Gram Swachata Abhiyan Project in Marathi
Sant Gadge Baba Gram Swachata Abhiyan : संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान
‘अतुल्य भारत’ या प्रचार मोहिमे अंतर्गत अमीर खान याची एक जाहिरात टी व्ही वर झळकत असे. त्यात परदेशी पर्यटकांना दिसणारा आपला ओंगळपणा, गलिच्छपणा आणि सार्वजनिक स्वच्छतेबद्दल पूर्ण अज्ञान मार्मिक स्वरुपात दाखविले जात होते. पण त्याचा जनतेच्या मनावर काहीही उपयोग झाला नाही.
अशा या घाणेरड्या आणि गलिच्छ रहाणीमानामुळे प्रगत देशांत आपल्या भारताला ‘थर्ड वर्ल्ड कंट्री’ असे म्हटले जाते. त्याचे कारण हेच आहे की पर्यटकांना आपल्या देशात विमानतळावर उतरल्याबरोबर किंवा विमानतळातून बाहेर पडल्या पडल्या झोपडपट्टीचा आणि त्याच्या आजूबाजूच्या घाणीचा अनुभव येतो. एवढेच नाही, तर उघड्यावर शौचाला बसलेल्यांचे दृश्य पाहून त्यांना किळस येते. मग ते या दृश्यांचे चित्रण करतात आणि परतल्यावर आपल्या देशाबद्दल अपप्रचार करतात. साहजिकच आहे, की तिथल्या लोकांना ते चित्रण पाहून आपल्या देशात यायची इच्छा तरी होईल का?
स्वच्छता न ठेवण्याची मानसिकता :
मुळात गरिबी हे अस्वच्छतेचे कारण नव्हे; तर स्वच्छता न ठेवण्याची मानसिकता, जी दशकानु-दशके दुर्लक्षिली गेली आहे. संत गाडगे बाबांनी १९ व्या शतकातच या गोष्टीवर जनजागृती करण्याचा एकांडा शिलेदार म्हणून खूप प्रयत्न केला. गाडगे बाबा उर्फ देबू जानोरकर (१८६७ ते १९५६) हे व्यवसायाने शिक्षक होते, पण गावो गावी बदलीवर जाताना ते प्रथम हातात झाडू घेऊन गाव स्वच्छ करीत. संध्याकाळी देवळामध्ये स्वच्छतेवर, दारूबंदीवर आणि पशु बळीवर प्रबोधन करीत. डोक्यावर कटोरा आणि हातात झाडू हे त्यांचे मुख्य लक्षण होते. किर्तन करताना ते हसत खेळत समाजातील अपप्रव्रुती, अस्वच्छता याच्या वर खूप टीका करीत. लोक त्यांचे अनुयायी झाले होते. पण त्यांच्या मृत्युनंतर ही चळवळ तिथेच थांबली.
ग्राम स्वच्छतेची गरज :
त्यांचे कार्य जसे खेडोपाडी पसरले होते तसे नंतरही व्हावयास पाहिजे होते, कारण भारत मुख्यत्त्वे करून खेड्यांचा देश आहे आणि छोट्या-छोट्या ग्राम पंचायती मिळून भारत सरकार बनते. लोकांचा असा समाज आहे की कुठल्याही सोयी/सुविधा देणे हे सरकारचेच काम आहे. त्यांना हक्काची जाणीव आहे पण कर्तव्याची जाणीव नाही. आपला परिसर, पर्यावरण आणि अनुषंगाने आपला देश पण स्वच्छ ठेवणे हे आपले मुख्य कर्तव्य आहे ही गोष्ट ते सोयीस्करपणे विसरून जातात. पण जपान आणि जर्मनी अशा परदेशात मात्र सामन्यातला सामान्य नागरिक हे कर्तव्य जाणीव पूर्व जपतो. गाडगे बाबांनी मात्र स्वयं निर्भरता – स्वत:च स्वच्छता ठेवणे यावर भर दिला होता. ग्राम स्वच्छता अभियानाचे सेक्रेटरी श्री ठाकरे म्हणतात, “बाबांची लोकांना स्वच्छता शिकवण्याची अद्वितीय पद्धत होती. घरोघरी कचरा गोळा करून ते त्याचे खत करीत.” त्यांच्या कडून स्फूर्ती घेऊन महाराष्ट्रातील पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाने संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानाचे प्रयोजन केले.
