Retirement Speech in Marathi
Nivruti Samarambh Information in Marathi : निरोप समारंभ शिक्षक
माननीय मुख्याध्यापक/मुख्याध्यापिका, माझ्या शिक्षक वर्गातील मित्र मैत्रिणी आणि माझे विद्यार्थी,
आज ३३ वर्ष सेवा केल्यानंतर माझा आपल्या शाळेतला शेवटचा दिवस. हो, मी “आपल्या” म्हंटले कारण ‘आर. के. जोशी विद्यालय’ ही शाळा पहिल्यापासूनच आपलीच वाटत होती. माझे ह्या शाळेशी ऋणानुबंध जन्मोजन्मीचे असावे म्हणूनच शिक्षिका होण्याचा विचारही नसताना मी ह्या शाळेत शिक्षिका म्हणून लागले आणि कायमची इथलीच झाले.
ही शाळा सर्वाना मायेने आपल्या पोटात समावून घेते. म्हणूनच इथे सगळे एकमेकांचे नातेवाईक असल्यासारखे वागतो. अगदी पहिल्या दिवसांपासूनच मी इथे रुळून गेले. फक्त वर्गात जातांना धाकधूक होत होती की मी 60 विद्यार्थ्यांसमोर कशी उभी राहणार आणि शिकवणार. त्यावेळी आपल्या पर्यवेक्षिका देशपांडे बाईनी मला जवळ बोलावले आणि सांगितले, “अग, अजिबात घाबरायचे नाही. ती मुले तुझ्या धाकट्या भावाबहिणींच्या वयाची आहेत. असे समज की तुझ्या भाऊ बहिणींनाच शिकवीत आहे.” हे शब्द ऐकले आणि माझी भीती कुठल्या कुठे पळून गेली!
सुरुवाती पासूनच मला शिकवायला आवडत होतेच पण त्यातून ही हुशार विद्यार्थी असले की मला पण हुरूप येतो. त्यामुळे मला ह्या शाळेत खूप हुशार विद्यार्थ्यांना शिकविण्याचा लाभ मिळाला. ‘आर. के. जोशी विद्यालय नामांकित शाळा असल्याने शहरातील हुशार विद्यार्थी येथे प्रवेश घेतात. आणि येथे त्यांना मिळणाऱ्या शिक्षणाने ते आणखी हुशार आणि प्रगल्भ होतात. मला आठवते की मुले इतक्या बारीक बारीक शंका विचारीत की खरच त्यांनी खोलवर जाऊन विषयाचा अभ्यास केला आहे असे वाटे. काही मुले तर अती बुद्धिमान असत. त्यांच्या शंका निरसन करताना माझे ज्ञान आणखी तलवार परजावी तसे उजळून निघत असे. त्यातूनच ह्या मुलांनी ऑलीम्पियाड, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, आणि राष्ट्रीय प्रज्ञा बोध, तसेच स्कॉलरशिप सारख्या परीक्षांना घवघवीत यश मिळविले. शाळेचे नाव उज्ज्वल केले. मला माझ्या कामाची खरी पावती त्यामुळे मिळाली.
अजूनही त्यातले उच्च शिक्षण घेतलेले, अमेरिकेला गेलेले, नासा मध्ये काम करून भारताचे नाव उज्ज्वल केलेले विद्यार्थी/विद्यार्थिनी भेटून जातात तेंव्हा कृतकृत्य झाल्यासारखे वाटते. आमच्या हाताखालून गेलेल्यांपैकी बहुतेक मुले उत्तम करिअर करीत आहेत. भलेही ते नोकरी असो, व्यवसाय असो, संशोधन असो की राजकारण, आणि समाजसेवा.
असे म्हणतात की आई-वडीलांनंतर, मुलांना घडविणे शाळेच्या हातात असते. मूल हा मातीचा गोळा, त्याला जसा आकार देऊ तसा तो घडतो. ह्याबाबतीत आमच्या शाळेने विशेषत: मुख्याध्यापकांनी/ मुख्याध्यापिका बाईनी एक अतिशय शिस्तबद्ध कार्यक्रम राबविला आहे. दर वर्षी शाळेच्या मुलांचे केंद्र सरकारसारखे मंत्रिमंडळ तयार होत असत जे पूर्ण शाळेतून निवडून येणाऱ्या मुलाचे/मुलींचे असते. त्यांना ठराविक वर्गांची जबाबदारी देऊन, वर्षाचे कार्यक्रम करून घेणे, रोज शिवचरित्राच्या आणि साने गुरुजींच्या ‘भारतीय संस्कृती’ मधून परिच्छेदांचे वाचन करवून घेणे, ज्यांचा वाढदिवस असेल त्यांना फुल देऊन सत्कार करणे, 15 ऑगस्त, आणि 26 जानेवारीला झेंडावंदन करणे इत्यादी संस्कार करीत होतो. अर्थात ह्यात अडचणीपण येत होत्या. पण शाळा आणि शिक्षकवृंद माझ्या मागे खंबीर उभे असत, त्यामुळे हेय काम आम्ही आत्मविश्वासाने वर्षोनुवर्षे करत होतो.
