My Grandfather Essay in Marathi
Maze Ajoba : माझे आजोबा
“वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभं, निर्विघन्म कुरु में देव सर्व कार्येषु सर्वदा|” सकाळ झाली की माझे आजोबा प्रथम गणपतीपुढे उदबत्ती लावतात आणि ही प्रार्थना करतात.
माझ्या आजोबांचे पूर्ण नाव यशवंत विठ्ठल कान्हरे. पण आम्ही सगळे नातवंडं त्यांना ‘आबा’ म्हणूनच हाक मारतो. रोज सकाळी आबा आमच्या आधीच उठलेले असतात. मॉर्निंग वॉक घेऊन येऊन प्राणायम व योगासने झाली की मग आयुर्वेदिक चहा घेतात. चहा सोबत नाश्त्याला फक्त दोनच मारी बिस्किटे खातात. ते झाले की अंघोळ, मग साग्रसंगीत पूजा करतात. ते इतकी सुंदर पूजा करतात, आणि फुलांची इतकी सुंदर रचना करतात की सगळं घर प्रसन्न होते. संपूर्ण संस्कृत मध्ये सर्व श्लोक आणि आरत्या म्हणतात. मग एक श्लोकी रामायण, सात चिरंजीव, बारा ज्योतिर्लिंग आणि अष्टविनायक यांची यादी होते. हे सर्व गेली कित्येक वर्ष रोज कानावर पडल्याने आम्हालाही पाठ झाले आहे.
ह्या सगळ्या क्रिया आबा सकाळी ८ चा आधीच आटपतात. त्यानंतर त्यांच्या स्कुटरवरून मला शाळेत सोडायला येतात आणि थोडे पुढे जाऊन भाजी आणायला जातात. रोज ताजी भाजी आईला दिली की ती पण खुश! त्यांना भाजी नीट निवडून आणायला आवडते. तसेच आबा सांगतात “मोसमातील सर्व भाज्या खायला हव्या. पालेभाज्या, कोशिंबिरी नेहमी खाल्ल्या पाहिजे. त्याने प्रतिकारशक्ती वाढते. निरोगी जीवन मिळते.” म्हणून अजूनही त्यांची तब्येत ठणठणीत आहे. आबा खूप रुबाबदार दिसतात. त्यांची सणसणीत 6 फुट उंची, सडसडीत बांधा, गोरा रंग, सोनेरी काड्यांचा चष्मा, बारीक मिशी, त्यामुळे बघणाऱ्यावर जबरदस्त छाप पडते. त्यात्तून त्यांच्या खणखणीत आवाजात बोलायला लागले की विचारायलाच नको!
आबांना खेळ खूप आवडतात आणि आमच्या मधेही त्यांनी खेळाची आवड निर्माण केली आहे. ते आमच्याबरोबर क्रिकेट, बॅडमिंटन खेळतात आणि मित्रांबरोबर बुद्धीबळ, पत्ते खेळतात. बुद्धिबळात त्यांचा हात धरणारा इथे कुणीच नाही. आमच्या शोकेसमध्ये त्यांचेच जास्ती कप आहेत. ४-५ दशकाधी ते उत्तम NCC कॅडेट होते. त्यांनी दिल्लीला 26 जानेवारीच्या परेड मध्ये भाग सुद्धा घेतला होता.
आबांची विशेषता म्हणजे अडी अडचणीला असलेल्यांची मदत करण्यास नेहमी पुढे असणे. आमच्या घरी सकाळपासून रात्रीपर्यंत माणसांचा राबता असतो. कुणालाही कुठलीही अडचण असली की ते आबांकडे सल्ल्यासाठी येतात. गावातलेच नाही तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावातले लोक धावत त्यांच्याकडे येतात. आबा शांतपणे त्यांचे म्हणणे ऐकून घेतात. जर पैशांची मदत हवी असेल तर पैसे देतात किंवा कसे मिळवता येतील ते सांगतात. जर इतर काही मदत हवी असेल तर त्यांचे ओळख-संबंध वापरून मदत करतात. त्यांनी इतक्या लोकांना मदत केली आहे की त्याची गणतीच नाही. ते म्हणतात “ह्या हाताने केलेला उपकार त्या हाताला काळात कामा नये.”
