Pariksha Nastya Tar Essay in Marathi Langauge
Pariksha Nasti Tar : परीक्षा नसत्या तर
“भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर ,पोटा माझ्या कळ येऊन दुखेल कारे ढोपर?” एका गाण्यात एक लहान मुलगी भोलानाथ म्हणजे नंदी बैलाला विचारते. किती लहानपणापासून आपल्याला परीक्षेची भीती असते? काय होईल जगातून परीक्षा पद्धती बंदच झाली तर? आता जी सगळ्यांच्या मानेवर भुतासारखी बसलेली आहे तिच्यामुळे सगळे रेसच्या घोड्यांसारखे धावत सुटले आहेत ते एकाएकी थांबतील आणि अडखळून पडतील. काय मजा येईल न? सगळे आळशी विद्यार्थी जल्लोष करतील. बाकीचे परीक्षांना घाबरणारे सुखाचा निश्वास सोडतील. सगळीकडे आनंदी आनंद होईल. कुणीही नापास होणार नाही की कमी मार्क पडले, नापास झालो, म्हणून कोणी आत्महत्या करणार नाही. वर्गात हुशार मुलांचा टेंभा मिरविणे बंद होईल आणि सगळा वर्ग एक डाल के पंछी होतील. कोणी लहान मोठा होणार नाही. मग वर्षातील सगळे दिवस सारखेच होतील. परीक्षा जवळ आली म्हणून आई ओरडणार नाही की टीचर घाबरवणार नाही. ज्याला जेव्हडा येईल, जसा जमेल तसा अभ्यास करेल. मग परीक्षेच्या आदल्या दिवशी रात्रभर जागून घोकंपट्टी करावी लागणार नाही की हुशार मुलाचे पाय धरून नोटस मागाव्या लागणार नाही. किती छान! सकाळी चहा पिऊन डुलक्या खात प्रश्नोत्तरे पाठ करावे लागणार नाही आणि निकालाच्या दिवशी पोटात बाकबूक करीत टेन्शनने अर्धमेला व्हावे लागणार नाही. मग सगळे क्लासेस बंद होतील. मुलांना शाळा संपली की क्लासेस ची दुसरी शाळा गाठावी लागणार नाही. नोकऱ्यांसाठी, सैन्यात भारती होण्यासाठी, परदेशी जाण्यासाठी सगळेच क्लासेस बंद होतील. सगळेच टेन्शन खल्लास!
परीक्षेचा शोध कुणी लावला असेल? पूर्वीपासून गुरूंकडे शिकायला जाणाऱ्या मुलांना सगळी विद्या शिकून झाल्यावर परीक्षा द्यावी लागायची. राजकुमारांना तर निश्चितच. कारण त्यांना पुढे जाऊन राजा व्हायचे असायचे. त्यासाठी त्यांना सिद्ध करून दाखवावे लागायचे. तेथूनच सर्व थरांमध्ये परीक्षा घेणे सुरु झाले असावे. परीक्षा त्यांचे कौशल्य ,बुद्धी आणि ज्ञान ह्यांचे मूल्यमापन करते. आपण जे शिकलो ते पुन्हा उद्धृत करता येते किंवा नाही ह्यची ती परीक्षा असते. तसेच गुरूने शिकवलेले आपण किती आत्मसात केले ह्याचे परीक्षा म्हणजे मापदंड असते. त्यामुळे खरे तर परीक्षा असाव्यात असे मत बरेच देतात. पण खरी गोष्ट अशी आहे की विद्यार्थी जितके परीक्षा नापसंत करतात तितकेच शिक्षक पण परीक्षांना वैतागलेले असतात. विचित्र वाटते न ऐकून? पण खरच त्यांना पण एव्हडे काम पडते परीक्षांची तारीख लागल्यावर. आधी भराभर पोर्शन संपवा, नंतर पेपर सेट करा, परीक्षेला इतर कामांबरोबर पर्यवेक्षक म्हणून वेळ द्या, उत्तरपत्रिकांचा गठ्ठा आणि बाकी आकडेवारी मुख्याध्यापकांन सुपूर्द करून आपल्या विषयाच्या उत्तरपत्रिकांचा गठ्ठा घेऊन घरी या आणि ताबडतोब पेपर तपासायला बसा. त्यातून विद्यार्थ्यांनी इतके तारे तोडलेले असतात की त्यांना कसे पास करायचे हा प्रश्नच पडतो. म्हणजे हल्ली कोणालाच परीक्षा नको असते.