मला आठवतो आहे तो प्रसंग, जेंव्हा एका माणसाने खोडसाळपणे आमच्यावर आळ आणला होता की मी आणि आणखी दोन सहकारी मुलांना मारतो. त्यावेळी सगळे शिक्षक आणि सर्व मुलेपण आमच्या बाजूने उभी राहिली आणि त्याला खोटे पाडले. तसेच एकदा मला शाळेत येतांना अपघात झाला होता, तेंव्हा मला शुद्ध नव्हती पण माझ्याच मागून येणाऱ्या माझ्या शाळेतल्या मुलांनी रुग्णवाहिका बोलावून मला हॉस्पिटल मध्ये दाखल केले आणि दोन दिवस आळीपाळीने माझ्या जवळ थांबले. ही आपुलकी आणि माणुसकी हे आर. के. जोशी विद्यालयाचेच संस्कार आहेत. माझ्या विद्यार्थ्यांनी माझ्यावर अलोट प्रेम केले. त्यांना निरागसतेपासून तारुण्यापर्यंत वाढतांना मी पहिले आहे आणि त्यात माझ्या पोटच्या मुलांनाच मी वाढविते आहे असे वाटले. किती निर्व्याज प्रेम होते त्यांचे! आठवले की मन भरून येते.
मी 8 वीच्या वर्गातील मुलांमुलींना मी प्राणीशास्त्र शिकवीत होते. त्यांना सांगितले की असे फक्त पुस्तकातून पाहून घोकंपट्टी करू नका. आजूबाजूला पहा. हे प्राणी दिसतील त्यांचे निरीक्षण करा. दुसऱ्या दिवशी प्रत्येक जण एक एक प्राणी घेऊन हजर. कोणी सरडा, कोणी उंदीर, मांजर, कुत्रा, साप, पोपट, झुरळ, पाल, विंचू, मासा, बेडूक आणि काय काय. अर्थात हे सगळे मेलेले होते फक्त कुत्रा आणि मांजर जिवंत होते. आणि मग त्यांचे disection “डिसेक्शन” झाले. हजार शंका विचारून झाल्या. मुले अगदी खुश. तास संपला तरी अभ्यास चालूच होता. नंतरचे शिक्षक मग बाहेरूनच परत गेले आणि सगळे अगदी मुख्याध्यापकांसाहित कौतुकाने बघायला आले. खरच इतके शिकविण्याचे स्वातंत्र्य फक्त ह्याच शाळेत मिळेल.
अजून एक प्रसंग आठवतो मुलींच्या निरागस प्रेमाचा. मी शाळेत लागून एक दोनच महिने झाले होते. आणि मला अनाथ मुलींच्या वर्गाची वर्गशिक्षिका केले होते. त्यांच्याशी बोलून हसून खेळून मी पहिला दिवस घालविला. दुसरे दिवशी सगळ्या त्यांच्या आश्रमातून फुले गजरे घेऊन आल्या आणि सगळे मी ते घातलेच पाहिजे असा आग्रह करीत राहिल्या. त्यादिवशी मी मद्रासी सिनेमाची हिरोईन किंवा फ्लॉवर पॉट दिसत होते. पण प्रेमापुढे मी काहीच करू शकत नव्हते. तसेच चार एक वर्षांपूर्वी गाईडच्या सहलीत ग्रुप केलेले होते आणि त्यांना चहा, खिचडी बनवणे शिकवले होते. मला प्रत्येक ग्रुपचा चहा प्यावा लागला होता आणि चांगला झाला आहे असे सांगावे लागले. जवळपास मी मोठा लोटा भरून चहा प्यायले त्यादिवशी.
असे अनेक किस्से आता मला घरी आठवतील. माझ्या हाताखाली शिकलेली सगळी पाखरे आता उडून आपापली क्षितिजे शोधात आहे. मी त्यांना आणि सध्या शाळेत असलेल्या माझ्या मुलांना खूप आशीर्वाद देते आणि शाळेला खूप शुभेच्छा देते. असेच पिढ्यानपिढ्या समर्थ आणि सुजाण नागरिक तिने बनवावे हि सदिच्छा देते.
जयहिंद. जय महाराष्ट्र.
Click Here for the Full List of Essays on Marathi.TV