Ramabai Ambedkar Information in Marathi Language – Nibandh, Biography
Ramabai Ambedkar Biography in Marathi Essay : रमाबाई आंबेडकर माहिती
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल सर्व लोकांना बरीचशी माहिती आहे परंतु त्यांच्या पहिल्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांच्या विषयी फारच कमी लोक जाणतात. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या कठीण काळी साथ देणाऱ्या या महान स्त्री विषयी आपल्या सर्वांना जाणून घेतले पाहिजे. कारण खुद्द बाबासाहेबांनी हे कबूल केले आहे कि, रमाबाईंच्या त्यागामुळेच ते ‘भीमा’ चे ‘बाबसाहेब’ झाले.
रमाबाईंचा जन्म दाभोळ जवळच्या वंणदगावात महारपुरा वस्तीत झाला. त्यांच्या आई रुक्मिणी व वडील भिकू धुत्रे यांना चार मुली व एक मुलगा होता, त्यांच्या पैकी एक रमाबाई. अस्पृश्यता मानली जाण्याच्या त्या काळात दलित कुटुंबे खूप गरीब असत. रमाबाईंचे आई – वडीलही याला अपवाद नव्हते. रमाबाईंच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले होते आणि त्या दापोलीत राहायच्या. रमाबाई लहान असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचे वडील दाभोळच्या बंदरात माश्यांच्या टोपल्या उतरवून बाजारात नेण्याचे काम करीत. त्यांनाही छातीत दुखण्याचा त्रास होत असे व त्यांनतर काही दिवसातच त्यांचेही निधन झाले. या सर्वांचा रमाबाईंच्या कोवळ्या मनावर फार आघात झाला. त्यांची भावंडे गौरा आणि शंकर सुद्धा लहानच होते. वडिलांच्या मृत्यूनंतर अनाथ झालेली ही भावंडे वलंगकर काका आणि गोविंद पुरकर मामा यांच्या सोबत भायखळा येथे राहण्यास आली. ते भायखळ्याच्या मार्केट मधील एका चाळीत राहत. वयाच्या नवव्या वर्षी रमाबाईंचे लग्न बाबासाहेबांशी झाले, बाबासाहेब तेव्हा चौदा वर्षाचे होते आणि पाचवीत शिकत होते.
लग्नानंतर सुद्धा रमाबाईंना आतिशय अडचणींना तोंड द्यावे लागले. १९२३ साली बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले होते तेव्हा रमाबाईंनी दुष्काळात खूप कठीण दिवस काढले. त्यांच्या खाण्या-पिण्याचे फार हाल होत असत. बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मदत देऊ केली परंतु त्या स्वाभिमानी स्त्रीने ते पैसे घेतले नाहीत. १९१३ साली त्यांचे सासरे रामजी सुभेदार यांचा मृत्यू झाला. नंतर बाबासाहेब अमेरिकेला असताना रमेशचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ १९१७ मध्ये बाबासाहेबांची सावत्र आई जिजाबाईचा मृत्यू, नंतर त्यांची मुलगी इंदू, बाबासाहेबांचे मोठे बंधू आनंदराव व त्यांचा मुलगा गंगाधर यांचा मृत्यू, १९२१ मध्ये बाबासाहेबांचा मुलगा बाळ गंगाधर, आणि १९२६ मध्ये दुसरा मुलगा राजरत्न याचाही मृत्यू झाला. त्यांच्या इतक्या अपत्यांपैकी फक्त एकच अपत्य वाचले. एवढ्या प्रियजनांच्या मृत्यूचे घाव त्या माउलीने एकटीने सोसले पण बाबासाहेबांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून रमाबाईंनी त्यांना हे सर्व न कळविण्याचे ठरविले. स्वतः सर्व दुखः सहन केले पण बाबासाहेबांपर्यंत या सर्वांची झळ पोहचू दिली नाही. त्यांना त्यांच्या कार्यापासून परावृत्त होऊ दिले नाही.