शैक्षणिक वर्षात पहिला नंबर येणारे पुढे जीवनात सगळीकडे पहिले येतातच असे नाही किंवा ते काही अलौकिक करतात असेही नाही.उलट बरेचदा असे पहिले जाते की फॉरेनचे मोठ्या मोठ्या कंपन्यांचे मालक कॉलेजमधून घालवून दिलेले असतात. एडिसनला तर शाळेतून काढून टाकतांना गुरुजी म्हणाले होते की हा मठ्ठ मुलगा आहे ह्याला काहीच शिकता येणार नाही. आज जगातील सर्वात महत्वाचे शोध एडिसनने लावले. बल्बचा शोध लाऊन पुढच्या पिढीला अभ्यास करण्यास प्रकाश दिला. मार्क झुकेरबर्ग, शाळा अर्धवट सोडून व्यवसायात शिरला आणि फेसबुकचा प्रणेता झाला. बेन्जामिन फ्रान्क्लीन, मायकेल फॅराडे हे सर्व विशिष्ट विषयाच्या अभ्यासात झोकून देऊन मोठे झाले. आपल्याला मात्र जवळ जवळ सात अनिवार्य विषय आणि तीन इतर विषय एव्हड्या विषयांचा अभ्यास करावा लागतो आणि घोकंपट्टी करून आपण पास होतो.ह्याचा अर्थ आपल्याला तो विषय समजला किंवा आपण त्यात पारंगत झालो असा होतो का? आपण फक्त नोकरी लागण्यापुरते शिक्षण घेतो.
नोकरीसाठी पण परीक्षा द्यावी लागते आणि त्याला लाखो मुलांशी स्पर्धा करावी लागते. शालेय शिक्षण सोडले तरी परीक्षा आपली पाठ सोडत नाही. लेखी तोंडी सर्व परीक्षा देऊन यदा कदाचित नोकरी लागलीच तरी बढतीसाठी परीक्षा द्यावीच लागते. ती चारपाच वेळा तर निश्चितच द्यावी लागते. पुन्हा नोकरी करताना येणाऱ्या अडचणी ह्या पण परीक्षाच असतात. जीवनात कुठे परीक्षा नसते? कठीण काळ आला, दैवी, आकाशातून, मानवी, आर्थिक चणचण, नातलगांचे दुर्घर रोगांचे आजार हे सर्व कठीण परीक्षेचीच रूपे आहेत. जेंव्हा आपण आधीपासूनच परीक्षांची सवय लावून घेतली, डोक शांत ठेऊन विचार करायची सवय लावून घेतली तर आपल्याला संकटांना तोंड देण्यासाठी बळ मिळते. आपण समजूत घालून घेतो की देव परीक्षा पाहत आहे. पण तोच आपल्याला तारून नेईल.हरिश्चंदराने विश्वामित्रांची अवघड परीक्षा दिली. म्हणून त्याचे आज नाव आदराने घेतले जाते. अर्जुनाने धनुष्य बाण शिकल्यानंतर गुरु द्रोणांना सांगितले की मला फक्त पक्ष्याचा डोळा दिसत आहे.इतकी एकाग्रता दाखवली म्हणून तो मत्स्यभेद करू शकला. सचिन ने आचरेकारंची अवघड शिकवणी पार केली म्हणून तो क्रिकेटचा देव झाला.
परीक्षाच नसतील तर व्यवसायिकांना व सरकारला मनुष्यबळ मिळणार कोठून? भरतीचे निकष काय लावणार? आणि असे लोक भरून राष्ट्राचा विकास कसा होणार? कुठल्याही आपत्तीला सामोरे जाऊन आपले आणि देशाचे संरक्षण कसे होणार?तसेच शिकलेल्या लोकांपेक्षा अशिक्षित समाज वाढून सगळीकडे अंदाधुंदी माजेल. मग? परीक्षा तर हव्याच पण त्या टेन्शन देणाऱ्या नकोत, तर एखाद्याला कुठल्या विषयात गती आहे, क्य्ठला विषय आवडतो हे ठरविणाऱ्या हव्या. मग बघा कसा आपला भारत रत्नांची खाण होईल.
Click Here for the Full List of Essays on Marathi.TV