Beautiful Mother – Aai Essay :
माझी आई
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी अगदी खरे आहे. साक्षात कृष्ण ,राम हे देखील आई शिवाय ह्या जगात येऊ शकले नाही मग आपण कोण?
माझी आई, माझी मैत्रीण :
प्रत्येकाची आई ही त्याचे सर्वस्व असते. अशीच माझी आई पण माझे सर्वस्व आहे, माझे पहिले प्रेम आहे. का कुणास ठाऊक पण अजूनही तिला पहिले कि मला लहान व्हावेसे कारण वाटते, परत तिच्याबरोबर खेळावेसे वाटते, हसावेसे, रडावेसे वाटते. कारण माझी आई ही माझी अगदी जवळची मैत्रिण आहे. तिला मी माझ्या मनातले सगळे सगळे अगदी मोकळेपणाने सांगू शकते. आणि ती कधी मला समजावते, कधी रागवते, कधी माझ्या सोबत लहान होऊन खळखळून हसते. ती माझ्याबरोबर क्रिकेट, चेस, पत्ते, शब्दकोडी सोडवणे इत्यादी खेळ खेळते. आम्ही कार्टून मूवी सुद्धा बरोबर बसून बघतो आणि खूप हसतो. त्यामुळे मला कधीच एकटेपण जाणवत नाही.
माझी आई अष्टभुजा देवी :
माझी आई करिअर वूमन आहे तशीच गृहकृत्यदक्ष पण आहे. ती सरकारी नोकरी करते. तेथे ती अतिशय प्रामाणिक आणि मेहनती म्हणून प्रसिध्द आहे. इतका कामाचा व्याप असून देखील ती घराकडे कधीही दुर्लक्ष करीत नाही. कायम हसत मुखाने व उत्साहाने सगळे सणवार साजरे करीत असते. आम्हाला आपल्या संस्कृतीची ओळख तर करून दिलीच त्याच बरोबर आपण प्रगती पण कशी करावी हे पण कळत नकळत शिकवित गेली. हे सगळे ती इतक्या सहजतेने करते की आम्हाला तिला अष्टभुजा देवी म्हणावेसे वाटते. आईला भरपूर मैत्रिणी आहेत आणि सगळ्यांशी तिचे प्रेमाचे नाते आहे. हे बघून नवल वाटते की कसे शक्य होते सगळं करून हिला असे नाते टिकविणे? आणि मग लक्षात येते तिचा मनमोकळा, दयाळू,मदतीला धावणारा आणि सडेतोड स्वभाव ज्यामुळे तिने आज खूप माणसे जोडली आहेत जी तिच्या एका हाके सरशी धावून येतात.
माझी निर्भीड आई :
१९८० साली जेव्हा स्त्रिया सायकल सुद्धा चालवायला घाबरत होत्या, तेव्हा ती स्कूटर वरून कार्यालयात जायची.इथे तिने आम्हाला शिकविले की प्रगती छोट्या गोष्टींपासून करायची असते .तंत्रज्ञानाचा योग्य तो वापर केला पाहिजे. तसेच तिने आम्हाला शिस्तीने पण प्रेमाने वाढविते. आमच्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टींवर तिची नजर असते. आमच्यात झालेले सूक्ष्म बदल पण तिच्या नजरेतून सुटत नाही. आमच्या मैत्रिणी कोण आहेत, त्यांचे राहणे ,वागणे व्यवस्थित आहे की नाही ते बघून ती ठरवते कोणाला घरात घ्यायचे ते. कोणीही चुकले तर ती निर्भीडपणे त्यांची चूक दाखवून देते. साफ आणि रोख ठोक स्वभावामुळे सगळे तिला वचकून असतात. अगदी आजी आजोबा देखील तिला घाबरतात. पण व्यवस्थितपणा ,जबाबदारी स्वीकारणे, आव्हानांना तोंड देणे ही तिची सहजप्रवृत्ती आहे. आम्हालाही तिने ह्या महत्त्वाच्या गोष्टी अंगवळणी पाडल्या आहेत. बाबा तर तिला झाशीची राणीच म्हणतात .
