Mi Pantpradhan Zalo Tar Essay in Marathi Langauge
Me Pantpradhan Jhalo Tar : मी पंतप्रधान झालो तर
काय फँटॅस्टिक कल्पना आहे न ? त्यादिवशी टीव्हीवर पंतप्रधानांचे जोशपूर्ण भाषण लागले होते. प्रचंड बहुमताने ते आणि त्यांच्या पार्टीतले लोक निवडून आले होते. मला वाटले की जगात असे काहीतरी करून दाखवावे. तसे आपण पंतप्रधानांचा रुबाब, त्यांच्यावर लोकांचे प्रेम, देश विदेशी लोकांमध्ये चर्चा करणे इत्यादी पहिले की वाटते किती महान माणूस आहे हा! आपली लोकशाही जगात सगळ्यात मोठी लोकशाही आहे ,येथे अठरापगड जाती, धर्म आणि पंथ आहेत. २८ राज्ये आणि पाच केंद्रशासित प्रदेश आहेत. 15 च्यावर भाषा इथे लोक बोलतात. इतक्या विविध तऱ्हेच्या मिश्रण झालेल्या लोकांचा नेता होणे हि साधी गोष्ट नव्हे. इतर देशांमध्ये अध्यक्ष मुख्य असतात. आपल्याकडे राष्ट्रपती असले तरी पंतप्रधान सर्वेसर्वा असतो. आपली लोकशाही आणि संसदीय रचना इंग्लंडच्या धर्तीवर आधारलेली आहे. म्हणून आपल्याकडे पण त्यांच्यासारखे पंतप्रधानांना महत्व आहे. आणि मला वाटले की खरच मी पंतप्रधान झालो तर? हे स्वप्नच आहे, पण स्वप्न बघायला काय हरकत आहे? सचिन म्हणतो तसे ,स्वप्ने जरूर बघावी,ती पुरी होतात.पण ती स्वप्ने पुरी करायला मेहनत पण तितकीच लागते.
मला आपल्या देशाचा अभिमान आहे.म्हणून त्याचा विकास ,त्याच्या समस्या आणि त्याचे संरक्षण हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. मी पंतप्रधान झालो तर प्रामुख्याने देशाच्या विकासावर भर देईन. आपल्या एव्हड्या खंडप्राय देशाला डेव्हलपिंग कंट्री म्हंटले की वाईट वाटते. मला आपला देश सगळ्या तंत्रज्ञानाने युक्त, आणि जगाच्या पुढे पाच पावले जास्त तंत्रज्ञान असलेला हवा आहे. आणि हे सोपे नाही हे मला माहित आहे. कारण आपल्याकडील अज्ञानी लोकांची प्रचंड संख्या.मी प्रथम तंत्रज्ञान शिकविण्याची आणि ते व्यवहारात आणण्याची जास्तीत जास्त सोय करीन. त्यासाठी लोकांना उद्युक्त करून, नवीन शोधांना सहाय्य करणारे विभाग निर्माण करीन. आपल्याला तेल आयात करावे लागते म्हणून आपल्यावर कर्जाचा बोजा वाढतो असे बाबा म्हणतात. मी तेलाच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण होऊ असे बघीन आणि त्याच बरोबर आमच्या शाळेतील काही विद्यार्थ्यांनी तेलाला पर्याय शोधले आहेत त्यांना उत्तेजन देऊन तेलाची गरज कमी करीन.
एकदा खर्च कमी झाला की मी वाचलेला पैसा विकासाकडे वळवीन. आपण जितकी वीज टीव्ही बघायला जळतो तितकी वीज जर शेताला मिळाली तर अन्न धान्य भरपूर होऊन आपण निर्यात करू शकू आणि त्यातून पण पैसा उभा होईल. हे मी जनजागृती करून लोकांना पटवीन. खेड्यात 12/12 तास वीज जाते म्हणून कित्येक हुशार मुले अभ्यासापासून वंचित राहून राष्ट्राची बुद्धीमन लोकांची संख्या कमी करीत आहे. मी सगळीकडे समान वीज पुरवठा करीन. या बाबतीत चीनचे उदाहरण घेण्यासारखे आहे. चीन मध्ये गेली वीस वर्षे फक्त काळे किंवा निळे कपडे वापरणे आणि एकाच मुलाला जन्म देणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे तो देश महासत्ता होण्याच्या दिशेने पावले टाकीत आहे तेही आपल्यापेक्षा जास्त लोकसंख्या असून. मी याबाबतीत जनजागृती करीन जशी सध्याच्या पंतप्रधानांनी स्वच्छतेबाबत केली, लोकांना शौचालय बांधण्यास तयार केले. हो, मी स्वच्छतेबद्दल पण जनजागृती करीन कारण साऱ्या जगातून आपल्या देशात पर्यटक येतात आणि आपल्याला परदेशी चलन मिळते. म्हणून मी आपला देश सुंदर ,आणि स्वच्छ दिसावा म्हणून प्रयत्न करीन. त्याचप्रमाणे मुसलमानी आक्रमणामुळे विद्रूप झालेल्या लेण्यांमधील मूर्तींना आधुनिक तंत्रज्ञानाने संपूर्ण आणि नव्यासारख्या करण्यास देशी शिल्पकारांना प्रोत्साहन देईन.
