्थिर ठेवायला आम्हाला शिकविले. कारण आमच्या तुकडी मध्ये कांही भडक डोक्याची पण मुले होती. किंबहुना कांही लोकांना वाटते की सैन्यात जायचे म्हणजे शुरतेबरोबर आक्रमक स्वभाव हवा. हे चूक आहे. कठीण परिस्थिती हाताळतांना कमीत कमी जीवित हानी आणि सुरक्षेचे ध्यान ठेवावे लागते. विशेषत: दहशतवाद्यांनी जर माणसे /मुले ओलीस ठेवली तर सर्वांना धक्का न लागता दहशतवाद्यांचा खात्मा करतांना कमालीची सावधीगीरी, जलद आणि अचूक निर्णय आणि ‘टायमिंग’ साधावे लागते. हे सर्व शिकून मानाने मी सैन्यात रुजू झालो.
माझे पहिलेच पोस्टिंग भारत पाक सीमेवर झाले. मी व माझी पलटण काश्मीरच्या बर्फाने वेढलेला स्वर्गात आमची कर्तव्य बजाऊ लागलो. आम्ही सर्वच घरदार सोडून दूर आलो होतो पण सैनिकाचे पलटण हेच घर आणि बरोबरचे जवान हेच नातेवाईक हे डोक्यात पक्के मुरले होते. त्यामुळे आमच्यात खेळीमेळीचे वातावरण होते. युद्ध वातावरण नसताना आम्ही समोरच्या सीमेवरील समोरच्या देशाच्या जवानांशी पण बोलायचो. कारण तेही सैनिकच.
पण १९९९ मध्ये एक दिवस चित्र बिघडले. समोर गडबड सुरु झाली आणि अचानक त्यांनी गोळीबार सुरु केला. आम्ही तयार होतोच. फायरिंग सुरु झाल्यावर आम्ही आमच्या जागा घेतल्या आणि चोख प्रत्युतर द्यायला सुरुवात केली. आमचे जवान अतांत शूर होते त्यामुळे त्यांचे खूप सैनिक पडायला लागले. आणि शेवटी त्यांनी सीज फायर केला. असे वारंवार घडायचे. आता आम्हाला सवय झाली होती. आम्हाला २४ तास ड्युटी असायची. सर्वजण सतर्क राहून देशाचे संरक्षण करीत होतो. कधी कधी आमचे जवान शहीद व्हायचे मग खूप वाईट वाटायचे. त्यांच्या घरी कळवायला जातांना हृदयावर मणामणाचे ओझे यायचे. त्यांच्या आक्रोश हृदय पिळवटून टाकायचा. पण ‘‘केसरिया बाणा पहन लिया, अब फिर प्राणोंका मोल कहा ? जब बने देस के संन्यासी, नारी बच्चोंका छोह कहा’’ अशा विचारांनी देशाच्या रक्षणाचे कर्तव्य बजावत होतो. देशसेवेपुढे काहीच नाही हे मनाला बाजवून पुन्हा आपल्या कर्तव्याकडे वळायचो!
आम्ही सैनिक उणे 20 ते 35 डिग्री सेल्सियस मध्ये सियाचिनला जागृत राहून देशाच्या सीमेवर पहारा देतो, ४५ डिग्री सेल्सियस ला राजस्थानच्या वाळवंटात अन्न पाण्यावाचून मैल-मैल धावून अतिरेकी आणि छुपे पाकिस्तानी पकडतो. देशाची सीमा आम्ही आमच्या छातीचा कोट करून राखतो. उन, पाऊस, नदी पहाड कशाचीच आम्ही तमा बाळगत नाही. कायम जीव टांगणीला ठेऊन दगडावर पण झोपतो. हातात अन्न घेऊन खाता खाता बंकरमध्ये लपतो. देशात कुठेही काही निसर्गाची अवकृपा झाली, पूर, भूकंप, आग ह्यांचे तांडव झाले की आपत्ती निवारण करायला आम्ही तत्पर असतो. म्हणूनच आम्ही म्हणतो की, ‘‘हिम्मत वतन की हमसे है, ताकत वतनकी हमसे है, इज्जत वतन की हमसे है, संसार के हम रखवाले.’’
१९९९ कारगिल लढाई जिंकल्यानंतर आमची खरी लढाई दहशतवाद्याबरोबर होती. ते स्थानिक लोकांमध्ये बेमालूम मिसळून जायचे आणि त्यांना धमकावून लपून बसायचे. ऑगस्ट २०११ मध्ये अशाच एका खबरीवरून आम्ही एका घराला वेढा दिला. आत सात दहशतवादी होते. घरातील लोक भीतीने थरथर कापत होते. मी छपरावरून आत जाण्याचा प्रयत्न करीत होतो आणि समोरून आमची पलटण त्यांचे लक्ष दुसरीकडे वेधत होते. मी हळूच आत उतरून फायरिंग सुरु केली आणि बाहेरून माझ्या सैनिकांनी पण फायरिंग सुरु केले. त्यामुळे दहशतवाद्यांचे भराभर मुडदे पडायला सुरुवात झाली. अचानक एकाच्या गोळीने माझा पाय जायबंदी झाला. मी पटकन लोळण घेतली आणि पुढच्या गोळ्या चुकविल्या आणि त्याला लोळण घेता-घेता गोळ्या मारून उडवले. सगळे दहशतवादी मेल्यावर आमचे सैनिक आतमध्ये धावत माझ्याकडे येतांना दिसले आणि माझी शुद्ध हरपली.
मला मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि माझे ऑपरेशन करून अर्धा पाय कापावा लागला. पण त्या वर्षी मला वीरचक्र मिळाले आणि २६ जानेवारीला दिल्लीच्या परेड मैदानात माझा सन्मान करण्यात आला. सैन्यातून निवृत्ती घेऊन मी एका शासकीय कार्यालयात काम सुरु केले. सैन्यातील शिस्त अंगी बाणल्यामुळे मला कामाचा फडशा पाडायची सवय होती. त्यामुळे तेथेही मी नाव लौकिक मिळवला.
आता मी माझे जीवन आपल्या पत्नी व मुलीसोबत समाधानाने व्यतीत करीत आहे. आपल्या दैनंदिन कामाबरोबरच सैन्यात जाऊ इच्छिणाऱ्या मुलांना मार्गदर्शन करीत आहे. त्यांच्या डोळ्यात देशाचे प्रेम, काहीतरी करायची उर्मी बघून धन्य वाटते. असे वाटते की जोपर्यंत माझ्या देशातील मुलांमध्ये हि उर्मी आहे तोपर्यंत माझ्या देशाकडे वाकडी नजर करून बघायची कुठल्याही राष्ट्राची हिम्मत होणार नाही.
Click Here for the Full List of Essays on Marathi.TV