My Village Essay in Marathi
Majha Gaon Nibandh in Marathi : माझे गाव
परीक्षा संपली, सुट्टी लागली. उन्हाळ्याची सुट्टी लागताच आम्हा भावंडांना वेध लागतात ते गावी जाण्याचे. सुट्टी लागण्यापूर्वीच वडिलांनी गावी जाण्यासाठी तिकिटे काढलेली असतात. आईची पण लगबग चालू असते. आजी आजोबांसाठी, मामी मामांसाठी, काकी – आत्यासाठी आणि सर्व चुलत मामे भावंडांसाठी सर्वांसाठी काही ना काहीतरी घेतलेले असते. आता वाट बघायची ती गावी जायची तारीख कधी येणार त्याची.
गावाला जाण्याची उत्सुकता आम्हा सर्वांनाच असते आणि का नाही असणार, आमचे गाव आहेच एवढे सुंदर कि कधी गावी जातो असे वाटते आणि एकदा का गावाला गेले कि परत शहरात येऊ नये असे वाटते. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधील एका डोंगरावर वसलेल आमचं छोटस गाव आंबोली. आमचे गाव एक पर्यटन स्थळ सुद्धा असल्यामुळे गाव व शहर याचा सुंदर संगम झाल्यासारखा वाटतो. कोकणातील इतर गावांपेक्षा आमचे आंबोली खूप थंड गाव आहे. इथे उन्हाळ्यातही पंखा लावायची गरज भासत नाही. आमच्या गावी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत.
बेळगाव व गोवा जोडणाऱ्या महामार्गावर आमचे गाव लागते. गावी जाण्यासाठी नागमोडी वळणाचा आंबोली घाट चढावा लागतो. बसमध्ये चढताना आम्ही शिताफीने खिडकीच्या बाजूची सीट मिळवतो. कारण कितीही वेळा बघितले तरी हिरवीगार दरी नेहमीच मनमोहक वाटते. पावसाळ्यात तर पांढर्याशुभ्र धब्धब्यांमुळे स्वर्गीय सुखाचा अनुभव येतो. घाटात सुंदर दरी सोबतच लाल तोंडाची माकडे सुद्धा दिसतात, त्यांची गंमत बघताना खूप मजा येते. आंबोली घाट चढून गेल्यावर एक छोटेसे देऊळ लागते. त्याला पूर्वीचा वस असे म्हणतात. ग्रामस्थांचे मानणे आहे कि हा देव घाटातून जाता – येताना आपली रक्षा करतो. इथले ग्रामस्थ कोणत्याही शुभ कार्याला जाण्यापूर्वी या देवाच्या पाया पडूनच मार्गाला सुरवात करतात. आईने शिकवल्याप्रमाणे आमचे सर्वांचे हात इथे आल्यावर नकळतच जोडले जातात.
घाट संपवून पुढे गेल्यावर थोड्यावेळाने आमचे गाव येते. इतक्या महिन्यानंतर सर्वांना भेटण्यासाठी मन खूप आतुर झालेले असते. आजी – आजोबा आणि चुलत भाऊ बहिण बस स्टॉपवर येऊन आधीच वाट बघत असतात. सर्वजण किती खुश असतात आम्हाला भेटून. घरी गेल्यानंतर माठातील थंडगार गोड पाणी घेऊन काकी येते. सर्वांना भेटून झाल्यावर हात पाय धुवून नाश्ता करून आम्ही सर्व भावंडे गावात जातो. वाडीवरील प्रत्येक घरात जाऊन सर्वांना भेटतो. सर्वांच्या घरी काही ना काहीतरी खायला दिले जाते; आणि घरी जाण्याआधीच आमचे पोट भरलेले असते. गावातील सर्व माणसे खूप प्रेमळ आहेत व आमची सर्वांची मायेने विचारपूस करतात.