आपला देश पूर्वी सोन्याची खाण होती म्हणे. येथून सोन्याचा धूर निघत होता. तो सुवर्णकाळ परत आणण्याचा मी प्रयत्न करीन. त्यासाठी भारताचा व्यापार वाढवून भारताला श्रीमंत करीन. नवे नवे उद्योग देशी हुशार लोकांना प्रोत्साहन देऊन, अर्थसाहाय देऊन उभे करीन आणि सर्व उत्पादनांच्या बाबतीत भारताला स्वयंपूर्ण करीन. म्हणजे आपला पैसा बाहेर जाणार नाही.पण श्रीमंती आली की लुटारूंची तुमच्यावर नजर पडते म्हणून संरक्षणाची पण सोय करीन म्हणजे त्या काळात जसे आपल्याला इंग्लिश, फ्रेंच आणि डच लोकांनी लुटले असे होणार नाही. आपले संरक्षण दल मी सुसज्ज करीन आणि भारतीय लोकांना प्रोत्साहन देऊन नवीन विमाने ,पाणबुड्या आणि तोफा भारतातच बनतील असे बघीन. माझ्या मंत्रीमंडळात मी स्वच्छ, निस्पृह आणि हुशार लोकांना नियुक्त करीन ज्याला त्याच्या खात्याची पूर्ण माहिती असेल.
आपल्या भारताच्या भोवती जे देश आहेत त्यापैकी काही देशांबरोबर आपले संबंध तणावाचे आहेत.आपल्या सीमा पाच देशांना लागून आहेत आणि आपल्याला आकाश, जमीन आणि समुद्री मार्गाने धोका आहे. तेंव्हा आपले तिन्ही दल जास्तीत जास्त सुसज्ज, अत्याधुनिक आणि सक्षम ठेवीन. अमेरिकेसारखे सर्वांन एक वर्ष मिलिटरी सर्विस अनिवार्य करीन.त्यासाठी शाळांमध्ये सैनिकी शिक्षण कंपलसरी करेन. त्यामुळे मुलांना लहानपणापासून शिस्त आणि देशसेवेचे धडे मिळतील. तसेच त्यांचे शरीर निरोगी होऊन भविष्यात ते कुठल्याही आव्हानांना तोंड देण्यास सज्ज होतील.
शालेय शिक्षणात पण मी सुधारणा करीन. नुसती थियरी शिकून मुलांना काहीच व्यवहारज्ञान मिळत नाही. मी प्रॅक्टिकल शिक्षणावर भर देईन .तसेच मुलांना लहानपणापासून स्वच्छतेचे धडे गिरवायला लावीन.स्वच्छता म्हणजे रस्त्यात, शेजारी, नदीत, थियेटर मध्ये ,सार्वजनिक ठिकाणी,चौपाटीवर, पर्यटन स्थळांवर कागद, खाल्लेल्या अन्नाच्या प्लास्टिक पिशव्या, गुटख्याची पाकिटे, बाटल्या इत्यादी घन टाकू नये हे त्यांच्या मनावर बिम्बवीन. कारण ह्या गोष्टींना शिक्षा करून किंवा जाहिराती दाखवून लोकांच्या वर्षानु वर्षांच्या सवयी जात नाही. त्यामुळे आपल्या देशाची लाजेने मान खाली होते परदेशी पर्यटकांसमोर. हो! आणि इतर स्वच्छते बरोबर मी स्वच्छ कारभाराची पण मुहूर्तमेढ रोवीन. त्याबाबतीत मी शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवीन आणि भ्रष्टाचार, अन्याय आणि देशद्रोह करणाऱ्यांची गय न करता त्यांना कठोर शिक्षा करेन, ज्यायोगे पुढे कोणाला असे करायची हिम्मत होणार नाही.
लोकांना पुरेसा रोजगार आणि स्वस्त अन्नधान्य मिळाले तर युवक हिंसा किंवा गुन्हे करणार नाहीत. मी ह्या गोष्टी लोकांना मिळतील असे बघेन. तसेच देशातील सांस्कृतिक देवाण घेवाण ह्या कार्यक्रमाअंतर्गत सगळ्या राज्यांमधील सर्व युवकांना विविध राज्यात अदलाबदल करून राहण्याची सोय करून राज्यांमध्ये परस्पर प्रेमाची भावना वाढविन. माझा देश हा एकसंध झालेला मला बघायचा आहे जिथे जात पात ,धर्म पंथ,भाषा, राज्य ह्या गोष्टींना थारा नसेल आणि आपल्या पाठ्य पुस्तकातील प्रतिज्ञेप्रमाणे सगळे ‘ भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे” असे उस्फुर्तपणे म्हणतील. युवकांना चांगले संस्कार घडविण्यास मी ज्येष्ठ नागरिकांची मदत घेईन. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगले वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम बांधीन. विशेषत: निराधार आणि वृद्ध महिलांसाठी आधाराश्रम काढीन. त्यांना जमेल असे काम देऊन स्वयंपूर्ण बनविन. त्यांचे आशीर्वाद मिळवीन.
माझ्या वाटेला पाच वर्षेच येतील पण तेव्हड्या कालावधीत मी जास्तीत जास्त प्रयत्न करून माझ्या देशाला पुन्हा सुवर्णयुगात नेईन हे माझे स्वप्न आहे. आणि स्वप्ने बघितली तरच ती खरी करण्याची उमेद येते. होय न?
Click Here for the Full List of Essays on Marathi.TV