Pustakachi Atmakatha in Marathi
Autobiography of a Book in Marathi : पुस्तकाचे आत्मवृत्त
राहुलच्या घराचे नुतनीकरण चालू होते. सगळे सामान उलटे पालटे झाले होते. राहुल त्यातून कुतुहुलाने एक एक गोष्ट बघत होता आणि प्रत्येक वस्तू बरोबरच्या जुन्या आठवणी त्याच्या मनात जाग्या होत होत्या. इतक्यात त्याला कण्हण्याचा आवाज ऐकू आला. त्याने दचकून पहिले तर कोणीच नव्हते. तो इकडे तिकडे पहात असतांना त्याला बोलणे ऐकू आले. “राहुल, अरे तुझ्या समोर बघ. मी बोलतोय. तुझे आवडते पुस्तक, ’कुण्या एकाची भ्रमणगाथा’” राहुल ने तिकडे पहिले तर अत्यंत जीर्ण अवस्थेतील एक पुस्तक पडले होते. त्याने ते हातात घेतले तर एक दोन पाने गळून पडली. त्याला वाईट वाटले. हे पुस्तक मिळविण्यासाठी काही वर्षांपूर्वी त्याने अख्खी मुंबई पालथी घातली होती. शेवटी हुतात्मा चौकात फुटपाथवर मिळाले होते.
“होय, तू मला फुटपाथवर विकत घेतले होते. पण त्या आधी मी एका साहित्यिकाच्या घरात सुंदर काचेच्या कपाटात विराजमान होतो. ऐक माझी जन्मकथा. लेखक गो.नी. दांडेकर माझे पिता. हि खरे तर त्यांची पण आत्मकथा आहे. त्यांनी जीवनात कुठे कुठे भ्रमण केले, त्यांना काय अनुभव आले, हे त्यांनी लिहिले होते. त्या अनुभवाने समृद्ध असे माझे रूप तयार झाले. मला त्यासाठी प्रिंटींग मशिनच्या हालातून जावे लागले. माझ्या पानांवर अक्षरे उमटतांना एकेका अक्षराबरोबर मला सुई टोचल्याच्या वेदना होत होत्या. सगळ्या अंगाला भोके पाडली रे! मग मला चित्रांनी सजविले. नंतर माझी पानांची बांधणी केली. तेंव्हाही पिना भोसकल्या. पण आता मी सुटसुटीत दिसायला लागलो. मला आकर्षक कपड्यांमध्ये गुंडाळले होते. गो.नी.दांडेकर निसर्गप्रेमी होते आणि त्यांचे गड किल्ल्यांवर विशेष प्रेम होते. त्यामुळे अधून मधून सुंदर निसर्गचित्रे पण लावली होती. माझे रुप खूपच छान दिसत होते.
एका मोठ्या समारंभात माझे प्रकाशन झाले आणि लोकांच्या दुकानात उड्या पडायला लागल्या मला घेण्यासाठी. पाहता पाहता माझ्या सर्व आवृत्त्या खपल्या आणि मला परत छपाईच्या दिव्यातून जावे लागले. माझी पहिली आवृत्ती लेखकाने सही करून एका थोर साहित्यिकाला दिली. मी त्यांच्या दिवाणखान्यात एका सुंदर शो केस मध्ये विराजमान झालो. ते साहित्यिक आल्या गेल्यांना मला दाखवायचे. मग ते पण माझ्या आवृत्त्या विकत घ्यायचे. एकदा त्यांच्या एका नातलगाने वाचण्यासाठी मला देण्याची विनंती केली. साहित्यिक सरळ मनाचे होते. त्यांनी मला त्यांच्या हाती सुपूर्द केले आणि तिथूनच माझ्या दुर्दशेची सुरुवात झाली.
ती व्यक्ती अतिशय गबाळी होती. कोचावर लोळून मला वाचायचे. आणि तिथेच मला फेकून द्यायचे. त्यांच्या घरातील पण सर्व तसेच होते. वर्तमानपत्र देखील वाटेल तसे पडलेले असायचे. इकडे तिकडे फेकल्यामुळे माझी अवस्था खिळखिळी झाली. दरम्यान त्या साहित्यीकांचे निधन झाले आणि हा माणूस मला परत करण्याचे विसरून गेला. त्याने एक दिवस मला रद्दीत विकून टाकले.
