Pruthvichi Atmakatha in Marathi
Pruthviche Manogat : पृथ्वीचे मनोगत
मी पृथ्वी! आपल्या जगातील पंचमहाभूतापैकी एक. प्रचंड आकाशातल्या प्रचंड आकाश गंगेतील आपल्या सूर्य मालेतील एक छोटासा ग्रह! एव्हडीच माझी शास्त्रीय ओळख आहे. पण नक्की कोण आहे मी? सूर्यमालेतील जीवसृष्टी असलेला एकमेव ग्रह? की परमेश्वराच्या लीलेचे अस्तित्व अंगावर घेऊन स्वत:भोवती आणि सूर्याभोवती अखंड अविरत फिरणारी माता ? हो! माझे मनुष्य जातीचे पुत्र मला माता म्हणतात. परमेश्वराने करोडो जीव, प्राणीमात्र, आणि माणसे ह्यांना पोसायची जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे. आणि त्यासाठी तो त्या गूढ अवकाशातून मला मदत करीत आहे.
कुठल्या कारणाने माझा जन्म झाला असावा? माझे पिता सूर्यदेव ह्यांना एक मोठा धूमकेतू धडकला व त्यामुळे त्यांच्या शरीरातून तुकडे निघाले आणि आम्ही सात ग्रह बाहेर पडून त्यांच्याभोवती फिरत राहिलो. तसच माझ्यावर धूमकेतू धडकल्याने चंद्र निर्माण झाला जो आता माझा भोवती फिरतो.
अवकाशातील पोकळीत कुठल्यातरी अनामिक आकर्षणाने आम्ही सगळे ग्रह व उपग्रह अधांतरी एकमेकांच्या बंधनात ठराविक गतीने आणि ठराविक कक्षेत फिरत राहिलो आहोत आणि हे न संपणारे आहे.
माझा जन्म झाला तेंव्हा म्हणे मी आणि इतर ग्रह तापलेला वायुंचा गोळा होतो. फिरता फिरता हळू हळू थंड होत आम्हाला ही रूपे मिळाली. मी मुळातच थंड असल्याने माझ्यावर जमीन निर्माण झाली आणि मी पाणी पण नेसले. पाण्यातून हळूहळू एक एक जीव जन्माला यायला लागला आणि बघता बघता लाखो वर्षात सगळीकडे तऱ्हे तर्हेचे जीव जन्माला आले आणि माझ्या अंग ख्नाद्यावर बागडायला लागले. आणि सर्वात शेवटी उत्क्रांती होऊन ह्या प्रक्रियेचा अंतिम टप्पा म्हणजे मानव जन्माला आला. ज्याला परमेश्वरने आम्हा पंच महाभूतांना एकत्र आणून तयार केलेला पूर्ण विकसित मेंदू असलेला जीव!
इतर सगळ्या प्राण्यांपेक्षा माझा पुत्र मानव बुद्धिमान आहे आणि विचार करणारा आहे. मी त्याच्याकडे आशेने पाहू लागले. त्याचे चांगले व्हावे म्हणून त्याने केलेल्या प्रगतीच्या सर्व कामात मदत करू लागले. त्याने माझ्या अंगावर नांगर चालवून धान्य पिकविले. मी त्याला भरभरून धान्य दिले. तो खाऊन पिऊन सुखी झालेला मला पाहायचे होते. म्हणून मी त्याला माझ्याजवळचे सर्व धातू, जड जवाहीर रत्ने दिली. पण तो सुखी झालाच नाही. उलट त्याची हाव वाढत जाऊन तो जास्त जास्त माझ्या अंगावर भोके पडून खनिजे उपसत राहिला.
जोपर्यंत मानवाची जनसंख्या कमी होती तोपर्यंत मी सहन करू शकत होती. जशी जशी त्यांची संख्या वाढत गेली तशी तशी ते जास्तीत जास्त माझा उपयोग करू लागले. मी मुकाट्याने सोसत राहिले. पण त्यानंतर त्याची जमिनीची हाव वाढत गेली. मनुष्य माझी इतर बाळे जसे झाडे वेली व मुके प्राणी ह्यांची निर्घुणतेने कत्तल करू लागला. पाहतापाहता मनुष्यांची संख्या इतकी वाढली की त्यांना माझ्यावरची जागा पुरेनाशी झाली. आणि त्यांच्यात युद्धे होऊ लागली. महायुद्धे झाली. प्रचंड नरसंहार झाला. रक्तपात झाला, माझी लेकरे माना टाकून माझ्या कुशीत मरू लागली. खूप वाईट वाटले. पण सांगणार कसे? मला त्यांची भाषा कुठे येते?