बाबासाहेब परदेशी शिक्षण घेऊन मायदेशी परतले तेव्हा त्यांना भेटण्यासाठी सर्व आंबेडकर समाज मुंबईच्या बंदरात आला होता. त्या प्रसंगी नेसण्यासाठी रमाबाईंकडे धड साडीही नव्हती. छत्रपती शाहूमहाराजांनी आंबेडकरांना दिलेला भरजरी फेटा नेसून त्या पतीच्या स्वागतासाठी गेल्या पण दूरच उभ्या राहिल्या. त्यांच्या मते त्या आपल्या पतीस केव्हाही भेटू शकतील परंतु हजारो दलित समाजाची आशा असणाऱ्या आबेंडकरांवर पहिला हक्क त्यांच्या समाजाचा होता. बाबासाहेबांना भेटायला नेहमी कोणी ना कोणीतरी यायचेच म्हणून बाबासाहेबांच्या अभ्यासात व्यत्यय येऊ नये यासाठी त्या दरवाज्याबाहेर बसून रहात आणि जे कोणी येईल त्यांना त्यांचे नाव, गाव आणि काम एका वहीत लिहून ठेवायला सांगत.
लग्नानंतर बाबासाहेबांच्या आग्रहाखातर रमाबाई लिहिण्या – वाचण्यास शिकल्या. बाबासाहेबांच्या सोबतीने रमाबाई सुद्धा समाज जागृतीसाठी महिलांच्या सभा घेऊ लागल्या, भाषणे देऊ लागल्या. दलितांच्या चळवळीत महिलांच्या मोठ्या प्रमाणाचे कारण रमाबाईंची शिकवण हेच होते. एकदा बाबासाहेबांना परदेशी जायचे असल्यामुळे त्यांनी रमाबाईंना धारवाडला त्यांच्या वराळे नावाच्या मित्राकडे राहायला पाठविले. हे काका लहान मुलांचे वसतिगृह चालवत. हि मुले रोज अंगणात खेळत असत. एकेदिवशी दोन सलग दिवस मुले न आल्याने रमाबाईंनी वराळे काकांकडे चौकशी केली. त्यांना समजले कि मुले दोन दिवसापासून उपाशी होती म्हणून खेळत नव्हती. रमाबाईंनी मागचापुढचा विचार न करता आपल्या सोन्याच्या बांगड्या दिल्या आणि मुलांसाठी अन्नाची सोय करण्यास सांगितले. त्या दिवासापासुनच त्यांना रमाआई किंवा रमाई ही उपाधी मिळाली. बाबासाहेबांनी आपले पूर्ण आयुष्य दलितांच्या उद्धारासाठी खर्ची केले परंतु रमाबाईंनी मात्र संसार चालविता चालविता समाजोद्धार केला. बाबासाहेबांचे संसारात जास्त लक्ष नव्हते आणि त्यांची कमाई सुद्धा फारशी नव्हती, तरीही या माऊलीने हसतमुखाने संसार चालवला.
आयुष्यभर अपार कष्ट केल्यानंतर १९३५ साली रमाबाई अतिशय आजारी पडल्या. बाबासाहेबांची इच्छा असूनही ते रमाबाईंसाठी वेळ काढू शकत नव्हते. शेवटच्या काही दिवसात रमाबाईंना अन्नही जात नव्हते तेव्हा बाबासाहेबांच्या आग्रहाखातर त्या फक्त कॉफी किंवा फळांचा थोडासा रस पीत. २७ मे, १९३५ रोजी अखेर रमाबाईं सर्व दलितांना पोरके करून देवाघरी गेल्या. पत्नीच्या सोबतीने महान कार्य करणारे बाबासाहेब तेव्हा एकाकी पडले आणि याचे त्याना अतिशय दुःख झाले व ते अश्रू आवरू शकले नाहीत. म्हणूनच ‘थॉटस ऑन पाकिस्तान’ हा ग्रंथ त्यांनी रमाबाईंच्या स्मृतीस अर्पण केला.
Nice Story