आश्चर्याने तो रद्दीवाला मात्र साहित्यप्रेमी होता. त्याने मला वाचले आणि तो खूप खुश झाला. त्याने लेखकाला शोधले पण गो.नी.दांचे तो पर्यंत निधन झाले होते. मग त्याने मला परत नवीन कपडे चढवले. माझी डागडुजी केली आणि आपल्या ‘शोकेस’ मध्ये ठेवले. लोकांना त्याचे साहित्यप्रेम बघून कौतुक वाटायचे. मात्र त्याने एक गोष्ट केली. कुणीही मागितले तरी मला विकले नाही. मात्र त्याच्याकडील बऱ्याच तरुण मुलांना मला वाचल्यानंतर गड किल्ले फिरायची प्रेरणा मिळाली. त्यांचे गिरीभ्रमण मंडळ तयार झाले. अनेकांना आपल्या गड किल्ल्यांची माहिती मिळाली आणि आपला वैभवशाली इतिहास पुन: पुनरुज्जीवित झाला. माझ्या जीवनाचे सार्थ होतंय असे वाटत असताच परत माझे नशीब फिरले!
एका अपघातात तो रद्दीवाला पण हे जग सोडून गेला. मी परत पोरका झालो. त्याच्या मुलांनी सर्व पुस्तके हुतात्मा चौकातील एका फेरीवाल्याला विकली. आणि सर्व अनाथ पुस्तकांबरोबर मी पण रस्त्यावर गिऱ्हाइकांची वाट बघायला लागलो. आता टीव्हीचा जमाना आला होता आणि लोकांची मराठी पुस्तके वाचण्याची आवड कमी व्हायला लागली होती. एके काळी थोर थोर साहित्यिकांनी शोभणारा महाराष्ट्र पैसे घेऊन लिहिणाऱ्या लोकांनी भरून गेला. लोक पण मग साहित्यापासून दूर गेले. तरी पण तू राहुल मला शोधत आला म्हंटल्यावर मला आभाळ ठेंगणे झाले. तू मला घेतले, घट्ट हृदयाशी धरले आणि पळत पळत घरी आणले. तुझ्या घरी सगळ्यांना मला बघून खूप आनंद झाला. एकेकाने नंबर लाऊन माझे वाचन केले.
काही महिने सरले, काही नवीन पुस्तके घरी अली आणि माझे अप्रूप संपले. मी परत अडगळीत पडलो. एव्हाना मोबाईल आणि इंटरनेटचा प्रसार झाला होता आणि इतर पुस्तके सुद्धा अडगळीत पडले. अगदी चिल्लर लोकांच्या हातात पण मोबाईल दिसू लागला आणि स्मार्टफोन घेऊन जो तो त्यावर गेम खेळायला लागला. वाचन संस्कृती पूर्ण लोप पावली. पुस्तके वाचणारे फक्त ज्येष्ठ नागरिक राहिले. त्यांच्याकडे आधीच पैसे कमी, त्यातून विकत घेऊन कोण पुस्तके वाचणार?
राहुल, तू सुद्धा करिअरच्या मागे लागून एका मोठा कंपनीत नोकरी पकडली आणि दिवसरात्र मेहनत करायला लागला. इतका दमून घरी यायला लागला की तुला आपले छंद, आवड ह्याची पण आठवण राहिली नाही. आज तू मिळणाऱ्या पैशांनी घर शोभिवंत करायला घेतले आहेस. सगळ्या पाश्चात्य कल्पनांनी घराची सजावट करशील पण त्या उच्चभ्रू आवडींमध्ये वाचनाची आवड दाखवायची तुला लाज वाटेल. तू घर नूतनीकरण करणार म्हणजे मला पुन्हा रद्दीत जावे लागेल होय न??”
त्या जुन्या पुस्तकाची व्यथा ऐकून राहुलला स्वत:चीच लाज वाटली. त्याने पुन्हा त्या पुस्तकावर एक प्रेमळ नजर फिरवली आणि परत लहानपणीसारखे ते पुस्तक हृदयाशी घट्ट धरले. त्याने ठरवले, घरात एक पुस्तकांचे मोठे कपाट नक्की ठेवेन आणि सर्व नामवंत साहित्यिकांची पुस्तके तेथे जपून ठेवीन.
Click Here for the Full List of Essays on Marathi.TV