३५ वर्ष सेवा केल्यावर आबा सरकारी नोकरीतून निवृत्त झाले आहेत. पण अजूनही त्यांचा मित्रपरिवार मैत्री टिकवून आहे. त्यात अगदी आत्ता नोकरीला लागलेले तरुण लोक पण आहेत. त्यांच्या भेटी गाठी, स्नेह्सम्मेलने, तीर्थयात्रा, एकसष्ठी वगैरे वरच्यावर चालू असते. आबांना बोलायला खूप आवडते. त्यांचे शिक्षण आणि वाचन खूप असल्याने ते अगदी लहान मुलांपासून ते त्यांच्या वयाच्या माणसांपर्यंत कोणाशीही कुठल्याही विषयावर बोलू शकतात. एखादा विनोद झाला की त्याचं गडगडाट करून हसणं ऐकले की आपल्याला ही हसू येते.
मात्र आबा रागावले की त्यांचा रुद्रावतार पाहून भीती वाटते. एकदा आमच्या बागेतले फुले एक माणूस गुपचूप तोडत होता. त्यांना ते दिसले आणि ते एव्हड्या जोरात ओरडले “कोण आहे रे तिकडे?” की तो माणूस धड्पडलाच एकदम. बाहेर येऊन त्याला खडे बोल सुनावले. म्हणाले “विचारून घ्यायला काय होते? अशाच बेशिस्त वागणुकीने आपण देशात आणि परदेशात विदेशी लोकांसमोर लाज घालवितो.” पण आबा घरात असले की सगळं वातावरण चैतन्यमय होऊन जाते. ते सगळ्यांची फिरकी घेतात. माझ्या भावाचे कान लांब आहेत म्हणून त्याला ‘लंबकर्ण’ म्हणून चिडवतात. आणि माझ्या उंच ताईला “तुला पंजाबी ड्रेस नाही तंबू शिवावा लागेल” असे म्हणतात. आत्याला एकदा कमी मार्क पडले होते तेंव्हा म्हणाले होते “अग तू इतकी हुशार आहे की तू काय लिहिले ते तुझ्या मास्तरला कळलेच नाही म्हणून त्याने तुला कमी मार्क दिले!”
५ वर्षांपूर्वी आम्ही आबांची एकसष्ठी साजरी केली होती. तेंव्हा त्यांच्या ऑफिस मधील सर्व लोकांना आणि मित्र मंडळीला बोलावले होते. खूप मोठा कार्यक्रम झाला होता आणि आश्चर्य म्हणजे इतकी थोर थोर मंडळी आली होती समारंभाला – मोठे नेते, नगरसेवक, समाजसुधारक, विचारवंत, उद्योजक, कलाकार, आणि त्यांच्या ऑफिसमधील हेड ऑफ द डीपार्टमेंट (HOD) पासून ते प्यून पर्यंत सर्व आले होते. त्यांना रोज ऑफिसला सोडणारा त्यांचा लाडका रिक्षावाला पण आला होता. तेंव्हा कळले की आमचे आबा किती मोठे आहेत ते. पण त्यांनी कधीही आपला मोठेपणा आमच्यासमोर मिरवला नाही. थोर लोकांची हीच तर खरी ओळख असते. आम्हाला म्हणुनच माझ्या आबांचा प्रचंड अभिमान वाटतो. आणि देवाकडे प्रार्थना करावीशी वाटते की देवा त्यांना भरपूर आणि असेच निरोगी आयुष्य देऊ दे आणि आम्हाला त्यांचा सहवास असाच राहू दे.
Click Here for the Full List of Essays on Marathi.TV