दुसऱ्या दिवशी काकाला थोडा मस्का पाणी करून फिरायला जायचा बेत ठरतो. काकाला माहित आहे कि आम्हाला कुठे कुठे जायला आवडते. आई सांगते कि सर्वात आधी देवाचे दर्शन घ्या मग कुठे ते फिरा. गावात अनेक देवळे आहेत पण सर्वात महत्वाचे आहे ते गावाबाहेरील हिरण्यकेशी हे महादेवाचे मंदिर. ह्या मंदिरासमोर एक पाण्याचे एक कुंड आहे जे नेहमी भरलेले असते. त्या पाण्यात डुबकी मारून मगच देवाचे दर्शन घ्यायची प्रथा आहे. देऊळ छोटेसेच आहे आणि देवांच्या मुर्त्या नेहमी पाण्यातच असतात. मंदिराच्या बाजूला एक गुहा आहे. काका सांगतो कि त्या गुहेत एका मध्ये एक अश्या सात गुहा आहेत व त्या इतक्या निमुळत्या आहेत कि कोणीही सातव्या गुहेपर्यंत जाऊ शकत नाही. आम्ही सर्वजण पहिल्या गुहेतच फिरून येतो. दुसऱ्या गुहेत जायची मला खूप भीती वाटते.
तिथून पुढे आम्ही नांगरतास येथे जातो. इथे नांगरतास देवाची मोठी उभी मूर्ती आहे. मंदिर साधेसेच आहे. पूर्वीचा वस आणि नांगरतास हे दोन देव आंबोलीच्या वेशीचे रक्षण करतात. नांगरतास मंदिराच्या पाठीमागेच नांगरतास धबधबा आहे. हा खूप खोल आहे आणि अतिशय बिकट आहे. उन्हाळ्यात ह्या धबधब्याला कमी पाणी असते पण पावसात या धबधब्याच्या पाण्याला इतका जोर असतो कि कित्येक गायी म्हशी या पाण्यात वाहून जातात. इथे वाहून गेलेली जनावरे डोंगराखालील दुसऱ्या गावात सापडतात, म्हणून आई आम्हाला सांभाळून राहायला सांगते. इथे पाया पडून झाल्यावर मात्र आम्ही इतर स्थळे बघायला जातो.
माझे सर्वात आवडते स्थान आहे कावळेशेतचे ठिकाण. इथे उभे राहून खालची दरी बघायला खूप सुंदर वाटते. असे वाटते कि आपण कोणत्यातरी वेगळ्याच विश्वात आलो आहोत. पावसाळ्यात तर इथे अजुनच मजा येते. इथून पाण्याचे मोठ मोठे प्रवाह खाली वाहत जातात पण दरीतील जोराने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे हे पाणी उलटे वर येते हे दृश्य अंगावर रोमांच उभे करते. तिथून आम्ही घाटातल्या मोठ्या धबधब्यावर जातो. तिथे पाण्यात खूप खेळतो. अनेक पर्यटक तिथे फिरायला आलेले असतात. त्यांना जेव्हा आम्ही सांगतो कि हे आमचे गाव आहे तेव्हा ते आम्हाला सांगतात कि आम्ही खूप भाग्यवान आहोत जे इतक्या सुंदर गावात जन्माला आलो. सनसेट पाँइटवर मावळत्या सूर्याचे दर्शन घेऊन आम्ही घरी जातो व काकीने आणि आजीने तयार केलेले चविष्ट जेवण जेवून अंगणात झोपायला जातो. चांदण्यांनी भरलेले आभाळ डोळ्यात भरून झोपतोना पाय जरी थकलेले असले तरी मन समाधानी असते. खरच गावी आल्यावर आईच्या कुशीत आल्याप्रमाणे वाटते.
Click Here for the Full List of Essays on Marathi.TV
वा…! खूपच छान, मला आश्या जागी फिरायला खूप आवढेल .
Wah Khoop chan. Vachtana ramun gele. Sundar wakya rachana.
Khup chan aahe maz gain nice
I like it
I like to maz gav. very nice
I like it it give me inspiration
This Marathi essay is very nice essay on my village in Marathi
Please only short essay…it’s too hard to read and also to learn
I like your story
Awesome……