मनुष्य आपले चपळ डोके चालवून नवीन नवीन सुखे स्वतःच्या पदरात पाडून घेऊ लागला. माझ्या शरीरातील तेल, खनिजे ह्यांच्यावर डोळा ठेऊन त्याने तेल उपसायला सुरवात केली. त्याचा उपयोग करून गाड्या, ट्रक माझ्या शरीरावर फिरायला लागले आणि आकाशात विमाने फिरायला लागली. त्यातून तो धूर, वायू आणि आग ह्यांच्यामुळे माझ्या भोवतालची हवा पण खराब होऊ लागली. माझा आणि माझ्या झाडे वेलींचा श्वास गुदमरायला लागला. त्या नष्ट होउ लागल्या आणि त्यातील वन्य जीव कुठे जाणार? ते ही बिचारे माना टाकायला लागले. एकमेकांबरोबर समजुतीने आणि सलोख्याने वागायचे सोडून एक दुसर्याचा घात करू लागले. हळूहळू वन्य जीव पण नष्ट होऊ लागले. माझा नीट सांभाळ करू शकेल असा माझा बुद्धिमान पुत्र राक्षस झाला होता. त्याने प्लास्टिक नावाचा राक्षस निर्माण केला. तो जसा मला खाण्यासाठीच जन्माला आला होता. त्याने माझी प्रकृती खालावली.
२०व्या शतकात माणसाने अतिशय संहारक शस्त्र निर्माण केले त्यामुळे गावे, शहरे भस्मसात होऊ लागले. सगळीकडे आग डोंब उसळला. तेंव्हा मात्र मी चिडले आणि पुत्राला शासन करण्यासाठी माझा लाव्हा ओकू लागले. वादळे येऊ लागली. माझे पाणी पसरवून पूर आणू लागले. माझ्या डोक्यावरचा बर्फ वितळून सगळीकडे प्रलय होईल अशे संकेत दिले. माझा रोष जर वाढला तर सगळीकडे हाहा:कार व प्रचंड हानी करू शकते ह्याची झलक मनुष्याला मी दिली. त्याने माझ्या पुत्रांपैकी काही विचारवंत पुत्रांना जाग आली. प्रसंगाचे गांभीर्य त्यांनी ओळखले. माझा आर्त नाद त्यांच्या कानी गेला आणि त्यांनी ह्याच्यावर कारवाई सुरु केली.
प्रथम त्यांनी प्लास्टिक राक्षसाला काबूत आणायला सुरुवात केली. त्याचा थोडा तरी नायनाट केला. मग त्यांनी माझ्या झाडांना पुनरुज्जीवन दिले. मी मोकळा श्वास घेऊ लागले. सगळीकडे हिरवे गार गालिचे पसरले. फुला पानांनी माझी पूजा केली. माझ्या पाण्याची साडी मी पुन्हा नेसले. माझ्या अंगावरची घाण झटकून मी ताजी तवानी झाले आणि माझा राग थोडाफार निवळला आहे.परमेश्वर वाईटा बरोबर चांगले पण निर्माण करतो. ती आदिशक्ती विश्वाचा व्यापार चालवितांना शेवटी चांगल्याचा जय करते.
आता मनुष्याची पुढची पिढी तरी त्यांच्या पूर्वजांप्रमाणे अनाचार करणार नाही असे वाटते. तसेच काही थोर विचारवंत युद्धे होऊ नयेत यासाठी प्रयत्न करीत आहेत त्यामुळे मला शांतता मिळेल. छोट्या छोट्या मुलांना माझी महती, माझी गरज कळणे आवश्यक आहे. माझ्या शिवाय माझा लेकरांना पूर्ण आकाशमंडळात दुसरे घर नाही ह्याची जाणीव राहणे गरजेचे आहे. मी खुश झाले, सुजलाम सुफलाम झाले की भरभरून माझ्या मुलांना देईन, त्यांना सुखी करीन. नक्कीच.
Click Here for the Full List of Essays on Marathi.TV
Bhramandhwani band zale tar…12th std Marathi nibandh
Nice nibhanda