ग्राम स्वच्छतेची व्याप्ती :
इ.स. १९९९ मध्ये संपूर्ण स्वच्छता अभियान सुरु झाले तेव्हा ग्रामीण विकास मंत्री श्री आर.आर.पाटील यांनी या अभियानाचे उद्घाटन केले. नंतर २०१४ मध्ये आपल्या शपथ विधीत श्री नरेंद्र मोडी यांनी गांधीजींच्या स्वच्छ भारत अभियानाचा उल्लेख करून आणि ‘एक कदम स्वच्छता की ओर’ या घोष वाक्याचा प्रचार केला. या योगे सरकार, स्वयंसेवी संस्था, अधिकारी, गैर सरकारी अधिकारी, वार्ताहर यांचे मंडळ स्थापून निर्मल ग्राम पुरस्काराची योजना सुरु केली. याच मोहिमेत सचिन तेंडूलकर, अनिल अंबानी, विरत कोहली, प्रियांका चोप्रा, कमाल हसन, अक्षय कुमार, विद्या बालन, अमिताभ बच्चन, ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतील कलाकार, स्मृती इराणी, किरण बेदी यांसारख्या ख्यातनाम कलाकारांना सामील करून घेतले, आणि जनजागृतीचे काम सुरु केले. ऑक्टोबर २०१९ मध्ये गांधीजींच्या १५० व्या जयंती पर्यंत १२ दशलक्ष शौचालय बांधून ४०४१ शहरे / गाव हगणदरी-मुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. हे सर्वेक्षण ४ जानेवारी २०१८ ते १० मार्च २०१८ पर्यंत होणार आहे. सरकारने यासाठी पुरस्कारांची पण योजना केली आहे.
योजना :
या योजने अंतर्गत शौचालय बांधणे, सांडपाण्याची व्यवस्था करणे, कचरा वाहून नेण्यासाठी रस्त्यांची जोडणी करणे, कचऱ्याचे वर्गीकरण आणि प्रक्रिया, सांडपाण्यावर प्रक्रिया या गोष्टींचा अंतर्भाव होतो. यामध्ये शाळा, शाळेतील मुले, स्त्रिया यांचे समुपदेशन करणे, शौचालयासाठी आग्रह धरणाऱ्या स्त्रियांचा सत्कार करणे, उदाहरणार्थ संगीता आव्हाडे आणि सुवर्ण लोखंडे. बक्षिसाची रक्कम प्रत्येक ब्लॉकमधील खेड्यांना रुपये २५,०००, १५,०००, १०,०००, जिल्ह्यातील खेड्यांना ५०,०००, ३०,०००, २०,०००, डिव्हिजन मधील खेड्यांना १० लाख, ८ लाख, ६ लाख आणि राज्यातील खेड्यांना २५ लाख, १५ लाख, १२ लाख आणि संत गाडगे बाबा स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत विशिष्ट पुरस्कार दिला जातो. आत्ता पर्यंत जवळ-जवळ ८०० कोटी रुपये यावर खर्च झाले आहेत. या योजने अंतर्गत कागल वाई, गुहाघर, महड, चिपळूण, उमरेड, मोवाड, खेड, पांचगणी, महाबळेश्वर, भगूर, दापोली, वेंगुर्ला, माथेरान, सोलापूर, सातारा हि गावे हगणदरी-मुक्त (ODF) झाली आहेत.
निरनिराळ्या घोषणा पण प्रचारासाठी वापरल्या गेल्या आहेत. ‘स्वच्छता असे जेथे आरोग्य वसे तेथे,’ ‘गटार असेल पास तर मजेत राहतील डास,’ ‘जो दिसेल तिथे थुंकेल तर जग त्यावर भुंकेल’ इत्यादी. अक्षय कुमार सारख्या दिग्गज नटाने सुद्धा ‘टॉयलेट एक प्रेम कहानी’ या सिनेमा द्वारे जनजागृती केली आहे. शौचालय बांधण्यासाठी सरकार अनुदान देत आहे.
या सर्व प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल आणि स्वर्गात गाडगे बाबांना आनंद वाटेल अशी अशा करूया.
Click Here for the Full List of Essays on Marathi.TV