माझी आई, समाजसेविका:
आईला लोकांना मदत करण्याची अत्यंत हौस आहे. आलेल्या गेलेल्यांचे आदरातिथ्य करणे, हाताखालच्या लोकांशी आपुलकीने वागणे, हे तिच्याकडे बघून आपोआप आम्ही शिकत गेलो. कुणाचेही मन दुखवायचे नाही व अपमान करायचा नाही हा तिने आम्हाला शिकवलेला पहिला सामाजिक धडा! समाजात वावरताना आपल्या जबाबदार्या ,जसे कुणाच्याही अडचणींत मदत करणे, सामाजिक उपक्रमात भाग घेणे देशाच्या प्रगतीत आपण काय हातभार लावतो हे बघणे हे ती आपल्या कृतीतून दाखवते.
माझी हरहुन्नरी आई :
हा सगळा झाला आमच्या वरती करत असलेल्या संस्कारांचा भाग. आता त्याच्या विरुद्ध म्हणजेच तिचा मिष्कील स्वभाव आणि कलेची आवड. तिच्या नजरेतून एकही व्यक्ती सुटत नाही जिच्या मध्ये एखादी विचित्र लकब किंवा गोष्ट असते. आणि ती त्या लकबीची तंतोतंत उत्तम नक्कल करते. अर्थात ह्या मध्ये ती व्यक्ती दुखावली जाणार नाही ह्याचे ती पूर्ण भान ठेवते. ती ऑफिसच्या सगळ्या नाटकांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये भाग घेते. तिला गायनाचा आणि पेटी वाजवण्याचा छंद आहे आणि त्याचे तिने शास्त्रोक्त शिक्षण पण घेतले आहे. त्यामुळे ती ऑफिसमध्ये सगळ्या कार्यक्रमात पहिली येते. ती उत्सवप्रिय आहे. त्यामुळे ऑफिसचे गणेशोत्सव, निरोप समारंभ किंवा सत्कार समारंभ ह्या मध्ये ती आघाडीवर असते. ह्यावरून तिने आम्हाला असे शिकवले आहे की आपले कर्तव्य पूर्ण करतांनाच स्वत:साठी पण थोडासा वेळ द्यावा. आणि कुटुंबाबरोबर आपली पण प्रगती करावी.
माझी आई, लाडकी मावशी :
जेव्हाही माझ्या मैत्रिणींमध्ये माझ्या आईचा विषय निघतो, तेव्हा सगळ्या एका सुरात म्हणतात, “ए, तुझी आई किती मस्त आहे ग! आम्हाला पण अशी आई हवी होती.” तेव्हा मी त्यांना सांगते की तुम्ही कधीही तिच्या कडे जा; ती तुम्हाला तुमचीच आई वाटेल. ती माझ्या सगळ्या मैत्रिणींची आणि मावस बहीणभावांची लाडकी मावशी आहे. म्हणून तिच्याकडे सगळे जण हट्टही करतात आणि प्रेमही करतात. ती सगळ्यांनाच हवीहवीशी वाटते.
असे म्हणतात की देव सगळी कडे पोहोचू शकत नाही; म्हणून त्याने आई बनवली. हे अगदी माझ्या आईच्या बाबतीत खरे आहे. माझी आई माझ्यासाठी देवच आहे, जी माझ्या पाठीशी कायम उभी असते. माझ्या प्रत्येक सुखदुःखात आधार देते. माझ्या आयुष्याचा ती ‘दीपस्तंभ’ जरी म्हटले तरी हरकत नाही. देवा, तुझ्या चरणी हीच प्रार्थना, की सगळ्यांना अशीच आई मिळू दे. आणि माझ्या ह्या लाडक्या, प्रेमळ, शिस्तप्रिय आईला उदंड, आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे, आणि तिला खूप खूप आनंदी ठेव.
Click here to read one more essay on topic of mother
Click Here for the Full List of Essays on Marathi.TV
Majhi aai sarvasva aahe
Ti mange majhi khup kalji karte
Tiche majyavar prem aahe
Aani mi sudha tichyavar Maya karto
Ti majhe khup lad majhyashi ti ladivalane vagate.